‘Are You There, God? It’s Me, Margaret’ by Judy Blume
एमीच्या banned booksच्या यादीतलं आणखी एक.
गोष्ट आहे मार्गारेट ह्या 12 वर्षाच्या मुलीची. गोष्ट तीच सांगते. त्यामुळे हे पुस्तक 12 वर्षाच्या मुलीच्या भावविश्वात आपल्याला घेऊन जाते.
मार्गारेट आणि तिच्या तीन मैत्रिणी, पहिला period, त्याबद्दलची त्यांची चर्चा, मैत्रिणीच्या मोठ्या भावाच्या मित्राबद्दल, वर्गातल्या एका मुलाबद्दल वाटणारे आकर्षण, चिडवा-चिडवी, हे वाचताना आपलं teen-age नक्की आठवतं. जसं मिलिंद बोकिल ह्यांचे ‘शाळा’ वाचताना होतं.
मार्गारेटची गोष्ट म्हणजे 12 वर्षाच्या मुलांच्या मनातल्या द्वंद्वाचे सुंदर चित्रण आहे. त्या वयात आपसूक येणारा बंडखोरपणा, मोठ्या लोकांनी सांगितलेल्या गोष्टी तशाच्या तशा न स्वीकारता आपल्या अनुभवांशी पडताळून बघणे, आपली वेगळी ‘ओळख’ निर्माण करण्याची धडपड. हे सगळं गोष्टीत खूप छान आणि सहजपणे आलं आहे.
पुस्तकाची सुरुवात होते ती मार्गारेट आणि तिचे आई-बाबा न्यूयॉर्क सोडून न्यू जर्सीत राहायला येतात तेव्हापासून.
1970च्या दशकात हे पुस्तक प्रकाशित झाले. ज्यूडी ब्लूमच्या इतर अनेक पुस्तकांप्रमाणे हे पुस्तक वादग्रस्त ठरले आणि त्यावर बंदी घातली गेली.
कारण? बहुदा हेच असावे की मार्गारेटचे वडिल ज्यू तर आई ही कॅथलिक आहे. त्यांचं लग्न दोघांच्या घरी अजिबात मान्य नव्हतं. ते दोघं कुठलाच धर्म मानत नाहीत. मार्गारेटवर त्यामुळे कुठल्याच धर्माचे संस्कार नाहीत. ती सज्ञान होईल तेव्हा तिला इच्छा असेल तर तिला हवा तो धर्म तिने स्वीकारावा असे तिच्या आई-वडिलांचे मत आहे.
दर रविवारी ते चर्चला जात नाहीत ह्याचे आजूबाजूच्या लोकांना आश्चर्य वाटते. तो चर्चेचा विषय ठरतो.
मार्गारेट देवाशी बोलते. तिचा देव म्हणजे एक संकल्पना आहे कारण त्याला काही मूर्त स्वरूप द्यायला ती कुठल्याही प्रार्थनास्थळात गेलेलीच नाही.
आपण डायरी लिहावी तसे ती देवाशी बोलते. रोजच्या घडामोडी सांगते.
शाळेत नवीन शिक्षक येतात. त्यांना अभ्यास म्हणून एक आख्ख्या वर्षांचा प्रकल्प देतात. आपल्याला हवा तो विषय निवडायचं स्वातंत्र्य असतं. मार्गारेट धर्म ह्या विषयावर प्रकल्प करायचं ठरवते.
ज्यू आजीबरोबर सिनेगॉगमध्ये कुतूहल म्हणून जाऊन येते. तिथे काही तू मला भेटल्यासारखं वाटलं नाही हेही देवाला सांगते.
आजीबरोबर सिनेगॉगमध्ये जाणार आहे म्हणल्यावर ‘तुझ्यावर कुठलाही दबाव नाही’ एवढंच आई तिला सांगते.
वर्गातल्या एका मुलीला अनावधानाने ती दुखावते. ती मुलगी चर्चमध्ये जाताना दिसते तशी मार्गारेटही जाते. तिथे confession booth दिसतो. आपली चूक लोक तिथे कन्फेस करतात हे तिला माहीत असतं. त्यामध्ये आपलं चुकलं, आपण विचार न करता बोललो ही खंत ती confess करते.
तिचा आणि कुठल्याही प्रार्थनास्थळांचा संबंध बस् एवढाच.
मुलीने ज्यू माणसाशी लग्न केले म्हणून तिच्याशी संबंध तोडलेले मार्गारेटच्या आईचे आई-वडिल पहिल्यांदाच त्यांच्याकडे येतात. मुलीकडून अपेक्षाच नसते, निदान नातीला तरी चांगले ‘वळण’ लावावे म्हणून तिच्यावर कॅथलिक संस्कार करायचा प्रयत्न करतात. आई आणि त्यांचे भांडण होते आणि मार्गरेटचे त्या आजी-आजोबांबरोबर नाते सुरू होण्याआधीच संपुष्टात येते.
कुठल्याच धर्माबद्दल काही खास वाटावं असा तिला अनुभव येत नाही. तसंच ती प्रामाणिकपणे वर्षांच्या शेवटी तिच्या प्रकल्पात लिहिते.
धर्म, देव हयाबद्दल एका बारा वर्षाच्या मुलीच्या मनातले प्रामाणिक प्रश्न आहेत. कुठलाच निष्कर्ष नाही. मार्गारेटला देवाबद्दल, देवाच्या अस्तित्वाबद्दल, धर्माबद्दल पडणारे प्रश्न आपल्या सगळ्यांना कधी ना कधी पडले आहेत.