A Snail, A Whale and A Library

गोगलगाय, व्हेल आणि एक ग्रंथालय

“काय आहे रे हे?” आजीच्या प्रश्नाने पुस्तकात गढलेला गणेश भानावर आला. 

“आम्ही स्पर्धेला गेलो होतो ना तिथे सिद्धांत म्हणून एक नवीन मित्र मिळाला. त्याने त्याचं पुस्तक मला वाचायला दिलं आहे.” गणेशने सांगितले. 

“आहे काय ही गोष्ट? लहान मुलांची वाटते.” आजी पुस्तकातली चित्रे निरखत म्हणाली. 

“म्हणलं तर लहान मुलांसाठी आहे. त्यातली चित्रंही भारी आहेत. अडचणींवर कशी मात करायची ते गोष्टीतून छान कळतं.” गणेश म्हणाला. 

“हो? सांग की मला.” आजी त्याच्याशेजारी बसत म्हणाली. 

‘गोष्ट आहे गोगलगाय आणि व्हेल माशाची. ही आपली गोष्टीतली गोगलगाय बाकी गोगलगाईंपेक्षा वेगळी असते बरं का. एका जागी राहण्याचा तिला जाम कंटाळा असतो. तिला जग बघायचं असतं. पण गोगलगाईला हे कसं शक्य आहे? 

तिला एक युक्ती सुचते. गोगलगाई पुढे जाताना मागे तार सोडत जातात बघ. त्या तारेने ती एका खडकावर लिहिते की तिला जग बघायचे आहे आणि त्यासाठी ‘लिफ्ट’ हवी आहे. एक व्हेल मासा ते वाचतो आणि तिला त्याच्या शेपटीवरून जगाची सफर घडवून आणतो अशी थोडक्यात गोष्ट आहे.’

गणेशने संपूर्ण गोष्ट आजीला वाचून दाखवली. प्रत्येक पानावरची बोलकी चित्रं बघण्यात आजी रंगून गेली. “छान!” गोष्ट संपल्यावर आजी म्हणाली. 

“मुख्य म्हणजे काय तर तोंड उघडून बोललं पाहिजे.” चहा करायला उठत आजी म्हणाली. 

गणेश आजीकडे बघतच राहिला. हे आपल्याला का सुचले नाही. अर्थात! तोंड उघडून बोलले पाहिजे! 

—————–

 

गणेश आणि टीम नुकतेच एका स्पर्धेसाठी गेले होते. तेथून परत आल्यावर मुख्याध्यापकांबरोबर मिटींग झाली. मुख्याध्यापकांनी टीमचे कौतुक केले. त्यांच्या चेहऱ्याकडे बघून म्हणाले “भाग घेणे महत्वाचे, जिंकणे-हारणे चालूच राहते.” 

“सर, बक्षीस मिळालं असतं तर आम्हाला आवडलंच असतं. पण बक्षीस मिळालं नाही म्हणून आम्ही हताश झालो नाही.” गणेश म्हणाला.

“हो सर. स्पर्धेच्या निमित्ताने इतर गावातली, शहरातली आमच्याच वयाची मुलं आम्हाला भेटली. आम्हाला जाणवलं आमचं सामान्य ज्ञान कमी पडतंय.” पूजा म्हणाली. 

 

“म्हणजे?” सरांनी विचारले. 

“तिथे आलेली मुलं फक्त अभ्यासात हुशार नव्हती. त्यांना जगभरच्या बऱ्याच गोष्टी माहित होत्या.” राजू म्हणाला. 

 

“वेगवेगळ्या विषयांवर खूप आत्मविश्वासाने बोलत होती.” संगीता म्हणाली. 

 

“इंग्लंडमध्ये अश्मयुगीन काळात लोकांनी मोठमोठाले दगड वर्तुळाकार उभे केले आहेत. त्याबद्दल सिद्धांत नावाचा एक मुलगा माहिती सांगत होता. त्याचे वर्णन इतके जिवंत होते की मला वाटलं ह्याने ते प्रत्यक्ष बघितलं आहे. पण तो म्हणाला तो भारताबाहेर कधी गेलाच नाही. पुस्तकातून त्याला ही माहिती मिळाली.” गणेश म्हणाला. 

 

गणेश आणि टीमची सिद्धांतशी विशेष गट्टी जमली. त्यांच्या लक्षात आले सिद्धांतचे अभ्यासाबरोबर अवांतर वाचन खूप आहे. त्यामुळे त्याला जगभरातले लोक, त्यांचा इतिहास आणि बरीच माहिती आहे.

“बरोबर आहे. अवांतर वाचन करता करता सहज कितीतरी गोष्टी कळतात. आपले ज्ञान वाढते.” सरांनी दुजोरा दिला. 

 

“सिद्धांतने त्याच्याबरोबर काही पुस्तकेही आणली होती. खूप छान गोष्टी व चित्रे त्यात आहेत.” एक पुस्तक सरांसामोर धरत गणेश म्हणाला, “सर, हे स्टीफन हॉकिंग ह्या शास्त्रज्ञाने लिहिलेले पुस्तक आहे. स्टीफन हॉकिंगने लहान मुलांसाठी पुस्तक लिहिले आहे हे आम्हाला माहितच नव्हतं. ते वाचताना खगोलशास्त्रातल्या खूप नवीन गोष्टी आम्हाला कळल्या. बरेच नवीन शब्दही कळले.” 

 

“भूगोल, इतिहास, सध्या आपल्याला जाणवत असलेल्या समस्या जसे प्रदूषण, वातावरण बदल ह्या सगळ्यांबद्दल  त्या मुलांना विविध पुस्तकांतून आणि गोष्टीतून समजले. ते सहज संदर्भ देऊन अनेक पुस्तकांबद्दल बोलत होते. आम्हाला मात्र जादू आणि राक्षसाच्या गोष्टींशिवाय मुलांसाठी वेगळ्या काही गोष्टी असतात हे माहितच नव्हते.” पूजा म्हणाली. 

 

मुलांच्या लक्षात आले इतका वेळ केवळ ती बोलत आहेत. सर शांत आहेत. ‘आपण फारच बोललो का? सरांना आवडले नाही का?’

 

“सर, आमचं काही चुकलं का?” गणेशने विचारले.

 

“अजिबात नाही. तुमच्यामुळे मला एक कल्पना सुचली आहे. मी तसा विचार खूप वेळा केला होता. पण कसं करायचं हे कळत  नव्हतं.” सर म्हणाले. 

 

“कसली कल्पना सर?”

 

“आपल्या शाळेत ग्रंथालय उभारायचे.” सर म्हणाले. 

 

मुले आनंदाने चित्कारली. “सर, खूप छान कल्पना आहे. कधी कामाला लागायचे?” 

 

“ग्रंथालयासाठी जागा हवी. पुस्तके हवीत. शिवाय नुसती पुस्तके आणून पुरणार नाही तर ती व्यवस्थित ठेवायची तर कपाटे पाहिजेत. फारच खर्च आहे.” सर खिन्न स्वरात म्हणाले. 

 

सरांनी कल्पना सांगितली तेव्हा मुले खूप खुश झाली होती. त्यातल्या अडचणी लक्षात आल्यावर तीही विचारात पडली. 

 

“सर, ती कोपऱ्यातली खोली ग्रंथालयासाठी कशी वाटते?” चित्रकला शिक्षक काकडे सरांनी विचारले. 

 

सगळ्यांच्या नजरा खोलीकडे गेल्या. 

 

“आहे काय त्या खोलीत? मी कधी ती उघडी बघितलीच नाही.” शैलेश म्हणाला. 

 

“अडगळीची खोली असल्यासारखी आहे ती. तुटलेल्या गोष्टी, नको असलेल्या गोष्टी तिथे टाकल्या जातात.” मुख्याध्यापक म्हणाले, “त्या खोलीतल्या अनेक गोष्टी तर माझ्या आधीपासून असतील.”

 

“कोणी खजिना लपवला असेल का तिथे?” राजूचे डोळे चमकले. 

 

“खजिना!! शाळेच्या अडगळीच्या खोलीत!!!” संगीता डोक्याला हात लावत म्हणाली. 

 

“चला तर मग, बघू काय आहे तिथे. ” पाटील बाई म्हणाल्या. 

 

खोलीचे दार उघडताच धुळीच्या मोठ्ठ्या वादळाने त्यांचे स्वागत केले. खोकत खोकत सगळे आत गेले.

 

“खोली मोठी आहे.” सर म्हणाले. 

 

“समोरासमोरच्या भिंतीला खिडक्या आहेत. उजेड भरपूर येईल.” बाई म्हणाल्या. 

 

खोली छानच होती. आत्ता अडगळीच्या सामानाने भरली होती एवढेच. कुठे मोडके बाक, जुन्या खुर्च्या, रद्दीचे गठ्ठे, रिकामी खोकी असे बरेच काही तिथे होते. 

 

“ग्रंथालयासाठी ही खोली पक्की करूया?” मुख्याध्यापकांनी सगळ्यांकडे बघत विचारले. 

 

शुक्रवारी सकाळी प्रार्थनेच्या दिवशी मुख्याध्यापकांनी ग्रंथालयाची कल्पना सगळ्या शाळेला सांगितली. विद्यार्थ्यांचे चेहरे खुलले. “उद्याचा शनिवार आपण आपल्या ग्रंथालयाच्या तयारीसाठी वापरणार आहोत. उद्या शाळेत येताना मुद्दाम जुने कपडे घालून या, मळले तरी चालतील असे.” सरांनी सांगितले. 

 

ह्या वर्षीपासून शनिवार हा आनंदी शनिवार म्हणून जाहिर झाला होता. त्यादिवशी मुलांनी नेहमीचा अभ्यास न करता काही वेगळे करणे अपेक्षित होते. 

 

शाळेत उत्साहाचे वातावरण पसरले. गणेश आणि टीमने कामांची यादी केली. प्रत्येक वर्गाला कामे वाटून दिली. होऊ घातलेल्या ग्रंथालयाच्या कल्पना रंगवत सगळे घरी गेले. 

 

 ——

दुसऱ्या दिवशी फडकी- झाडू घेऊन मुले शाळेत आली. पण नुसती मुलेच नव्हती. बरेच पालकही त्यांच्याबरोबर होते. 

“ सर, फार चांगला उपक्रम आहे. मुलांना खूप उपयोग होईल.” दुसरीतल्या जयचे बाबा म्हणाले. 

 

इतरांनी दुजोरा दिला आणि काम जोमाने सुरू झाले. साफसफाईत बरेच सामान मिळाले. जुने लाकडी शेल्फही मिळाले. ते आडवे टाकून त्यावर काहीबाही रचले होते. सगळ्यांनी मिळून वरचे सामान बाजूला केले आणि शेल्फ उभे केले. 

 

गणेश आणि शैलेशच्या शेजारी राहणारे काका त्यांची सुतारकामाची हत्यारे घेऊन आले होते. मोडलेल्या बाकांची डेस्क त्यांनी भिंतीला झाडाच्या आकारात लावून दिली. काकडे सरांनी त्या झाडाला भिंतीवर पाने रंगवली. झकास शेल्फ तयार झाले. 

Books on a shelf shaped like a tree

चांगले बाकही मिळाले. चित्रकला शिक्षक आणि मुलांनी त्यांना रंगवून नवेकोरे करून टाकले. 

राजूच्या आईने गठ्ठयातून मोठे कागद निवडले आणि त्यावर विविध सुविचार लिहून भिंतीवर चिकटवले.

थोड्याच वेळात त्या अडगळीच्या खोलीचा चेहरामोहरा बदलून गेला. भिंतीना नवीन रंग छान दिसला असता पण सध्या त्याची घाई नव्हती. 

सरांनी मुलांसाठी खाऊ आणि पालकांसाठी चहा मागवला. ग्रंथालय सज्ज तर झाले होते. आता हवी होती ती पुस्तके! 

———

ग्रंथालयासाठी पुस्तके कशी आणायची हाच प्रश्न मनात ठेवून गणेश शाळेतून घरी आला. सिद्धांतने दिलेले पुस्तक त्याने वाचायला घेतले आणि आजीच्या “तोंड उघडून बोलले पाहिजे” ह्या वाक्याने त्याला आता प्रश्नाचे उत्तर मिळाले. 

‘गोगलगाय तिची इच्छा जाहिर करते म्हणून व्हेलला कळते ना की गोगलगाईला जग बघायचे आहे. नाहीतर व्हेल तिच्या इथून खूप वेळा गेला असता. तिला काय हवे आहे हे त्याला कळले नसते. आपली इच्छा व्हेल पूर्ण करू शकतो हे गोगलगाईला कधी कळले नसते. मदत मिळू शकते. आपल्याला मदत हवी आहे हे सांगणे गरजेचे आहे.’ 

गणेशने फोन उचलला. “तोंड उघडून बोललं पाहिजे” मनाशी घोकत त्याने फोन लावला. बराच वेळ तो फोनवर  होता. त्यानंतर कितीतरी वेळ तो काहीतरी लिहीत बसला. 

 “गणेश, शैलेश, चला, पानं घ्या.” आईची हाक आली तेव्हा कुठे त्याचे घड्याळाकडे लक्ष गेले. पोटात कावळे ओरडत आहेत हेही त्याच्या लक्षात आले. स्वयंपाकघरातून लसूण आणि भरपूर कोथिंबीर घातलेल्या पिठल्याचा घमघमाट येत होता. “आलो आलो!” म्हणत तो पळाला. 

जेवण झाले. थोडा वेळ वाचून, टीव्ही बघून सगळे झोपायला गेले. घरात आणि गावातही सामसूम झाली. गणेशला मात्र काही केल्या झोप येईना. कधी एकदा शाळेत जातोय आणि सगळ्यांना सांगतोय असे त्याला झाले होते. एकदा ही कुशी एकदा ती असे बरेच वेळा करून शेवटी झोपायचा प्रयत्न सोडून तो सिद्धांतने दिलेले आणखी एक पुस्तक वाचत बसला. पूर्ण वाचूनच त्याने ते खाली ठेवले आणि आडवा झाला. 

पहाटे कधीतरी झोप लागल्याने सकाळी उशीरा जाग आली. “मला उठवलं का नाही” म्हणत पटापट आवरून तो शाळेत पोहोचला. 

“सर, आपल्या ग्रंथालयासाठी पुस्तकांची सोय झाली.” गणेशने शाळेत पोहोचताच जाहिर केले. 

“काय?” मुख्याध्यापक, शिक्षक आणि गणेशच्या मित्र-मैत्रिणी एकसूरात ओरडलेच. 

“काल संध्याकाळी आपण गेलो तेव्हा एकही पुस्तक नव्हतं आपल्याकडे. आज आली कोठून पुस्तकं?” सरांनी विचारले. 

“आली नाहीत अजून. पण येतील.” गणेश म्हणाला. 

“म्हणजे?”

 “पुण्याचा सिद्धांत आणि त्यांच्या मित्र-मित्रिणींची आपल्यासारखीच गँग आहे. सिद्धांतशी आमची ओळख झाली ती आत्ता स्पर्धेच्या निमित्ताने. त्याच्याकडे भरपूर पुस्तकं आहेत. बोलताना त्याने सांगितलं होतं की त्यांच्या सोसायटीत त्यांनी एक ग्रंथालय सुरू केलं आहे.” गणेश म्हणाला. 

“अरे हो, म्हणला होता तो.” राजू म्हणाला. 

“ग्रंथालय सुरू करायचे तर काय पाहिजे, कसं करायचं हे विचारण्यासाठी काल मी त्याला फोन केला. त्याने त्याच्या गँगला पटापट फोन केला. मग आम्ही सगळे झूमवर बोललो- चारू, मीनल, अरमान आणि शंतनु. 

मी त्यांना आपली ग्रंथालयाची कल्पना आणि अडचण सांगितली. त्यांनी काय केलं हे विचारलं” गणेश म्हणाला. 

सगळेजण उत्सुकतेने ऐकत होते. 

“त्यांनी कसं सुरू केलं ग्रंथालय? पुस्तकांसाठी पैसे कुठून आणले?” सरांनी विचारले. 

“तीच तर गंमत आहे. त्यांना किती खर्च आला माहित आहे ग्रंथालयासाठी?” गणेश डोळे मिचकावत म्हणाला. 

“किती?” 

“सांगू?” 

“गणेश, सांग रे लवकर!!” पूजा ओरडली. 

“शून्य!!” 

“काय? हे कसं शक्य आहे?” 

“त्यांनी ग्रंथालय सुरू करायचं आहे हे सांगताच त्यांच्या सोसायटीतल्या लोकांनी आपल्या घरची पुस्तके ग्रंथालयाला भेट दिली. एवढंच नाही तर सोसायटीच्या सदस्यांच्या नातेवाईकांना जेव्हा हे कळलं, तेव्हा त्यांनीही त्यांच्याकडची पुस्तकं पाठवून दिली. अरमान सांगत होता दोन ते तीन महिन्यांत त्यांचं ग्रंथालय भरून गेलं.”

“अरे वा, छानच! पण त्यांच्या सोसायटीतल्या लोकांकडे पुस्तकं होती. आपल्या गावात काही लोकांकडे पुस्तकं नाहीत. आपल्याला कुठून मिळणार?” 

“मिळाली आहेत!! आमचं झूमवर बोलणं झाल्यावर मीनलने त्यांच्या सोसायटीच्या व्हॉटस्ॅप ग्रुपवर मेसेज पाठवला. आपल्या गावाबद्दल, आपल्या शाळेबद्दल, आपल्या ग्रंथालयाच्या कल्पनेबद्दल त्यात लिहिलं आणि लोकांना त्यांच्याकडची पुस्तकं देण्याचं आवाहन केलं. झूम कॉल संपेपर्यंत तिच्या मेसेजला उत्तरसुद्धा आलं होतं.” गणेश क्षणभर थांबला. 

“काय उत्तर आलं, पटकन सांग ना.” राजू उड्या मारत म्हणाला. मुख्याध्यापक आणि सगळे शिक्षकही तेवढ्याच उत्सुकतेने गणेशकडे बघत होते. 

“एका काकांची दोन्ही मुलं परदेशात आहेत. शिकायला तिथे गेली, आता तिथेच नोकरी करत आहेत. मुलांची  लहानपणची पुस्तकं आहेत. पुस्तकं छानच आहेत. काका त्यातून मुलांनागोष्टी वाचून दाखवायचे. ती पुस्तकं रद्दीत जाऊ नयेत, पुस्तक वाचणाऱ्या कोणाकडे तरी जावीत अशी त्यांची इच्छा आहे. आपल्या शाळेबद्दल मीनलने जे लिहिलं होतं ते वाचून त्यांची खात्री पटली की आपण पुस्तकांची नीट काळजी घेऊ. ते तीस ते पस्तीस पुस्तकं देणार आहेत असं त्यांनी कळवलं. 

त्यांच्याच सोसायटीतली ताई तिच्याकडची वीस पुस्तकं देणार आहे. दहा मिनिटांत पन्नास पुस्तकं मिळाली.” गणेश म्हणाला. 

खरेच तो म्हणाला त्याप्रमाणे लवकरच पन्नास पुस्तके ग्रंथालयात दाखलसुद्धा झाली आणि हा पुस्तकांचा ओघ सुरूच राहिला. कधी दोन पुस्तके, कधी पाच, कधी भलामोठ्ठा गठ्ठा शाळेत येऊ लागला. पुढचे काही दिवस पोस्टमन काकांची रोज शाळेत चक्कर होत होती. शेवटी त्यांनी कुतुहलाने विचारले की ही पार्सल येतात कोणाकडून. 

मुख्याध्यापकांनी त्यांना ग्रंथालय दाखवले. “पुस्तक पाठवणारे आहेत कोण? तुमचे नातेवाईक का?” पोस्टमन काकांनी  विचारले. 

“ह्यातले बरेच लोक आम्हाला ओळखत नाहीत. आपल्या गावाचे नावही त्यांनी कदाचित ह्या आधी ऐकले नसेल.” सर म्हणाले. 

पोस्टमन काकांचा गोंधळलेला चेहरा बघून सरांनी त्यांना सगळी गोष्ट सांगितली. “सुरुवात गणेशच्या मित्रमंडळींमुळे झाली. त्यांच्या सोसायटीतल्या लोकांनी पुस्तके दिली. त्यातला एक मुलगा, शंतनु, त्याची आई सोशल मीडिया मॅनेजर आहे. सोशल मीडियावर जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण कसे पोहोचू शकतो ह्याबद्दल त्या मार्गदर्शन करतात. 

त्यांनी आपल्या ग्रंथालयाबद्दल फेसबूकवर पोस्ट लिहिली, इनस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेयर केला. एक पुस्तकापासून कितीही पुस्तके तुम्ही शाळेच्या ग्रंथालयासाठी पाठवू शकता असे आवाहन करून शाळेचा पत्ता दिला.” 

“अच्छा, त्यामुळेच ही पार्सल यायला लागली.” पोस्टमन काका म्हणाले, “लोक त्यांच्याकडची जुनी पुस्तकं देतात की नवीन?”

“दोन्ही येतात. काही लोकांकडे मुलांच्या लहानपणची आहेत. मुले मोठी झाली. पण त्यांची आवडती पुस्तके वाचणाऱ्या कोणाकडे तरी जावीत असे त्यांना वाटते. काही लोकांनी आपला उपक्रम आवडला म्हणून नवीन पुस्तकंही घेऊन पाठवली. एका जोडप्याने तर आम्हाला लग्नाचा आहेर नको, द्यायची इच्छा असेल तर ह्या शाळेला पुस्तके भेट द्या म्हणून लग्नपत्रिकेतच छापलं.” सरांनी पुस्तकांच्या एका गठ्ठ्याकडे बोट दाखवत सांगितले. 

“अरे वा, छान कल्पना आहे. वाढदिवसालाही किती त्याच त्याच वस्तू मिळतात. मुलांना सांगू तुम्हाला ग्रंथालयासाठी हव्या असलेल्या पुस्तकांची यादी करा आणि त्यातलंच पुस्तक भेट म्हणून मागा.” पोस्टमन काकांनी सुचवले. 

“वा. छान कल्पना आहे. मुलंच कशाला आम्ही सगळेच असं करतो. सणासुदीला अशीच भेट घेऊ आणि देऊ.” सर खुश झाले.   

पुस्तकेच येत होती तोपर्यंत ठीक होते. एक दिवस गणेशला एका आजी-आजोबांचा फोन आला. त्यांना ग्रंथालयाला दोन कपाटे भेट द्यायची होती. ते दोघे पूर्वी लायब्ररी चालवायचे. वयोमानामुळे लायब्ररी बंद केली. पुस्तके कोणाकोणाला देऊन टाकली. बरीच कपाटे गरजू लोक घेऊन गेले. आता दोन त्यांच्याकडे होती. दोन्ही पाठवू का असे विचारायला त्यांचा फोन आला होता. 

‘कपाटे हवी तर होती पण ती आणणार कशी एवढ्या लांबून?’ गणेश मुख्याध्यापक आणि शिक्षकांकडे गेला. कपाटे आणायला टेम्पो लागणार. एवढा खर्च कसा करणार हा प्रश्न होता. आजी-आजोबांना गणेशने सांगितले की आम्ही विचार करून कळवतो. 

 ————–

आज शाळेतल्या पाटील बाईंच्या घरी त्यांचे भाऊ आणि त्यांचे कुटुंबीय राखी पौर्णिमेनिमित्त आले होते. कौतुकाने बाई सगळ्यांना ग्रंथालय दाखवायला शाळेत घेऊन आल्या. 

काही पुस्तके शेल्फवर होती पण बरीचशी जमिनीवरच गठ्ठे करून ठेवली होती. “ग्रंथालय छानच सजलं आहे. पण पुस्तकं अशी खाली का ठेवलीत? कपाटात ठेवली तर मुलांना सोपे जाईल बघणे.” त्यांचा लहान भाऊ म्हणाला. 

“अरे, तिथेच तर अडलं आहे. पुण्यातले एक आजी-आजोबा कपाटे देणार आहेत. ती त्यांच्याकडून इथपर्यंत आणायची कशी हा प्रश्न आहे.” पाटील बाईंनी  सांगितले. 

“एवढंच ना. अगदीच सोपं आहे. मी दर आठवड्याला शेतमाल घेऊन पुण्याला नाही का जात. आम्ही तीन-चार शेतकरी मिळून टेम्पो करतो. जाताना टेम्पो खचाखच भरलेला असतो. येताना रिकामाच येतो. आणतो की तुझी कपाटं त्यातून.”

“हे फारच छान होईल. जमेल नक्की?”

“न जमायला काय झालं. आम्ही नेहमी असं करतच असतो. कोणाला काही अवजार हवी असतात. कोणाच्या मुलांची पुस्तकं असतात. परवा तर गावातल्या शाळेसाठी फळासुद्धा घेऊन आलो. बरं, आपल्या गावाला जायला तुझ्या गावावरूनच तर जातो. हायवेवरून थोडं आत येऊन कपाटं पोहोचवतो.” दादा म्हणाला. 

बाई खूश झाल्या. 

 “बरं, तुला राखीची भेट काय देऊ सांगितलं नाहीस.” निघता निघता दादाने विचारले. 

“ही इतकी  छान भेट आहे, आणखी कशाला काही.” पाटील बाई म्हणाल्या. 

पुढच्याच आठवड्यात आजी-आजोबांकडची कपाटे ग्रंथालयात आली. रविवार असूनही अर्धी शाळा तेथे हजर होती. 

टाळ्यांच्या कडकडाटात पाटील बाईंच्या दादाचे स्वागत झाले. 

कपाटे उघडली तर काय? त्यात फास्टर फेणे आणि फेलुदाचा संपूर्ण  संच! 

“ही छोट्याची राखीची भेट बरं का.” दादा म्हणाला. 

मुलांनी पुस्तकांवर अक्षरशः झडप घातली. एरवी गुण्यागोविंदाने काम करणारी मुले आता मात्र पुस्तक कोण आधी वाचणार ह्यावरून भांडत होती. मुलांकडे सगळे कितीतरी वेळ कौतुकाने बघत होते. 

“ग्रंथालय आणि त्यात पुस्तकांवरून भांडणारी मुले हे माझे स्वप्न होते.” डोळे पुसत मुख्याध्यापक म्हणाले. 

—-समाप्त—--

ह्या गोष्टीतली पात्रे जरी काल्पनिक असली तरी त्यांचा खऱ्या आयुष्यातल्या व्यक्तींशी संबंध आहे. 

———

ही गोष्ट 

आबासाहेब अत्रे आणि इंदिरा अत्रे प्रशाला, पुणे येथले श्री. प्रसाद भडसावळे 

ज्यांनी त्यांच्या शाळेतल्या ग्रंथालयातून अनेकांना प्रेरणा दिली आणि मार्गदर्शन केले 

आणि 

पॅरामाउंट इंटरनॅशनल स्कूल, भिलारेवडी, कात्रज येथील मुख्याध्यापक श्री. प्रकाश भापकर 

ज्यांनी प्रसाद सरांकडून प्रेरणा घेऊन ग्रंथालय सुरू केले 

आणि 

पुण्यातल्या ज्या नागरिकांनी आणि संस्थांनी त्यांना पुस्तके देऊन ग्रंथालय सुरू करायला मदत केली 

त्या सगळ्यांना समर्पित आहे. 

ह्या गोष्टीप्रमाणेच पॅरामाउंट इंटरनॅशनल स्कूलमध्ये ग्रंथालय सुरू झाले. त्यांच्या संपूर्ण प्रवासाबद्दल इथे वाचा,


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *