नाईकी शूज, पिवळे बदक आणि पॅसिफिक महासागर
“ते तुमच्या मागच्या कपाटात काय आहे?” अरमानने विचारले.
“कुठे?”
“ते.. पिवळ्या रंगाचं बदक?”
“अच्छा ते होय..”
“ते खेळण्यातलं बदक तुम्ही शोकेसमध्ये का ठेवलंय?” सगळ्यांच्याच मनात असलेला प्रश्न शेवटी शंतनुने विचारला.
“मी लहान असताना अंघोळ करायला जाम घाबरायचो. माझा अंघोळीचा एक छोटा टब होता. त्यात मला ठेवलं रे ठेवलं की मी खूप रडायचो. म्हणून बाबाने अगदी असंच पिवळ्या रंगाचं पाण्यावर तरंगणारं बदक माझ्यासाठी आणलं होतं. त्या बदकाशी खेळत न रडता मग माझी अंघोळ पार पडायची असं आई सांगते.” सिद्धांत म्हणाला.
“तुम्हीसुद्धा आंघोळ करताना घाबरायचात?” शंतनुने विचारले.
मीनलचे काका खो खो हसायला लागले. त्यांच्या आवाजाने काय झाले ते बघायला शेजारच्या खोलीतून मीनलची काकू पळत आली.
“अरे, किती जोरात हसलास, दचकले ना मी.” असे काकांना दटावून ती मुलांना ‘हॅलो’ म्हणाली.
“अगं, बस ना, मीनल आणि गँगशी ऑनलाईन गप्पा मारत आहे. आता ह्यावेळी पुण्याला जाऊ तेव्हा ट्रीहाऊसमध्ये काही नवीन गोष्टी करायच्या आहेत त्याची चर्चा करत होतो तर शंतनु बघ काय म्हणतोय.”
काकाने सांगताच काकूही हसायला लागली.
“त्या छोट्या बदकाची गोष्ट खूप मोठी आहे बरं का.” हसू आवरत काकू म्हणाली. गोष्ट म्हणताच गँगचे कान टवकारले.
“मला ऐकायची आहे मोठी गोष्ट.” शंतनु तर नाचायलाच लागला.
“गोष्ट ऐकायची?”
“नक्की?”
“हो!!!”
“आत्ताच?”
“हो!!!”
“खरंच?”
“ए, काय रे काका.” मीनल म्हणाली.
“बरं, बरं, सांगतो”, डोळे मिचकावत काका म्हणाला, “पण ही गोष्ट सांगायची तर त्याच्या आधी आणखी एक गोष्ट सांगावी लागेल. चालेल का तुम्हाला?”
“दोन गोष्टी!! अर्थातच चालेल काका.” चारू म्हणाली.
“चालेल काय पळेलसुद्धा!” सिद्धांतने पुष्टी जोडली.
“बेस्ट!! फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे…..”
“हो?”
“नाही रे, मला आपलं वाटलं गोष्टीची सुरुवात ही अशीच करायची असते.”
“ए काकू, काकाला सांग ना नीट गोष्ट सांगायला.” मीनलने थेट काकूकडेच तक्रार केली.
“बरं बरं, सांगतो, नाहीतर काकू मला उठाबशा काढायला लावायची. १९९१ चा जून महिना होता. नाईकी कंपनीचे शेकडो शूज अमेरिकेतल्या विविध किनाऱ्यांवर मिळायला लागले. ब्रिटिश कोलंबिया, वॉशिंग्टन, ओरेगॉन राज्यात समुद्रकिनाऱ्यावर गेलेले लोक नाईकीचे नवीन कोरे शूज घेऊन परत येऊ लागले. थोडे फार चिकटलेले शंख शिंपले सोडले तर बाकी शूज एकदम व्यवस्थित होते.
ते शूज समुद्रातून वहात येत होते. अर्थात ते जोडीने काही येत नव्हते. एक एक सुटा शूज किनाऱ्यावर येऊन थडकत होता. मग काय. आपल्याला मिळालेले विजोड शूज घेऊन लोक आपापसात जोडी शोधू लागले. असं देवाण-घेवाण करणाऱ्यांचा बाजारच भरला. समुद्रकिनाऱ्याला अगदी जत्रेचं रूप आलं.
देशभरातले पत्रकार तेथे धाव घेऊ लागले. ही घटनाच इतकी वेगळी होती की आधी कोण फोटो काढतो आणि बातमी देतो ह्यासाठी त्यांची चुरस लागली. वर्तमानपत्रांत ठळक बातम्यांत शूजची बातमी झळकू लागली.
‘हयाबद्दलचंच काहीतरी काम आहे ना रे तुझं?’ कर्टीस् एब्समेयरच्या आईने असंच एका वर्तमानपत्राचं कात्रण त्याला दाखवत विचारलं.
कर्टीस् एब्समेयर हा ओशनोग्राफर आहे म्हणजे समुद्रांचा अभ्यास करणारा शास्त्रज्ञ. आई-वडिलांकडे सुट्टीच्या दिवशी आलेल्या कर्टीस् एब्समेयरला कल्पनाही नसेल की ते कात्रण त्याच्या आयुष्यात किती महत्वाचे ठरणार होतं.
———–
हे बूट आले कोठून? सगळ्यांना हा प्रश्न पडला होता. त्याचं उत्तर होतं ते साधारण एक वर्ष आधी घडलेल्या एका घटनेत. तो दिवस होता २७ मे १९९०. ‘हॅन्सा कॅरियर’ नावाचं एक मालवाहू जहाज दक्षिण कोरियाची राजधानी सेऊलहून अमेरिकेत लॉसअँजिलीसकडे निघालं होतं.
मालवाहू जहाजे सामानाची ने-आण करत असतात. माल हा स्टीलच्या मोठया पेटाऱ्यांमध्ये भरलेला असतो. हे पेटारे एकमेकांना बांधून मग जहाजाला बांधलेले असतात.
पेटारे बांधणं हे खूप कौशल्याचे काम आहे बरं का. इतके अवजड पेटारे असतात की जहाजाच्या एकाच बाजूला वजन जास्ती आले तर वादळात जहाज कलंडण्याची शक्यता असते. पेटारे बांधण्यासाठी दोरीसुद्धा साधीसुधी नाही तर स्टीलची असते.
एवढं करूनसुद्धा अनेक वेळा पेटारे समुद्रात पडतात. ते पेटारे एकमेकांना बांधलेले असल्याने एखादा पेटारा पडत नाही तर आख्खी चळतच खाली येते.
१९९०च्या दशकात दरवर्षी दहा एक हजार पेटारे तरी समुद्रात पडले असतील असा अंदाज आहे. पेटारा पडला की गेला. त्या अथांग समुद्रात तो परत मिळण्याची शक्यताच नाही.
२७ मे ह्या दिवशी हॅन्सा कॅरियर वादळाच्या तडाख्यात सापडले. जहाजावर लादलेल्या पेटाऱ्यांपैकी सत्तावीस पेटारे पॅसिफिक महासागरात पडले. त्यातल्या पाच पेटाऱ्यात होते शूज. सगळे मिळून एकूण ७८,९३२ शूज होते. तेसुद्धा साधेसुधे शूज नाहीत. नाईकी कंपनीचे स्पोर्ट्स शूज, ट्रेकिंगचे शूज आणि लहान मुलांचे शूज होते ते.”
“माझेसुद्धा नाईकीचे शूज आहेत. निळ्या रंगाचे.” शंतनु आनंदाने चित्कारला.
“हो का!” काकूने त्याला कौतुकाने दाद दिली.
काकाने गोष्ट पुढे सुरू केली. “अर्थात पेटारे पडले आहेत हे बाहेर कोणालाच कळलं नाही. अशा बातम्या कायमच लपवून ठेवल्या जातात कारण जहाजांच्या कंपनीसाठी ती फारच नामुष्कीची गोष्ट असते. पेटारे समुद्रात पडतात आणि समुद्राच्या तळाशी जाऊन बसतात. कोणालाच काही कळत नाही.
ह्यावेळी मात्र तसं झालं नाही. इतर कोणी नाही तर खुद्द शूजनंच पोलखोल केली.
पाचपैकी चार पेटारे लाटांच्या तडाख्यात उघडले, त्यातले शूज बाहेर आले आणि पाण्यावर तरंगू लागले.
अपघातानंतर साधारण आठ महिन्यांनी म्हणजे १९९१च्या जानेवारी महिन्यात पॅसिफिक महासागरात तरंगणारे हे शूज अमेरिकेच्या किनारपट्टीवर पोहोचले.
वारे आणि समुद्री प्रवाह ह्यामुळे काही शूज व्हॅनकुवर आयलंड, क्वीन शारलेट आयलंडच्या किनाऱ्याला लागले. उन्हाळ्यात वाऱ्यांची दिशा बदलली तसे हजारो शूज अमेरिकेच्या ओरेगॉन राज्यात किनाऱ्यावर आले. गंमत म्हणजे नाईकीचे मुख्य ऑफिस ओरेगॉन राज्याची राजधानी पोर्टलंड येथेच आहे.
एखादा शूज पाण्याच्या प्रवाहात वहात येऊन किनारपट्टीवर थडकणं हयात काही विशेष नाही. तो काय बोटीवरच्या माणसाचा चुकून पडलेला शूज असू शकतो. पण जेव्हा असे हजारो शूज येतात तेव्हा बातमी ठरते. आणि तेच झाले. पत्रकारांनी बातमी आणि फोटोसाठी समुद्रकिनाऱ्याकडे धाव घेतली. असंच बातमीचं कात्रण कर्टीस्च्या आईच्या वाचनात आलं आणि त्याच्यापर्यंत पोहोचलं.
कर्टीस् अनेक वर्षे समुद्री प्रवाहांचा अभ्यास करत होता. सागरी प्रवाह कोठून कसे वाहतात हे समजून घ्यायला हे शूज उपयोगी पडतील असं त्याला वाटलं. त्यासाठी हे शूज नक्की कोठून आले आहेत हे कळणं महत्वाचं होतं. पण ते काम इतकं सोप नव्हतं.
जहाज ज्या कंपनीचे होतं त्यांच्याकडे चौकशी केली तर आमचा काही माल हरवलेलाच नाही असं उत्तर मिळालं. ज्या जहाजावरून हे शूज समुद्रात पडले त्या जहाजावरचे कर्मचारीही काही थांगपत्ता लागू देत नव्हते. मग ज्यांचा माल हरवला आहे त्यांच्याकडे तरी चौकशी करून बघू म्हणून कर्टीस् नाईकी कंपनीकडे गेला. तेथे मात्र त्याला आवश्यक माहिती आणि मदत मिळाली.
अपघात नक्की कुठे झाला म्हणजे अपघातस्थळाचे अक्षांश, रेखांश, जहाजावर किती पेटारे होते, त्यातले किती समुद्रात पडले, प्रत्येक पेटाऱ्यात किती शूज होते ही सगळी माहिती नाईकीने पुरवली. त्यांच्या नोंद ठेवण्याच्या काटेकोर पद्धतीमुळे सापडलेला प्रत्येक शूज हा त्या पाच पेटाऱ्यांपैकी नक्की कुठल्या पेटाऱ्यातून आला आहे हेसुद्धा कळू शकलं.
त्यामुळे किनाऱ्यावर मिळालेला शूज हा हॅन्सा कॅरियरवरून त्या दिवशीच्या अपघातात पडलेला आहे की नाही हेही त्याला कळलं.
शिवाय हेही लक्षात आलं की मिळालेले सगळे शूज हे चार पेटाऱ्यांतले होते. पाचव्या पेटाऱ्यातला एकही शूज मिळाला नाही. कदाचित पाचवा पेटारा उघडलाच नाही? स्टीलचा असल्याने तो समुद्राच्या तळाशी जाऊन बसला असेल? पुढे काही हजार वर्षांनी एखाद्या पाणबुड्याला मिळेल ही तो पाचवा पेटारा कदाचित.”
“पाच हजार वर्षांनी तो पेटारा मिळाला तर? त्यावेळचे लोक असे शूज वापरत असतील तर ठीक! नाहीतर ते काय आहे असा प्रश्न पडेल ना त्यांना?” चारू म्हणाली.
“छान प्रश्न आहे. काय काय अंदाज करतील ते लोक? निबंध लिहा बरं ह्या विषयावर.” काका म्हणाला.
सगळे हसले.
“एरवी कर्टीस् अशा वहात आलेल्या गोष्टींचा अभ्यास करतच होता,” काकाने गोष्ट पुढे सुरू केली, “ एखादी वस्तू समुद्रातून वहात किनाऱ्याला लागते, तेव्हा ती वस्तू किनाऱ्यावर कुठे मिळाली ती जागा माहित असते. पण ती वस्तू नक्की कोठून वहात आली, कर्टीसच्या भाषेत ‘पॉइंट A’ कुठला ते कळत नाही. त्यामुळे त्या वाहणाऱ्या वस्तूंचा अभ्यास करून समुद्री प्रवाहांची माहिती मिळवण्यात अडचणी येतात.
हा अपघात मात्र वेगळा ठरला. इथे तसं झालं नाही कारण नाईकीच्या मदतीने त्याला अपघात नक्की कुठे झाला म्हणजे ‘पॉइंट A’ कळला. तर शूज किनाऱ्याला लागत होते ते नक्की कुठे ते म्हणजे ‘पॉइंट B’ लोकांच्या मदतीने कळले. ही सगळी माहिती गोळा करून सागरी प्रवाहांच्या ज्ञानात अमूल्य भर पडणार होती. ह्या संधीचा जास्तीत जास्त उपयोग करून घ्यायचं त्याने ठरवलं.
जिम इनग्राहम ह्या त्याच्या मित्राने एक सॉफ्टवेअर तयार केले होते. सॅमन मासे स्थलांतर कसे करतात हे समजून घेण्यासाठी. त्याला सिम्युलेटर म्हणतात. सिम्युलेटरला आपण काही माहिती म्हणजे डेटा पुरवायचा. त्या माहितीवरून मग सिम्युलेटर पुढच्या घटनांचा अंदाज वर्तवू शकतो.
मासे आणि नाईकी शूज ह्यांत फरक एवढाच की मासे पोहतात त्यामुळे त्यांना स्वतःचा वेग असतो. शूज मात्र लाटांवर तरंगत जिकडे प्रवाह नेतील तिकडे जात होते. अर्थात जिमसाठी ही काही फार मोठी अडचण नव्हती. माशांचा वेग वजा करून त्याने त्याचा प्रोग्राम तरंगणाऱ्या ह्या शूजसाठी सज्ज केला.
सिम्युलेटरसाठी गरज होती ती किती शूज मिळाले आणि ते कुठे मिळाले ह्या माहितीची. ही पुरेशी माहिती मिळाली तर मग त्याच्या आधारे आणखी कोठे शूज मिळू शकतील त्या जागांचा अंदाज वर्तवणे शक्य होणार होते.
शूज जेथे किनाऱ्याला लागले ते पॉइंट B. शूजच्या बाबतीत पॉइंट A सगळ्यांचा एकच होता.
दोघांनी सिम्युलेटरची परीक्षा घेतली. त्यांच्याकडे असलेल्या माहितीमधले शूज जेथे मिळाले ते म्हणजे पॉइंट B माहित होते. त्यांच्यासाठी केवळ पॉइंट A देऊन त्याला संभाव्य पॉइंट B कुठे असतील हे शोधायला सांगितले. त्याने दिलेली उत्तरे ह्यांच्याकडे असलेल्या पॉइंट B बरोबर जुळली. म्हणजे सिम्युलेटर बरोबर काम करत होता.
डेटा जेवढा जास्ती मिळेल तेवढे उरलेल्या शूजच्या संभाव्य जागा, ह्याचा अंदाज करणे सोपं जाणार होतं. तो अंदाज बरोबर आला की आपलं सागरी प्रवाहांबद्दलचं ज्ञान वाढणार होतं.
हे काम तितकं सोपं नव्हतं. एवढा विस्तीर्ण समुद्रकिनारा. शूज कुठेकुठे किनाऱ्यावर येऊन धडकत होते. शिवाय नाईकीचे नावेकोरे शूज. ते दिसले तर काय कोणी तसेच ठेवणार का? एवढ्या शूजची माहिती कुठे आणि कशी मिळवायची?
मग त्यांना भेटला एक अवलिया. त्याचे नाव स्टीव्ह. समुद्रकिनाऱ्यावर हिंडून समुद्रातून वहात आलेल्या वस्तू गोळा करणं हा त्याचा छंद आहे. ह्याला बीच-कोम्बिंग म्हणतात. काही लोक नाणी जमवतात, काही पोस्टाच्या स्टॅम्पस्चा संग्रह करतात, तसाच हा स्टीव्हचा छंद आहे.
स्टीव्हला शूज मिळायला लागले तसे त्याने ते स्वच्छ करून घरी शेल्फवर ठेवायला सुरुवात केली. जास्ती शूज मिळत गेले तशा त्याला जोड्याही सापडत गेल्या. जोडी झाली की तो शूज विकायचा. ते त्याचं अर्थार्जनाचं साधन झालं. तो नुसतेच शूज गोळा करत नव्हता तर प्रत्येक शूज कुठे मिळाला ह्याची अत्यंत काटेकोर नोंद त्याने ठेवली होती. सुमारे १३०० शूजचे ‘पॉइंट B’ एका झटक्यात त्याच्याकडे मिळाले. कर्टीस् आणि जिमसाठी हा खजिनाच होता. एका वर्षाने काही शूज हवाई बेटावर पोहोचले.
१९९२ वर्ष आलं ते नवीन माहितीचा खजिना घेऊन.
दहा जानेवारी १९९२ सालची ही गोष्ट. ‘एव्हर लॉरेल’ नावाचं जहाज हाँगकाँगहून अमेरिकेत वॉशिंग्टन राज्यातल्या टाकोमा इथे निघालं होतं.”
“थांब हा काका, मी ग्लोब आणतो.” सिद्धांत तडक उठला आणि शेल्फवरचा ग्लोब त्याने आणला.
गँग ग्लोबभोवती घोळका करून बसली.
“सापडलं का हाँगकाँग?” काकाने विचारले.
“हो!!”
“टाकोमा नाहीये इथे, पण वॉशिंग्टन राज्य आहे. त्यावरून अंदाज येतोय जहाज कसं जात होतं.”
“समुद्र कुठला आहे दोन्हीच्या मध्ये?”
“पॅसिफिक!”
“बरोब्बर. मोठं मालवाहू जहाज होतं तेही. स्टीलचे मोठमोठाले पेटारे त्यावर लादलेले होते. प्रत्येक पेटारा ८० फूट लांब आणि ४० फूट रुंद होता.”
“म्हणजे आमच्या घराच्या हॉलपेक्षाही मोठा. आम्हाला शाळेचा प्रोजेक्ट म्हणून घरातल्या सगळ्या खोल्यांची लांबी आणि रुंदी मोजायला सांगितली होती.” शंतनु म्हणाला.
“शू!!!” सिद्धांतला हा व्यत्यय अजिबात सहन झाला नाही.
“हो, म्हणजे तुम्हाला कल्पना आली की शंतनुच्या घराच्या हॉलपेक्षाही तो एकेक पेटारा मोठा होता. असे अनेक पेटारे जहाजावर होते. प्रत्येक पेटाऱ्यात काही ना काही सामान होतं. हे पेटारेसुद्धा स्टीलच्या दोरीने बोटीला बांधले होते. हाँगकाँगजवळ पॅसिफिक महासागरात जहाज इंटरनॅशनल डेटलाईनजवळ असताना एक मोठ्ठं वादळ आलं.”
“काका, इंटरनॅशनल डेटलाईन म्हणजे काय?” अरमानने विचारले.
“उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव ह्यांच्यातली ही एक काल्पनिक रेषा आहे. ती पॅसिफिक समुद्रातून जाते”.
“काल्पनिक म्हणजे?” इति शंतनु.
“म्हणजे समुद्रात अशी काही रेषा नाही. ती रेषा केवळ आपल्या नकाशात असते. जसे अक्षांश आणि रेखांश किंवा विषुववृत्त आहे, बरोबर ना?” चारू म्हणाली.
“अगदी बरोबर चारू. आणि रेषा म्हणलं तरी ती सरळ नाही बरं का. वाटेतल्या बेटांना, देशांना टाळत ती काढली आहे त्यामुळे ती नागमोडी आहे अनेक ठिकाणी.”
“पण तिचा उपयोग काय?” अरमानने विचारले.
“पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरत सूर्याभोवती फिरण्याने दिवस-रात्र होतात. पृथ्वीचा भाग जसजसा सूर्यासमोर येतो तसतसा त्या भागांत दिवस होतो. सूर्याच्या विरुद्ध दिशेला जो भाग जातो तिथे अंधार असतो म्हणजे रात्र होते. त्यामुळे सगळीकडे सारखी वेळ नसते. एखाद्या ठिकाणी जेव्हा सकाळ, तेव्हा एखाद्या ठिकाणी सूर्य अगदी माथ्यावर असतो, म्हणजे दुपार झालेली असते. दोन ठिकाणांतले अंतर जेवढं जास्ती तेवढा त्यांच्यातला फरक जास्ती. पूर्वी खलाशी लोक जेव्हा जहाजाने लांबच्या प्रवासाला निघायचे तेव्हा ते निघायचे ते ठिकाण आणि ते पोहोचायचे त्या ठिकाणची स्थानिक वेळ हयात फरक पडलेला असायचा. कधी कधी तो एक अख्ख्या दिवसाचाही असायचा. तसेच सागरी मोहिमा आखायच्या तरी हीच अडचण यायची. त्यामुळे काहीतरी अॅडजस्टमेंटची गरज आहे हे लक्षात आलं. आणि ही इंटरनॅशनल डेटलाईन ही संकल्पना पुढे आली.
आपण ती ओलांडतो तेव्हा तारीख बदलते. मी अमेरिकेत रहात होतो ना, तेव्हा जेव्हा भारतात यायचो, तेव्हा माझा एक दिवस वगळला जायचा.”
“म्हणजे?”
“म्हणजे मी १० मार्चला अमेरिकेतून निघालो तर मी भारतात पोहोचायचो ते १२ मार्चला. माझा ११ मार्च गायब व्हायचा कारण मी इंटरनॅशनल डेट लाईन ओलांडायचो.”
“ओह, अच्छा, लक्षात आलं.”
“आणि भारतातून अमेरिकेत जाताना?”
“तेव्हा एक दिवस मिळेल. म्हणजे तुम्ही १० मार्चला भारतातून निघालात तर १० मार्चलाच अमेरिकेला पोहोचाल.”
“बरोब्बर!!”
“तुम्ही उत्तर ध्रुवावर असाल तर?” सिद्धांतने विचारले.
“मस्त प्रश्न आहे. काय होईल मग?”
“तसा काही अर्थ राहणार नाही त्या लाईनला. एक पाय इकडे टाकला की तारीख बदलेल.” चारू म्हणाली.
“हू, खरं आहे. वेळ काय दिशांनाही फारसा अर्थ राहणार नाही तिथे.” मीनल म्हणाली.
“म्हणजे?”
“पिवळ्या बदकाची गोष्ट कधी सांगणार?” भरकटलेल्या चर्चेला कंटाळून शंतनु म्हणाला.
“अरे हो, जहाज राहिलं तिथेच, आपणच भरकटलो. मुलांनो, उत्तर ध्रुवावरच्या दिशा आणि वेळ ह्याबद्दल परत कधीतरी बोलू. चला तर मग शंतनु, आपली गोष्ट पुढे सुरू ठेवू.”
कपाळावरची आठी जाऊन आता शंतनुच्या चेहऱ्यावर एक छान हसू आले.
“कुठे होतं आपलं जहाज?”
“काका, इंटरनॅशनल डेट लाईनजवळ. तिथे वादळही आलं होतं” मीनलने आठवण करून दिली.
“अरे हो! एवढं प्रचंड जहाज पण त्या वादळी वाऱ्यांमध्ये अक्षरशः खेळण्यासारखं इकडे तिकडे फेकलं जात होतं. वादळाच्या तडाख्यात जहाजावरचे बारा पेटारे निसटून समुद्रात पडले. लाटांच्या धक्क्याने एक पेटारा उघडला आणि त्यातलं सामान बाहेर पडलं. काय होतं त्यात?
‘फर्स्ट क्राय’ ह्या खेळणी तयार करणाऱ्या कंपनीने तयार केलेली एकूण २८,८०० खेळणी त्यात होती. खास लहान मुलांच्या टबमध्ये पाण्यात सोडण्यासाठी, पाण्यावर तरंगणारी खेळणी होती ती.
चार खेळण्यांचा संच होता. निळे कासव, लाल बिव्हर, हिरवा बेडूक आणि”
“पिवळे बदक!” शंतनुने वाक्य पूर्ण केले.
“तुला कसं कळलं?” मीनलने विचारले.
“बदकावरूनच तर गोष्ट सुरू झाली होती ना, मग त्यात बदक असणारच ना?” एवढे साधे कसे समजत नाही अशा स्वरात शंतनु म्हणाला.
“बरं हा, एवढा भाव खायला नको” मीनल वेडावत म्हणाली.
“किती बोलता तुम्ही. काकाला गोष्ट सांगू दे ना.” सिद्धांत वैतागला.
त्यांची एकमेकांत वादावादी चालू व्हायच्या आधी काकाने गोष्ट पुढे सुरू केली आणि परत सगळे गोष्टीत गढले.
“ह्या चार खेळण्यांचा एकत्र संच होता. कडक, पारदर्शक प्लॅस्टिकच्या वेस्टनात ही चार खेळणी ठेवली होती. मागच्या बाजूला पुठ्ठा होता. समुद्रात पडल्यावर काही वेळाने प्लॅस्टिक आणि पुठ्ठा एकत्र रहावे म्हणून लावलेला डिंक विरघळला. प्लॅस्टिकचे वेस्टन आणि पुठ्ठा बाजूला झाल्यावर खेळणी बाहेर आली.”
“मग बुडली ती?”
“बुडतील कशी? पाण्यावर तरंगण्यासाठीच तयार केली होती ना.” अरमान म्हणाला.
“बरोबर. त्यामुळे ही खेळणी बाहेर आली आणि पाण्यावर तरंगू लागली. इथेच ते सगळं संपलं असतं. वादळाच्या तडाख्यात एक जहाज सापडलं, जहाजावरचा पेटारा समुद्रात पडला. नवीन काहीच नव्हतं. हे पहिल्यांदाच घडत नव्हतं. दरवर्षी चीन मधून सुमारे ३०० बिलियन डॉलर किमतीचा माल समुद्रमार्गे अमेरिकेत पाठवला जतो. दरवर्षी हजारो टन म्हणजे लाखो किलो माल जहाजावरून अपघाताने समुद्रात पडतो. ही त्यातलीच एक घटना ठरली असती.
पण नाईकी शूजप्रमाणे ही खेळणीसुद्धा समुद्रकिनाऱ्यावर दाखल होऊ लागली आणि नाईकी शूजपेक्षा प्रसिद्ध झाली.”
“तुम्हाला हे बदक पॅसिफिक महासागरात मिळालं?”
“तिच तर खरी गंमत आहे. पॅसिफिक महासागरात पडलेलं हे बदक मला मिळालं ते अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यावर.” काका म्हणाले.
“हॅ?”
“आणि हे होतच राहिलं. कुठे कुठे माहित आहे? ही खेळणी अटलांटिक महासागराच्या अनेक किनारी प्रदेशात मिळाली. पुढे अमेरिकेतील अलास्का राज्यात मिळली तसेच आर्टिकमधील बर्फातही सापडली. ह्यावरून काय कळलं माहित आहे?”
“की बदकाला पोहता येतं?” चारू म्हणाली.
काका परत जोरात हसले.
“काही विशिष्ट प्रवाह समुद्रात आहेत, त्यानं विशिष्ट दिशा आहे. त्याबद्दल आपल्याला अंदाज होता पण खात्रीशीर माहिती इतके दिवस नव्हती. म्हणजे ती पिवळी बदकं मिळेपर्यंत.
ही खेळणी जसजशी लोकांना मिळू लागले तसे कर्टीसला एक कल्पना सुचली. त्याने एक वेबसाईट तयार केली. लोकांना ही खेळणी मिळाली की त्यांनी वेबसाईटवर खेळणं जिथे मिळालं त्या जागेचं नाव नोंदवायचं. लोकांनी त्याला उस्फूर्त प्रतिसाद दिला.
शूज आणि पिवळ्या बदकांनी आपल्याला सागरी प्रवाहांबद्दल खूप माहिती दिली. त्यातून पुढे एब्समेयर अँड इंग्रहाम्स हे मॉडेल तयार झालं. पेटारे अपघाताने जहाजावरून समुद्रात पडले. त्या दोघांनी ह्या अपघातातून ज्ञान वाढवण्याची संधी शोधली.”
“ते म्हणतात ना, When life gives you lemons, make lemonade. नशीबाने तुम्हाला लिंबं दिली तर तुम्ही त्यापासून लिंबु सरबत करा…” चारू म्हणाली.
“खरंच, प्रत्येक अडचणीवर मात करणं हे आहेच, पण त्या अडचणीत संधी शोधणं आणि त्याचा चांगला उपयोग करणं हीसुद्धा खूप मोठी गोष्ट आहे बरं का मुलांनो.”
———–समाप्त————