‘BAN THIS BOOK’ BY ALAN GRATZ – Book Review
‘ह्या सगळ्याची सुरुवात झाली ती माझं आवडतं पुस्तक आमच्या शाळेच्या लायब्ररीतून गायब झालं तेव्हा. अर्थात मला अजून माहित नव्हतं की ते गायब झालं आहे. आपल्या एकुलत्या एक मैत्रिणीची आतुरतेने वाट पाहणाऱ्या एखाद्या मुलीसारखं तेही लायब्ररीच्या कोपऱ्यातल्या नेहमीच्या शेल्फवर माझी वाट बघत असेल असेल अशी माझी कल्पना होती. कधी एकदा मी लायब्ररीत जाते आणि ते माझं आवडतं पुस्तक घेते असं मला झालं होतं.’
एमी तिचं आवडतं पुस्तक घ्यायला लायब्ररीत गेली तेव्हा ते पुस्तक तिथे नव्हतं. तिने सगळीकडे शोधलं. शेल्फवरच्या इतर पुस्तकांच्या मागे चुकून ठेवलं गेलं आहे का तेही बघितलं. पण नाही. ते कुठेच सापडलं नाही.
तिचं आवडतं पुस्तक नेहमी त्याच शेल्फवर असायचं. गेलं कुठे?
तिने लायब्रेरियनकडे चौकशी केली तेव्हा कळलं ते पुस्तक लायब्ररीतून काढून टाकलं आहे. It is taken off the shelf. थोडक्यात म्हणजे त्या पुस्तकावर त्यांच्या शाळेत बंदी घालण्यात आली आहे.
नऊ वर्षाच्या एमीच्या आवडत्या पुस्तकावर बंदी घालण्यात येते आणि इथून आपल्या गोष्टीला खऱ्या अर्थाने सुरुवात होते.
‘मुलांच्या मनावर वाईट परिणाम होईल’, ‘मुलांवर वाईट प्रभाव पडेल’ अशी कारणं देऊन शाळेतल्या एका मुलाची आई अनेक पुस्तकांवर बंदी आणते.
‘मुलांनी कुठली पुस्तकं वाचायची हे ठरवायचा हक्क फक्त त्यांच्या पालकांना आहे. इतरांना नाही.’ ह्या मुद्द्यावर ग्रंथपाल ठाम असते आणि ती ह्या बंदीविरुद्ध लढा देते.
एमीसुद्धा त्या लढ्यात ग्रंथपालाबरोबर उतरते. पण जरा वेगळ्या पद्धतीने. ह्याची सुरुवात होते ती मात्र अगदी नकळत, तिच्याही नकळत.
बंदी घालण्यात आलेल्या एमीच्या लाडक्या पुस्तकाबद्दल तिच्या आई ० वडिलांना काहीच हरकत नसते. पुस्तकावर बंदी आली म्हणून दुःखी झालेल्या एमीला तिचे वडिल पुस्तकाच्या दुकानात घेऊन जातात आणि तिचे स्वतःचे असे पुस्तक तिच्यासाठी घेतात. हे पुस्तक आता तिच्याकडून कोणीच कधीच काढून घेऊ शकणार नाही. पण एमीचे त्यावर समाधान होत नाही.
तिला वाटत असतं, ‘Good books shouldn’t be hidden away.’
तिच्याकडचे पुस्तक तिची मैत्रीण वाचायला घेते, मग तिचा मित्र, मग त्याचा मित्र. ‘ज्यावर बंदी घातली आहे ते पुस्तक एमीकडे आहे’ ही बातमी हळूहळू त्यांच्या वर्गात पसरते. तिच्या पुस्तकाला मागणी येऊ लागते. आणि मग त्यातूनच सुरू होते Banned Books Locker Library – B. B. L. L.
कुठेही अगदी घरीसुद्धा विशेष न बोलणारी, तोंडावर आलेले शब्द गिळून टाकणारी एमी ‘People who said and did whatever they were thinking got into trouble’ असं मानणारी एमी ‘B. B. L. L’ ही बंडखोर चळवळ सुरू करते. ती चळवळ तिच्या वर्गातून सुरू होत संपूर्ण शाळेत पसरते.
ह्या लायब्ररीबद्दल शेवटी मुख्याध्यापिकांना कळतं, नियमक मंडळाची बैठक बोलावली जाते. एरवी एकही शब्द न बोलणारी एमी शेवटी शाळेचे नियमक मंडळ, मुख्याध्यापिका, शिक्षक, पालक ह्यांच्यासमोर धीटपणे सगळ्या विद्यार्थ्यांच्या वतीने बाजू मांडते.
हे सगळं झाल्यावर तिच्या मनात एक विचार येतो, ‘ह्या पुस्तकांवर बंदी घातली कारण एका पालकाला वाटलं ही पुस्तक वाचून मुलं चोरी करतील, खोटं बोलतील, मोठ्यांचे ऐकणार नाहीत.
मी ह्या सगळ्या गोष्टी केल्या पण ही पुस्तकं वाचत असताना नाही तर ह्या पुस्तकांच्या वाचण्यावर बंदी घातल्यावर. ही पुस्तकं वाचत होते तेव्हा ह्यातलं काहीच मी करत नव्हते. तेव्हा मी अगदी आज्ञाधारक मुलगी होते, कधी खोटं बोलत नव्हते, मोठे सांगतील ते सगळं ऐकत होते.
मला वाटलं हा मजेशीर विचार आई-बाबांना सांगावा आणि मी सांगितला.’
इथे पुस्तक संपतं.
एमीची व्यक्तिरेखा रशियन लेखक निकोलाई गोगोलच्या The Overcoat ह्या गोष्टीची आठवण करून देते. त्यातला नायक बाशचमकिन त्याचा जुना जीर्ण ओव्हरकोट टाकून नवीन घ्यायचा ठरवतो. एरवी अगदी नीरस आयुष्य जगणाऱ्या त्याला नवीन ओव्हरकोटच्या रूपाने एक ध्येय मिळतं. नव्या ओव्हरकोटसाठी पैसे साठवताना, नवीन ओव्हरकोट कसा असेल हे स्वप्न रंगवताना, त्यासाठी कापड निवडताना, डिझाईन ठरवताना त्याच्या डोळ्यात एक चमक येते, चालण्या-बोलण्यात आत्मविश्वास येतो हे बदल खूप छान रंगवले आहेत. ती गोष्ट अर्थात पुढे खूप वेगळं वळण घेते पण एक ध्येय तुमच्या व्यक्तिमत्वात कसा बदल घडवू शकतं हे Ban this Book च्या एमीला भेटूनही जाणवतं.
लेखक अॅलन ग्रॅट्झ म्हणतो, ‘Every book banned by the school board in this novel is the title of a book that has been challenged or banned in an American library at least once in the last thirty years.’
ता. क.: ह्या पुस्तकावर म्हणजे Ban this Book वर जून २०२४मध्ये अमेरिकेतल्या फ्लोरिडा राज्यात बंदी घालण्यात आली आहे.