SCISSORS GRAPHIC

Give us Tools:Scissors

Give me a lever long enough and a fulcrum on which to place it, and I shall move the world, said Archimedes.

Yes, we can move the world, we can make a difference. We all have the potential.

The development of that potential though needs practice, patience, skills.

How to develop that potential in kids? It starts with small things. Give us tools series explores the same.

This blog in the series is about the scissors

कात्री वापरणे हे मुलांच्या बोटांमध्ये, हातांमध्ये, डोळा-हात ह्यांचा समन्वय ह्या दृष्टीने खूप महत्वाचे आहे.

मला तुमची प्रतिक्रिया काय असेल ह्याची साधारण कल्पना आहे. काहीतरीच काय? कात्री वापरायला काय लागतंय? त्यात कसली आली आहेत motor skills, बरोबर ना?

कात्री वापरणे.. आपल्या अगदी नेहमीच्या वापरातली गोष्ट. आपण कात्री हातात घेतो आणि कामाला लागतो.

हातात कात्री धरणे, दुसऱ्या हातात जी गोष्ट कापायची असते ते असते, आपण कात्री वापरायला सुरुवात करतो. कात्रीच्या दोन पट्यांमध्ये बरोब्बर कागद/ कापड किंवा जे काही असेल ते कापले जाते.

इतकी वर्षे वापरल्याने ती अगदी सरावाची झाली आहे. फार विचार करावा लागत नाही, लक्ष ठेवायला लागत नाही.

आपला मेंदू हे काम शिकला आहे. आपल्या बोटांना, हाताच्या स्नायूंना ‘वळण’ लागले आहे म्हणून ते सोपे आहे. ‘आता’ ते सोपे आहे. जेव्हा पहिल्यांदा आपण कात्री हातात घेतली तेव्हा हे अजिबात सोपे नव्हते बरं का.

मुलांना कात्री का द्यावी?

त्यामुळे हात आणि बोटांमध्ये ताकद येते.

हात आणि डोळे ह्यांचा समन्वय निर्माण होतो. हे कौशल्य मेंदू शिकतो. हे एक कौशल्य आहे. गंमत अशी आहे, की हे कौशल्य जेवढे वापरू तेवढे वाढत जाते आणि जर वापरले नाही तर कमी होत जाते.

कात्री वापरताना आपले दोन्ही हात आपण वापरतो. दोन्ही हात वेगवेगळी काम करत असतात. समजा आपण कागद कापत आहोत, तर एका हातात कागद धरतो, दुसऱ्या हातात कात्री असते. एक हात कागद हवा तसं धरण्याचे/ वळवण्याचे काम करणार आहे तर दुसरा कात्री धरून कागद कापण्याचे.

आपल्यासाठी दोन्ही हात एकसारखे नसतात. एक हात dominant hand असतो. म्हणजे प्रामुख्याने एक हात आपण वापरत असतो. एखादी व्यक्ती डावरी आहे असं आपण म्हणतो तेव्हा त्या व्यक्तीचा dominant hand डावा आहे, असा त्याचा अर्थ आहे.

काही कृती अशा असतात जेथे दोन्ही हातांची आवश्यकता असते. जसे भाजी चिरताना, आपण आपल्या एका हातात सुरी धरतो आणि दुसऱ्या हाताने भाजी हवी तशी सरकवत जातो. सुरी धरणारा हात बहुतेक वेळा आपला dominant hand असतो.

शाळेत जीवशास्त्रात मेंदू बद्दल शिकलेलं आठवतंय? काळजी करू नका, फार खोलात जात नाही. आणि आता परिक्षा नसल्याने ही माहिती वाचायला आवडेल बघा. एकूणच, परीक्षा हा प्रकार संपला तेव्हापासून मला कुठलाच विषय नीरस वाटला नाही. आपल्यासाठी, आपल्या आनंदासाठी, केवळ नवीन शिकण्यासाठी जेव्हा आपण कुठला विषय वाचतो, तेव्हा तो छान वाटतो. कुठलाही तणाव नसल्याने ते शिकणं आनंददायी असतं. मुलांसाठी हा आनंद कसं निर्माण करता येईल हे आपण बघू.

चला, परत मेंदूकडे जाऊया.

मेंदू म्हणजे मोठा मेंदू, त्याचे दोन भाग असतात, उजवा मेंदू आणि डावा मेंदू. ह्या दोघांना जोडणारा, त्यांच्यात संवाद साधणारा भाग असतो ज्याला corpus callosum म्हणतात.

brain

मूल वाढायला लागते तसे त्याचा dominant hand कुठला हे ठरते.

ज्या कृतीला आपले दोन्ही हात लागतात त्या कृती करताना, मेंदूच्या उजव्या आणि डाव्या भागाचा समन्वय साधणे महत्वाचे आहे त्याला bilateral coordination म्हणतात.

हा समन्वय विकसित झाला नाही तर काय होते?

शर्टाचे बटण लावणे, बूटाची लेस बांधणे, दप्तरात पुस्तके भरणे, जॅकेटची चेन लावणे अशा गोष्टी मुलांना नीट जमत नाहीत, किंवा खूप वेळ लागतो.

कात्रीने कागद कापताना, कागद पडतो, कधी कात्री पडते. मग आपण मुलांना ‘अगदी धांदरट’ आहे असा शिक्का मारून मोकळे होतो.

ही समस्या असते bilateral coordination कमी असल्याची.

चांगली बातमी अशी आहे की हे विकसित करता येतं.

कधी? जेवढं लहानपणापासून सुरुवात करू तेवढं चांगलं.

अर्थात उशीर कधी झालेला नसतो. कुठल्याही वयात सुरू करा. जेवढं लहान मुलांमध्ये ते लवकर विकसित होईल तेवढं त्यांनाच उपयोग होईल.

हे कसं करायचं?

अगदी सोप्पं आहे. आपल्या घरात अगदी सहज उपलब्ध असणारी कात्री.

कातरकाम हा उद्योग अत्यंत उपयुक्त आहे.

लहान मुलांच्या हातात कात्री? तुमच्या चेहऱ्यावरचे आश्चर्य आणि भीती मला वाचता येतीये.

काळजी करू नका. कात्री अगदी सुरक्षित असते.

कात्रीने ठरवलं तरी बोट/ हात कापता येणार नाही. खरंच, चेष्टा नाही करत. विश्वास बसत नसेल तर प्रत्यक्ष करूनच बघा. कात्रीने कधीही बोट/ हात कापला जाणार नाही.

मुलांसाठी कात्री कशी आणावी

कात्रीमध्ये घाबरण्यासारखा भाग एकच आहे, पात्याचे टोक! हो, टोक लागू शकते.

त्या टोकाने इजा होऊ नये, मुलांना आणि इतरांना म्हणून काय करायचं?

लहान मुलांसाठी कात्री आणताना पुढचा भाग बोथट असलेली अशी आणायची.

म्हणजे? सांगते.

कलाकुसरीसाठी जी कात्री वापरतो तिची पाती अरूंद असतात आणि त्यांना पुढे टोक असते, हे असे.

Sharp Scissors

कलाकुसर करताना खूप बारीक, नाजूक नक्षी असते. आपण काय कापत आहोत ते नीट दिसावं ह्यासाठी पाती टोकाकडे अशी निमुळाती केलेली असतात.

अगदी लहान मुलांसाठी अशी कात्री टाळायची. तिच्या टोकाने त्यांना किंवा इतरांना टोचू शकते, डोळ्याला इजा होऊ शकते.

पात्याचे पुढचे टोक बोथट असते अशी कात्री लहान मुलांसाठी अगदी छान. धोका काही नाही, आपल्यालाही काळजी नाही. ही अशी,

blunt scissors

कात्री वापरायला देताना काय गोष्टी शिकवायचा?

कात्रीचे टोक, आपल्या दुसऱ्याच्या डोळ्यात जाऊ द्यायचे नाही.

कात्री घेऊन हातवारे करायचे नाहीत.

दुसऱ्याला कात्री देताना कायम पाते आपल्याकडे करायचे. हेच सुरी किंवा कुठलीही धारदार वस्तू हातळताना लक्षात ठेवायचे. सुरी दुसऱ्याला देतानासुद्धा पाते आपल्याकडे करायचे. का? तर सुरी आपल्याच हातात असल्याने आपल्याला अंदाज असतो. सुरी घेणाऱ्या व्यक्तीला तो नसतो. चुकून पाते लागू शकते. कात्रीच्या बाबतीत तेच.

एकदा ही काही पथ्ये पाळली की झालं.

कातरकाम काय करायचं? सुरुवात कशी करायची?

एका हातात कात्री धरून कागद कापता येणं हे पहिलं दिव्य. त्यासाठी रद्दीचे कागद कापणे ह्यांपासून सुरुवात करायची.

एकदा का ते जमले की मग, रद्दी कागदावर वेगवेगळे आकार, जसा चौकोन, त्रिकोण, आयत, गोल काढून तो कापायला द्यायचे.

मग थोड्या अवघड आकारांकडे, म्हणजे पंचकोन, षटकोन, अष्टकोन वगैरे.

एकदा हात आणि कात्री हवी तशी वळायला लागली की मग बारीक नक्षीकाम आणि अवघड कातरकाम मुलं आपोआप करायला लागतील.

तुम्हाला सुरुवात करण्यासाठी काही आकार दिले आहेत. डाऊनलोड करा, कागदावर छापा किंवा कागद लॅपटॉपच्या स्क्रीनवर ठेवून कागदावर आकार गिरवा. अशा तऱ्हेने टेंप्लेट तयार करा आणि सुरू होऊ द्या मुलांचे कातरकाम.

कातरकाम ही इतकी छान गोष्ट आहे. सगळ्यात छान गोष्ट म्हणजे त्याला वयाचं काही बंधन नाही. मुलांबरोबर तुम्हीही करा. लक्षात आहे ना, कुठल्याही वयात आपण motor skills विकसित करू शकतो.

सगळ्यात महत्वाचे म्हणजे, जे करतोय त्यात रंगून जाणे, प्रत्येक क्षण मनापासून अनुभवणं. ते एकदा जमलं की मग काय..    

डावऱ्या लोकांसाठी खास अशी कात्री

हो, अशी कात्री बाजारात उपलब्ध आहे.

मला हा शोध अपघाताने लागला. माझा मुलगा लहान असताना त्याच्यासाठी कात्री घेऊन आले. माझी कात्री मी कातरकामासाठी, क्विलिंगसाठी वापरत असल्याने ती टोकदार होती. मुलासाठी बोथट टोक असलेली खास आणली.

कात्री कशी वापरायची हे त्याला दाखवत होते तर काहीतरी वेगळं वाटलं. नेहमीच्या कात्रीसारखी नव्हती. कात्री उलट-सुलट करून बघितली. पण नाही, काहीतरी वेगळंच वाटत होतं खरं.

कात्रीचं लेबल निरखून बघितंलं तेव्हा कळलं की ती डावऱ्या लोकांसाठीची म्हणजे left hander’s scissor होती.

काय फरक असतो?

उजव्या हाताने वापरायची कात्री असते ना तिचे उजव्या बाजूचे पाते वर असते. उजवे पाते वरून खाली जाते. ती कात्री डाव्या हातात धरली तरी उजवे पातेच कायम वर असते. तेच डावऱ्या लोकांसाठी कात्री असते तिचे डावे पाते वर असते.

कात्री ही सर्वसाधारण उजव्या लोकांसाठीच केलेली असते. मला कात्री वापरायला खूप त्रास झाला तेव्हा लक्षात आले डावऱ्या लोकांना किती त्रास होत असेल उजव्या लोकांना डोळ्यासमोर ठेवून केलेली कात्री वापरताना.

पण आता त्याबद्दल जागृती झाली आहे आणि खास डाव्या लोकांसाठी उत्पादने मिळू लागली आहेत.

लेखाच्या शेवटी येताना, काही महत्वाच्या मुद्द्यांची उजळणी

  • किती लहान मुलांना कात्री देता येईल? साधारण २ ते ३ वर्षांची मुले कात्री वापरू शकतात.
  • कात्री कशी असली पाहिजे? टोकांशी बोथट असलेली.
  • आणखी काही? आपले मूल उजवे आहे की डावरे हयाप्रमाणे कात्री आणावी. खास left handed scissors मिळतात.
  • कात्री देण्याआधी काय सांगितले पाहिजे?
  1. कात्री घेऊन हातवारे करणे/ पळणे हे करायचे नाही.
  2. कात्रीचे पाते आपल्याला किंवा इतरांना टोचणार नाही ही काळजी घ्यायची.
  3. कात्री दुसऱ्याला देताना कात्रीचे पाते हे आपल्या बाजूला असले पाहिजे.

सरावासाठी काही टेम्पलेट्स

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *