Oggy, Dr. Strange and the Captain America blog featured image

Oggy, Batman and Captain America: how they changed the way we do things

There is ample joy in the making things with your hands. Creating something from scratch. When kids and parents do it together, it is pure bliss for the parents and lot of fun, learning for the kids.

This is the story of how Oggy, Dr. Strange and Captain America came into our life and changed the way we did things.

माझा मुलगा ४ वर्षांचा होता. डिस्ने कार्टून्सचा चाहता. कोण नसतं? मला अजूनही तितक्याच आवडतात.

सगळ्याच लहान मुलांप्रमाणे त्याला त्याच्या आवडत्या डिस्ने पात्राचं सॉफ्ट टॉय हवं होतं. प्रॉब्लेम काय आहे? मिकी, डोनाल्ड, मिनी, प्लुटो, कितीतरी सॉफ्ट टॉयस उपलब्ध आहेत.

गडबड अशी होती की त्याला गूफी आवडत होता. आम्ही नुकतेच एडिनबरातले आमचे अडीच वर्षांचे वास्तव्य संपवून पुण्यात परत आलो होतो. तिथे असतो तर काहीच प्रश्न नव्हता, डिस्ने स्टोअरमध्ये गूफी मिळालाच असता.

आम्ही भरपूर दुकाने पालथी घातली. डोनाल्ड, मिकी, मिनी, प्लुटो, सगळी खेळणी दुकानदार दाखवायचे. गूफी उपलब्ध तर नव्हताच पण फारसा कोणाला माहितही नव्हता. गूफी म्हणल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर जे प्रश्नचिन्ह उभे राहायचे त्यामुळे सलिलला फारच वाईट वाटायचे.

एका वर्षांनंतर त्याचे गूफी-प्रेम जरी कमी झाले नाही तरी आणखी एक प्रेम सुरू झाले. ह्यावेळी होता, Oggy and Cockroaches मधला ऑगी. त्याआधी टॉम आणि जेरी होतेच. त्यांची सॉफ्ट toys ही मिळून गेली.    

Oggy from Oggy and the cockroaches

मग काय, ऑगीसाठी परत आमची दुकानदार-वारी सुरू. हा अनुभव तर गूफीपेक्षाही वाईट होता. त्याच्या वयाची मुले आणि त्यांचे आई-वडिल सोडले तर ऑगी विशेष कोणाला माहितच नव्हता. पुण्यातल्या छोट्या-मोठ्या दुकानांचे उंबरे झिजवल्यावर, सलिलचे ऑगी-प्रेम जरी तसूभरही कमी झाले तरी ऑगी मिळण्याची आमची आशा धूसर होत गेली.

आता, जेथे सॉफ्ट टॉईज मिळतात अशा जवळ-जवळ सगळ्या दुकानांना भेट देऊन झाली. शिवाय, सलिलला बहुदा,  ‘ऑगी कोण?’ ह्या प्रश्नाचा कंटाळा आला. आपला ऑगी कोणाला माहितही नाही हा विचार फारच दुःखदायक होता.

असंच एकेठिकाणी अगदी शेवटचा प्रयत्न करू म्हणून गेलो आणि तेथूनही हात हलवत परत आलो आणि अचानक मला एक कल्पना सुचली.

सलिलला घेऊन थेट तुळशीबाग गाठली. कलाकुसरीचं, हस्तकलेचं साहित्य मिळणाऱ्या दुकानात गेलो. आकाशी रंगाचे फरचे कापड, लाल, पांढरे फेल्ट अशी खरेदी केली. घरी येऊन, लॅपटॉपवर ऑगीचे चित्र उघडले आणि त्याप्रमाणे आकार कापले.

बालपणी, म्हणजे माझ्या बालपणी, मी आणि भावाने आईच्या मदतीने टेडी बेअर तयार केले होते. एका मासिकात कसे करायचे, कसे शिवायचे, काय कापड वापरायचे वगैरे आले होते. ते वाचून आम्ही तयार केला होता. मी लाल रंगाचा आणि भावाने गुलाबी रंगाचा. अजूनही ते आई-बाबांकडे आहेत. डोळे, नाक असे तपशील काळाच्या ओघात गेले आहेत.

त्या प्रयत्नाला स्मरून सुरुवात केली. निळ्या फरचे दोन आकार काढले, कापले. स्पंज भरण्यापूरती थोडी जागा तशीच सोडून, ते दोन्ही तुकडे एकमेकांना शिवले. घरी मशिन नसल्याने हातानेच हे शिवणकाम केले. ब्लँकेट स्टीच माहित होता, तोच वापरला. मग ऑगीचे मोठे लाल नाक, डोळे आणि पोटावर पांढरा गोल फॅब्रिक ग्लूने चिकटवले. त्यावर काळ्या मार्करने तपशील काढले.

काळ्या फेल्ट कापडाच्या मोठ्या मिश्या आणि कान केले. हातांचे पंजे आणि पावलांसाठी पांढरे फेल्ट वापरले.    

मी ऑफिसमधून आणि सलिल शाळेतून आल्यावर संध्याकाळी हा आमचा उद्योग चालू होता. आठवड्याभरात ऑगी तयार झाला.

सगळे तपशील अगदी बोऱ्ओबार होते पण दुकानात मिळणाऱ्या खेळण्याची सफाई त्यात नव्हती. सलिलला तसे काही वाटले नाही. त्याच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वहात होता. इतके दिवस नकार पचवून, आता ऑगी मिळणार नाही हे त्याने मान्य केले होते. त्यामुळे असा हाडा-मासाचा (फर आणि फेल्टचा) ऑगी हातात धरल्यावर त्याला खूपच छान वाटले. मित्रांमध्ये, ज्या वयोगटात ऑगी खूप प्रसिद्ध होता, तिथे तर ऑगी आणि सलिल दोघेही चर्चेचा विषय झाले. ‘अरे, तुला कुठे ऑगी मिळाला’ ह्या प्रश्नावर ‘आम्ही तयार केला’ हे उत्तर द्यायला छान वाटत होते.

सुपरहिरो ह्या संकल्पनेने भुरळ घालण्याचं एक वय असतं. फँटम, मॅनड्रेक हे माझ्या लहानपाणी होते. इंद्रजाल कॉमिक्सची पारायणे केली होती. वेताळाच्या हातातली ती कवटीचं चित्र असलेली अंगठी. फार आकर्षण होत्या त्याचं.

मुलासाठी सुपरहिरो म्हणजे Marvelचे आयर्नमॅन, कॅप्टन अमेरिका, डॉ. स्ट्रेन्ज, तर डीसीचे बॅटमॅन, सुपरमॅन वगैरे. डॉ. स्ट्रेन्ज सारखी केप मला हवी अशी भूणभूण सुरू झाली. ऑगीच्या अनुभवावरून ऑन गोष्टी कळल्या होत्या, अशी केप म्हणजे झूल दुकानात मिळणे अवघड आहे आणि दुसरे म्हणजे आपल्याला तयार झूलीची गरज नाही, आपण स्वतः ती करू शकतो.

त्यामुळे ह्यावेळी दुकानांमध्ये शोध घ्यायच्या फंदात न पडता आम्ही थेट कामच सुरू केले.

डॉ. स्ट्रेन्जची झूल लाल रंगाची आहे. गळ्याजवळ ती बांधलेली असते आणि डोक्याच्या मागे वरपर्यंत ती पोहोचते.

आधी नमूना म्हणजे prototype करून बघावा आणि मग चांगले लाल कापड आणावे असे आम्ही ठरवले. नमुन्यासाठी घरी असलेलेच एखादे कापड वापरायचे होते. मला कल्पना सुचली. लग्नात ज्या अनेक साड्या घेतल्या होत्या त्यातल्या एका साडीचा परकर घेतला, लाल रंगाचा. त्याची वरची बाजू गळ्याच्या इथे बांधायच्या भागात, त्याचा घेर खाली. परकर लांबीत कापला आणि झूल तयार झाली.

गळ्यापाशी बांधायला परकराचा आयता नेफा असल्यानेतीच नाडी वापरायची असे मला वाटत होते. डॉ. स्ट्रेन्जच्या केपमध्ये अशी नाडी दिसत नाही म्हणून मुलाने माझा शॉर्टकट मारायचा बेत हाणून पाडला. मग प्रेसबटणवर दोघांचे एकमत झाले.

Dr Strange Cape

डॉ. स्ट्रेन्जच्या डोक्याच्या मागे झूलीचा भाग जो येतो तो ताठ असतो. तो कसा करावा ह्यावर दोघांनी विचार केला. कापड असे ताठ राहणार नव्हते. शिवाय ते अगदी खालच्या केपसारखे दिसले पाहिजे ही मुलाची अट होती. नाहीतर कॅनव्हास कापडाला रंग देऊन वापरावे असा माझा विचार होता. पण रंगायची छटा, पोत हयात फरक जाणवलाच असता.   

आमच्या अशाच कुटीरउद्योगांसाठी फेल्टचे जाड शीट आणले होते. परकराचा कापलेला भाग घेतला. त्याचे हवे त्या आकारात दोन सारखे तुकडे कापले. फेल्टशीट त्या दोन तुकड्यांमध्ये ठेवून बाजूने ब्लँकेट स्टिचने शिवले. फेल्टशीटमुळे कडकपणा आला आणि दोन्ही बाजूने लाल कापड आल्याने, फेल्टशीट आत लपून गेले. दोन्ही उद्देश साध्य झाले.

 तो तुकडा केपला शिवला आणि झालं. डॉ. स्ट्रेन्जची केप तयार झाली.

माझा जुना, साडीचा परकर वापरला होता कारण आधी नुसतं करून बघायचं होतं. एकदा हा प्रयोग जमला की चांगलं लाल कापड आणून करू असं ठरलं होतं. पण मुलाला हीच केप आवडली आणि आता हीच फायनल असं त्याने जाहिर करून माझं काम वाचवलं.

पुढचे एक-दीड वर्ष, त्या केपशिवाय हा कुठेही जात नव्हता. कुठलाही कार्यक्रम असो, काही असो, कपडे कुठलेही असोत, वर ही झूल ठरलेलीच होती.

ड्राक्युलाचीही लाल रंगाचीच झूल असते. कधीकधी कॉलेजमधली मुलं ‘ए ड्राक्युला’ असा त्याला आवाजही टाकायची.

ही लाल झूल म्हणजे मूळचा परकर आहे हे काही बायकांच्या लक्षात यायचं किंवा इतरांच्या आलं तरी कधी कोणी काही बोललं नाही. मुख्य म्हणजे झूल धारण करणाऱ्याला त्याचा काही फरक पडत नव्हता. तो डॉ. स्ट्रेन्जच्या आणि आम्ही केलेल्या केलेल्या झूलीच्या चांगलाच प्रेमात होता.

आता झूल घालत नसला तरी ती त्याच्या कपड्यांच्या कप्प्यात नीट घडी करून ठेवलेली आहे. ती झूल म्हणजे आमच्यासाठी एकत्र केलेल्या कामाची, प्रयोगांची आठवण आहे.  

काही दिवसांनी, माझ्याकडे हसत आला. आता त्याचं हे हसणं माझ्या चांगलंच ओळखीचं झालं होतं. आता काय करायचंय विचारल्यावर उत्तर आलं, ‘कॅप्टन अमेरिकासारखी ढाल’. ह्यावेळी नुसती इच्छा नव्हती, बेतही तयार होता. टाटा स्कायची डिश असते ना, तशी वापरून ढाल करता येईल हा विचार करून आलेला होता.

आता अशी जुनी डिश मिळवायची कोठून हा प्रश्न होता. एकांनी सांगितलं की भंगारमाल हातगाडीवर घेऊन जाणारे असतात त्यांच्याकडे मिळू शकेल. लक्ष ठेवून, पाठलाग करून अशा 2-3 लोकांना गाठलं पण त्यांच्याकडे डिश नव्हती. ही अशी गोष्ट आहे की येईलच असंही ते आश्वासन देऊ शकत नव्हते. शेवटी त्यातल्या एकाने सुचवलं की जुन्या बाजारात बघा, कदाचित मिळून जाईल.  

एके दिवशी बुधवारी दोघांनी जुना बाजार गाठला. तिथे जुन्या डिश दिसल्या. जवळून बघितल्यावर लक्षात आलं त्यांचा आकार अगदी गोल नसतो. शिवाय वजनही बरंच असतं. डिश वापरून ढाल करणं शक्य नव्हतं. एखादी कल्पना जेव्हा आपण प्रत्यक्षात उतरवतो तेव्हा अनेक अडचणी येतात त्या अशा. नुसतीच कल्पना असते तेव्हा सगळंच सोपं वाटत असतं. त्या कल्पनेवर काम करायला लागलं की एकेक आव्हाने समोर उभी राहतात, आपल्याला जे वाटलं होतं, तसंच होतंच असं काही नाही हे लक्षात येतं. 

इंग्लिशमध्ये म्हणतात ना, When rubber hits the road. नवीन तयार केलेली कार जेव्हा अजून कारखान्यात असते तोपर्यंत ती एकदम छानच वाटत असते. त्यात काही प्रॉब्लेम आहे हे कधी कळतं ती जेव्हा पहिल्यांदा रस्त्यावर आणतो तेव्हा. कारचे टायर जेव्हा रस्त्याला लागतात तेव्हा. 

when rubber hits the road

खट्टू झालेल्या त्याला म्हणलं जुन्या बाजारात आलोच आहोत तर चक्कर मारून बघू. काहीतरी वेगळी कल्पना मिळेल.

(वाचकांपैकी तुम्ही जुन्या बाजारात गेला नसाल तर, जुना बाजार म्हणजे antique shop असतं ना, तसंच, पण इथे आख्खा बाजार. flee market आणि antique shop हे एकत्र)

प्लॅस्टिकचे टब बघितले पण हवा तो आकार नव्हता. लोखंडाच्या कढया त्या घाटाच्या होत्या पण त्याचे वजन खूपच असते. त्यात काय, मी उचलू शकतो म्हणून पुढे सरसावलेल्या सलिलला लक्षात आले कढईचे वजन पेलायला दोन्ही हात लागत आहेत. त्याला तर कॅप्टन अमेरिकासारखी एका हातात ढाल धरायची होती. त्यामुळे मग कढईची कल्पना बाद झाली.

अर्जुनाला जसा तो माशाचा डोळा दिसत होता तसं आता आमचं झालं होतं. जुन्या बाजारात, प्रत्येक दुकानात आम्ही शोधक नजरेने ह्यातले काय ढालम्हणून वापरता येईल हे बघत हिंडत होतो.

आता टारपोलिन, लाकडी फर्निचर अशी दुकाने सुरू झाली तशी आमची आशा धूसर होऊ लागली. इतक्यात डाव्या बाजूला, गल्लीच्या तोंडावर एक दुकान दिसलं. दुकानाच्या कोपऱ्यात घमेली रचून ठेवली होती. ती पालथी, एकावर एक रचल्यामुळे त्याचा तो आकार एकदम आमच्या डोळ्यात भरला. अगदी ढालीसारखाच होता. ‘अरे, ही ओळखीची गोष्ट, बऱ्यापैकी डोळ्यासमोर असणारी, ती कशी सुचली नाही’ असं आम्हाला वाटलं.

वजननी ठीक, एका हाताने उचलता येईल असं. कडांना तितकी सफाई नव्हती पण आतल्या बाजूला धरायला काहीतरी करणार होतोच, त्यामुळे तशी लागण्याची भीती नव्हती.

‘अरे, घमेलंच, कोपऱ्यावरच्या हार्डवेअरच्या दुकानातही मिळालं असतं की’ असं बाबा म्हणल्यावर आम्हाला हसूच फुटलं. आपल्याला हवा तसा आकार मिळाला ह्या आनंदात हे घमेलंच आहे, कुठेही मिळेल हे लक्षातच आलं नव्हतं. त्यामुळे, मी, सलिल आणि घमेलं अशी वरात जुन्या बाजारातून घरी आली होती.

असो, काम करायला कच्चा माल तरी आता तयार होता. त्यावर वर्तुळ, चांदणी काढणं, रंग देणं ही कामं तुलनेने सोपी होती. रंग दिल्यावर खरंच कॅप्टन अमेरिकाच्या ढालीसारखी दिसू लागली.

रंगकाम झाल्यावर ढालीला हँडल लावायचं महत्वाचं काम अजून बाकी होतं. हँडल शिवाय ती हाताळणे जरा अवघड आणि नाही म्हणले तरी थोडे जोखमीचे होते.

बरेच पर्याय आम्ही तिघांनी पडताळून बघितले. घमेल्याला बाकदार आकार असल्याने तेथे बसेल असे, आणि घमेल्याचं वजा पेलेल असं हॅंडल हवं होतं. हा दुसरं मुद्दा फारच महत्वाचा होता. कारण सलिल आणि त्याचे मित्र त्या ढालीबरोबर खेळणार होते. हॅंडल जर निघालं, तर त्याचा परिणाम फारच गंभीर झाला असता. ढाल पायावर, कोणाच्या अंगावर पडली असती.

ह्याबाबतीत आपण काही प्रयोग न करता त्यातल्या अनुभवी लोकांकडून काम करून घ्यावे असे ठरवले. ती ढाल घेऊन एका फॅब्रिकेटरकडे गेलो. दायर लावताना आणि उघडताना, धरण्यासाठी जे हॅंडल असते ना ते ह्यासाठी योग्य आहे असा सल्ला त्यांनी दिला. हार्डवेअर दुकानातून मग तसे हॅंडल घेऊन आलो. फॅब्रिकेटरने वेल्डिंग करून ते जोडून दिले.

ढाल तर अगदी आमच्या डोक्यात होती तशी झाली. ती सुरक्षितपणे हातळायची कशी तोही प्रश्न सुटला. एकच गडबड झाली होती. वेल्डिंग केल्यावर, लोखंड तापून, दोन्ही बाजूला काळे झाले. फॅब्रिकेटरने आधीच ही कल्पना दिली होती. तुम्ही आधी हॅंडल लावून मग रंगावायला हवं होतं, असं ते म्हणलेच होते.

त्यामुळे रंगाचा परत एक हात देणे हे काम वाढलं. पण एक अनुभव मिळाला. उत्साहाच्या भरात जे काम अगदी आधी केले ते शेवटचे करायला हवे होते हे कळलं. हा धडा पुढच्या उपक्रमांमध्ये नक्कीच उपयोगी पडेल.

Salil and Captain AmericaShield

हे असे आमचे तीन प्रकल्प. वेळ किती लागला तर हो, कल्पना अमलात कशी आणायची ह्यावर विचारविनिमय, बाजारातून हवे ते सामान आणणे, आणि प्रत्यक्ष काम. एकूण प्रत्येक प्रकल्पाला साधारण एक आठवडा लागला. 

मी ऑफिसहून आल्यावर आणि सलिल शाळेतून आल्यावर एकत्र काम करत होतो. 

दोघांनी मिळून एकत्र काम करण्यात खूप मजा आली. दोघांच्याही creativity ला भरपूर वाव मिळाला. 

नवीन कितीतरी गोष्टी शिकलो. 

काही बेत सपशेल फसले, नवीन काही प्रयोग केले. काही गडबड झाली तरी आपण निरीक्षण करून, विचार करून plan b तयार करू शकतो आ विश्वास मिळाला. एकच गोष्ट करायचे अनेक मार्ग असू शकतात हेही लक्षात आले. 

मुख्य म्हणजे ‘अपयश’ ह्या गोष्टीकडे खूप वेगळ्या दृष्टीने बघायला शिकलो. 

‘अपयश’ ह्या विषयावर एक वेगळा ब्लॉग लिहिणार आहे. खूप महत्वाचा विषय आहे, आणि खूप बोलण्यासारखे आहे असं वाटतं त्याबद्दल. 

आत्ता इथेच थांबते. पुढच्या ब्लॉगमध्ये असेच आणखी काही प्रयोग आणि आमचे कुटीरउद्योग. 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *