Thread the needle zentangle

Give us Tools: Thread, Needle and the buttons

This is the second blog in the series 'Give us Tools'.
This covers the activity that build fine motor skills in the kids, Sewing the buttons.
This blog covers the detailed instructions and downloadable template to make felt buttons and needle for the younger kids.

buttons and needle
Felt needle, buttons

Motor skills विकसित होणं गरजेचं आहे. हात आणि बोटांमध्ये ताकद असणे, आपल्याला हव्या तशा बोटांच्या हालचाली करता येणं, हातांनी काम करताना हात स्थिर राहणे, ह्यासाठी motor skills विकसित होणं गरजेचं आहे.

बोटांच्या हालचाली हव्या तशा करता येणं हे नर्तक, कलाकार, शिल्पकारांसाठीच फक्त गरजेचं असतं का? त्यांच्यासाठी ही कौशल्ये गरजेची आहेतच पण फक्त तेवढेच नाही.

आपल्या सगळ्यांनाच ह्या कौशल्यांची गरज असते. आपण ती रोजच्या आयुष्यात वापरत असतो. पण काही क्षेत्र अशी आहेत जिथे ही आणखीनच महत्वाची ठरतात, उदाहरणार्थ सर्जन म्हणजेच शल्यविशारद जेव्हा शस्त्रक्रिया करतात, तेव्हा ही सगळी कौशल्ये वापरली जातात.  

अर्जुन पुरस्कार विजेता, बिलियर्डस् आणि स्नूकर चॅम्पियन गीत सेठीला त्याच्या यशाचे रहस्य विचारलं तेव्हा तो म्हणाला होता, लहानपणी मी गोट्या खूप खेळायचो. त्यामुळे बहुदा बिलियर्डस्मध्ये प्राविण्य मिळवणं सोपं गेलं.   

हाताच्या बोटांनी जेव्हा कुठलेही काम करायचे आहे, जेथे दोन्ही हात वापरायचे आहेत अशा वेळी हात आणि डोळे ह्यांचा समन्वय, bilateral coordination म्हणजे मेंदूच्या दोन्ही भागांचा समन्वय साधणं गरजेचं असतं.

ह्या क्षमता निर्माण करणं आपल्या हातात (शब्दशः 😊) आहे. ह्याची सुरुवात आपण अगदी लहानपणापासून करू शकतो.

डॉ. अनिल अवचट त्यांच्या ओरिगामीच्या छंदाबद्दल बोलताना म्हणाले होते की आपण हातांच्या बोटांच्या हालचाली जेवढ्या जास्ती करू तेवढा आपला मेंदू जास्ती सक्रिय राहतो.

गंमत अशी की ह्या सगळ्या क्षमता जेवढ्या वापरू तेवढ्या वाढत राहतात आणि जेवढ्या कमी वापरू तेवढ्या कमी होत जातात.

लहान मुलांमध्ये जेवढी लहानपणी ही कौशल्ये विकसित करू तेवढा त्यांना पुढच्या आयुष्यात उपयोग जास्ती.

Motor skills विकसित कशी करायची?

अगदीच सोपं आहे. आपल्या घरातल्या अगदी साध्या गोष्टी वापरून.

मागच्या ब्लॉगमध्ये आपण कात्रीबद्दल बोललो. एका हातात कात्री धरणे, दुसऱ्या हातात कागद धरणे आणि तो हवा तसा कापणे, हे करता येणं हा खूप महत्वाचा टप्पा आहे. हे आता आपल्याला वाटतं तितकं पहिल्यांदा केलं तेव्हा सोपं नव्हतं बरं का. पहिल्यांदा आपण हातात कात्री घेतली तेव्हा, कधी कात्री पडली, कधी कागद निसटला असे बरेच अपघात सुरुवातीला झाले असणार.

Motor skills विकसित करण्याच्या दृष्टीने कातरकाम हे खूप उपयोगी आहे. तो ब्लॉग वाचण्यासाठी (https://aditideodhar.com/scissors/)

ह्या ब्लॉगमध्ये आपण बोलणार आहोत ते सुद्धा अगदी साधं वाटणारं काम आहे.

‘सुईत दोरा ओवणे आणि बटण शिवणे’

बघा बरं आठवून, पहिल्यांदा हे काम केलं तेव्हा काय काय झालं होतं. किती वेळ लागला होता सुईत दोरा ओवायला? बटण शिवताना काय काय गमतीजमती झाल्या होत्या?

सुईत दोरा ओवताना, सुईचं नेढं आणि दोऱ्याचं टोक बरोब्बर एकेमेकांसमोर आणायला पाहिजे. पूर्ण एकाग्रता नसेल तर दोऱ्याचे टोक नेढयात न जाता इकडे तिकडे जातं. कधी नेढयाच्या कडेला दोऱ्याचं टोक धडकतं आणि मग ते वाकडं होतं. एकाग्रता, धीर, हात आणि डोळा ह्यांचा समन्वय ह्याची नितांत गरज असते एवढसं वाटणारं काम करताना.

एकदा ते जमलं की मग पुढचं आवाहन, बटण शिवणे.

आपण जो हात प्रामुख्याने वापरतो त्याला आपला dominant hand म्हणतात. मूल अगदी लहान असताना त्याचा dominant hand ठरायला लागतो.

एखादा डावरा आहे असं म्हणतो तेव्हा त्या व्यक्तीचा dominant hand डावा असतो. उजवा हात जे प्रामुख्याने वापरतात त्यांना उजवे म्हणतो.

बहुदा, dominant hand जो असतो त्यात आपण सुई धरतो आणि दुसऱ्या हाताने बटण ज्या कापडाला शिवायचे आहे त्या कापडावर धरून तेवतो.

सुईत दोरा ओवला की दोराच्या टोकाला आपण गाठ मरतो. ज्या बाजूला बटण लावायचे आहे त्याच्या दुसऱ्या बाजूने आपण सुई कापडात घुसवतो. त्यामुळे गाठ आतल्या बाजूला राहते. कापडातून घातलेली सुई बटणाच्या भोकातून वर काढतो आणि दुसऱ्या भोकातून खाली घालतो.

बटणाला साधारण दोन / तीन  किंवा चार भोकं असतात.

मध्येच एकदा बटण हलवून बघतो, ते सैल आहे असं वाटलं तर परत एका भोकातून दुसऱ्या भोकातून असे करत राहतो. बटण कापडाला घट्ट बसलं आहे हे जाणवलं की थांबतो.

बरोब्बर?

हयात आपण अनेक fine motor skills वापरतो. लहान मुलांना जर आपण बटण शिवायला दिल तर त्यांची motor skills विकसित व्हायला खूप मदत होते.

लहान मुलं म्हणजे किती लहान? ह्या प्रश्नावर उत्तर आहे, दुसऱ्या वर्षांपासून काहीच हरकत नाही.

काय??????? दोन वर्षांच्या मुलांच्या हातात सुई? काहीतरीच काय?

😊 असा काहीसा आपला पुढचा संवाद होईल, हो ना?

काळजी करू नका, तुम्हाला एक गंमत सांगते.

अगदी लहान मुलांना आपली नेहमीची सुई आणि बटणं दयायची नाहीत. त्यांच्यासाठी एक खास काहीतरी करायचं. काय?

अगदी लहान मुलांसाठी: कापडाचीच सुई आणि कापडाचीच बटणं. सुई तोचण्याची भीती नाही कि बटणं गिळण्याची.

ठीक आहे, पण म्हणजे? आणि हे मिळतं कुठं? आपण घरी करू शकतो.

कसं?  

लहान मुलांसाठी कापडी सुई आणि बटणं

असं

felt buttons and felt needle

कुठले कापड वापरायचे?

बिरबलाची गोष्ट आहे ना. अकबर बादशहा विचारतो सगळ्यात प्रभावी शस्त्र कुठलं? बिरबल म्हणतो गरजेच्या वेळी हाताशी असेल ते.

इथेही तसंच आहे. कुठलं कापड योग्य? तर जे सहज उपलब्ध असेल ते. एखादी कल्पना सुचली, काही करायची इच्छा झाली की लगेच करणं महत्वाचं असतं. परफेक्ट कापड आणू आणि मग काम सुरू करू असं म्हणलं की वेळ लागतो, काही काळ जातो. बाकी व्यवधानं इतकी असतात की मग हळूहळू आपली करायची इच्छा कमी होत जाते.

मध्यंतरी मी एक पुस्तक वाचलं, 5 Second Rule. लेखकाचं असं म्हणणं आहे की एखादी गोष्ट करावी असं ठरवलं की पांच सेकंदाच्या आत आपण उठून सुरुवात केली पाहिजे. पहिले पांच सेकंद सगळ्यात महत्वाची असतात.

त्यामुळे करायची इच्छा झाली की जे हाताशी असेल ते घेऊन सुरुवात करावी (शक्यतो पाच सेकंदांच्या आत 😊)

मी फेल्ट कापड वापरले, त्यात खूपच आकर्षक रंग असतात आणि कापड जाड असते. पण कुठलेही कापड ह्यासाठी वापरता येते.

कुठले म्हणजे अगदी कुठलेही.

शर्टचं कापड, जुनी ओढणी, जुना परकर, भेट म्हणून आलेला ब्लाऊज पीस, जुनी चादर, जुना अभ्रा, अगदी काहीही.

बटण तयार करायला दोन वर्तुळं कापडावर काढायची. बटणाला किती भोकं ठेवायची ते तुम्ही ठरवा. किंवा काही दोन, काही तीन, काही चार भोकांची बटणंही करता येईल. विविधता जेवढी जास्ती तेवढी मुलांना जास्ती मजा येईल.  

दर वेळी वर्तुळ काढायचं, त्यात छोटी वर्तुळ काढायची. तेच तेच परत करत बसण्याऐवजी आपण पुठ्ठयांचं स्टेनसिल करू शकतो.

तुम्ही स्वतः स्टेनसिलसाठी आकार काढू शकता किंवा मदत हवी असेल, तर हे टेंप्लेट वापरू शकता,

ब्लॉगच्या शेवटी ह्या फाइल्स pdf स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध आहेत. .

आपले स्वतःचे स्टेनसिल करायचे असेल तर ही कृती,

पुठ्ठा घ्या. पुठ्ठा कसा पाहिजे? तर कापायला सोपा हवा, म्हणजे खूप जाड नको. पण स्टेनसिल लुळं पडता कामा नये, नाहीतर ते वापरून कापडावर आकार काढता येणार नाही, त्यामुळे अगदी पातळ पुठ्ठाही नको.

कॉर्नफ्लेक्स खोकं असतं ना तसं परफेक्ट आहे, खूप जाड नाही आणि अगदी पातळही नाही.

कंपास वापरून वर्तुळ काढलं तर पुढचं काम सोपं होईल. कंपास नसेल तर वाटी/ डब्याचं झाकण /ताटली, काहीही वापरू शकता.

वर्तुळाच्या मध्यबिंदूतून जातील अशा दोन रेषा एकमेकांशी काटकोनात काढा.

तुम्हाला हवी तशी लहान वर्तुळे आत काढा.

सुईचा आकार आणि सुईचं नेढं काढा, असं,

आता आकार कापा आणि स्टेनसिल तयार!!

स्टेनसिल कापडावर ठेवून आकार काढा. प्रत्येक बटणासाठी आणि सुईसाठी दोन आकार कापा आणि ते एकमेकांना शिवा म्हणजे मुलांना बटण हातळताना सोपे जाईल, ते दुमडणार नाही,

दोन आकार एकमेकांना शिवण्यासाठी ब्लँकेट स्टिच वापरता येईल. हा टाका सोपं आहे आणि दिसतो चांगला.

ब्लँकेट स्टिचसाठी हा विडिओ बघा, https://www.youtube.com/watch?v=S9zegUYdPmg

किंवा फॅब्रिक ग्लू वापरून दोन्ही आकार एकमेकांवर चिकटवता येतील. कुठल्याही स्टेशनरीच्या दुकानात फॅब्रिक ग्लू मिळतो/

हवी तेवढी बटणं तयार करा.

सुई आणि बटणं तयार झाली.

बटणं ज्यावर शिवायची तो बोर्ड

एक पुठ्ठा घेऊन त्यावर बटणाच्या आतली छोटी वर्तुळं आहेत ना, त्या आकाराची वर्तुळं काढा आणि कापा.

बटणं पुठ्ठयला शिवण्यासाठी लोकर/ सुतळी/ नाडी/ सॅटीन रिबिन, किंवा कुठलाही जाड दोरा वापरू शकतो.

सुईतून तो ओवता आला पाहिजे एवढंच!   

झालं, आपला संच तयार झाला.

कापलेले असे गोल उरतील, त्याचंही काहीतरी करता येईल. ग्रीटिंग कार्ड?

left over felt circles for craft

हे झालं लहान मुलांसाठी, ज्यांना सुईने इजा व्हायची भीती असते किंवा जे बटणं गिळू शकतात, त्या वयोगटातल्या मुलांसाठी.  

थोड्या मोठ्या मुलांसाठी, खरी सुई आणि खरी बटणं वापरायची. आधी एखाद्या जुन्या कापडावर सराव केला की मग शर्ट/ टॉपचं तुटलेले बटण लावायला द्यायचं.

 

ह्याचे फायदे काय?

  • Fine Motor skills विकसित होतात
  • Bilateral coordination म्हणजे मेंदूच्या दोन भागांचा समन्वय साधला जातो.
  • कुठलीही fine motor skills लागणारे कृती जेव्हा आपण परत परत वकरतो तेव्हा मेंदूमध्ये त्याची आठवण जतन केली जाते. त्याला muscle memory म्हणतात. Muscle memory विकसित झाली की ती कृती करणे सोपे होत जाते, त्यातली कार्यक्षमता वाढते, शिवाय हीच कौशल्ये जेथे वापरली जातात अशा इतर कृतीही सोप्या होत जातात.  
DOWNLOAD THE BUTTON & NEEDLE TEMPLATE

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *