Story of a Bottle

एका बाटलीची गोष्ट

पियानोच्या keys, बिलियर्डसचे बॉल ह्यासारख्या अनेक गोष्टीसाठी हस्तिदंत वापरले जात होते. त्यासाठी हत्तींची मोठ्या प्रमाणावर शिकार होत होती. १८६७ साली तो आकडा लाखांत गेला. त्यावर्षी एकट्या इंग्लंडला हस्तिदंत पुरवण्यासाठी ४४,००० हत्तींची शिकार झाली.

हत्तींचे कळप रोडावू लागले तशी उत्पादकांना काळजी वाटू लागली. म्हणजे  हत्तींची नाही, कच्च्या मालाची!! फेलन आणि कॉलेंडर ह्या उत्पादकाने हस्तिदंताला पर्याय शोधणाऱ्याला बक्षीस जाहिर केले आणि प्रयोग सुरू झाले.

प्लॅस्टिक निर्माण झाले ते ह्या उद्देशाने. पण आता अनेक वर्षे वापरात असल्याने ह्या मटेरियलच्या फायदयांबरोबर तोटे लक्षात आले आहेत. ते वापरात असताना त्यातल्या रसायनांचा आपल्या शरीरावर होणारा परिणाम, वापर संपला, ते कचरा ठरले, की त्याचा मायक्रोप्लॅस्टिकच्या रूपाने निसर्गावर आणि पर्यायाने आपल्या शरीरावर होणारा परिणाम हे भयंकर आहेत हे लक्षात आले आहे.

आता काय करायचे? आत्ताच मायक्रोप्लॅस्टिकने आपल्या अन्न साखळीत प्रवेश केला आहे. आपल्या नद्या, माती, समुद्र प्रदूषित आहेत. आपल्या रक्तात मायक्रोप्लॅस्टिक मिळत आहे. 

आहे हेच चालू राहिले, असेच चालू राहिले, काहीच बदल झाला नाही तर पुढे काय होईल? निसर्गाच्या आरोग्याचे आणि आपल्या आरोग्याचे?

————————

एका बाटलीची गोष्ट 

“अरमान, जरा गिरणीतून दळण घेऊन ये ना.” आईने अरमानला सांगितले. 

“ए, आई, मी चित्रं काढतोय ना.” अरमानने कुरकुर केली. 

“अरे, मग चित्र काढून झालं की जा. आज जा म्हणजे झालं.” आई अरमानचे चित्र कौतुकाने बघत म्हणाली. 

“येतो ग जाऊन.” थोड्या वेळाने अरमान चित्र संपवून, स्केचबूक मिटवून, पिशवी आणि पैसे घेऊन निघाला.

“चल येतोस का, दळण टाकायला चाललोय.” गेटपाशी उभ्या असलेलया शंतनुला त्याने विचारले. 

“ह.. “ शंतनु काहीतरी पुटपुटला. 

“दुसरं काही काम आहे का?” शंतनु अडखळतोय हे बघून अरमानने विचारले. 

“अरे, मीनलचा मेसेज आलाय ना ग्रुपवर. मला आईने सांगितलं. म्हणून मी ट्री-हाऊसकडे निघालोय.” शंतनु म्हणाला  

“अच्छा?” अरमानने खिशातून फोन बाहेर काढला. शंतनु लहान असल्याने त्याचा स्वतः चा फोन नव्हता अजून. अरमानला ह्यावर्षीच फोन मिळाला होता. आईचा जुना फोन आईने त्याला दिला होता, गँगच्या ग्रुपवरचे मेसेज आणि काही ईमर्जन्सि आली तर म्हणून. 

“खरंच की, मी चित्र काढत होतो, बघितलाच नाही मेसेज.” अरमान म्हणाला, “बरं शंतनु, तू पुढे हो. मी दळण घेतो, डबा घरी ठेवतो आणि लगेच येतो.” गेट बाहेर पडत अरमान म्हणाला. 

“त्या चौकातल्या गिरणीतच चालला आहेस ना. मी येतो मग. दळणाचा डबा घेऊन थेट ट्री-हाऊसमध्ये जाऊ म्हणजे तेवढाच वेळ वाचेल.” शंतनु म्हणाला.  

अरमान आणि सिद्धांत ह्या ‘दादा’ लोकांबरोबर रहायला शंतनुला खूप आवडायचे.  

गिरणीतल्या काकांनी दळण तयार ठेवले होते हे बघून दोघे खूश झाले. ‘चला आता लगेच ट्री-हाऊसमध्ये जाता येईल.’ 

दळण घेऊन अरमान वळतच होता जेव्हा त्याचे लक्ष गिरणीतल्या आतल्या लाकडी फळीकडे गेले. 

“काका, अरे वा, नवीन का?” अरमानने गिरणीतल्या लाकडी शेल्फवरच्या चकचकीत बाटलीकडे बघत विचारले.

 

त्या फळीवर नेहमी काकांची पाण्याची बाटली असायची. पण ती कुठली तरी बिसलरी किंवा तशी, जुनाट, मळलेली. आज ही चकचकीत स्टीलची बाटली? 

काका पुढचे दळण टाकत होते, त्यांनी अरमान कुठे बघतोय त्या दिशेला बघितले आणि बाटलीकडे बघून हसले. “ती ना, अरे, ते एक रहस्यच आहे.” 

रहस्य म्हणताच गिरणीच्या बाहेर पाऊल टाकत असलेला शंतनु तडक वळला आणि “रहस्य? कसलं रहस्य? खजिना वगैरे मिळाला का काका?” विचारू लागला.

 

“हा शंतनु सध्या भा. रा. भागवतांचा भक्त झालाय, परवाच त्यांचं ‘खजिन्याचा शोध’ वाचलंय त्याने. त्यामुळे जिथे तिथे त्याला खजिना दिसतो.” शंतनुच्या डोक्यावर हलकी टपली देत अरमान म्हणाला. 

काका आणि गिरणीत दळण टाकायला आलेल्या एक मावशीही हसल्या.

 

“काका ते रहस्य काय म्हणत होतात?” शंतनुने आठवण केली, ह्यांच्या गप्पांच्या नादात रहस्याचे विसरतात की काय अशी चिंता त्याला वाटली.  

“अरे हो, ती एक गंमत झाली. गिरणीत काम करताना मला पाणी प्यायला लागतं म्हणून एक जुनी बाटली घरी होती ती इथे आणून ठेवली. दिवसाला काय ते एक का दोन लीटर पाणी प्यावं म्हणतात ना. मी ती बाटली भरून इथे फळीवर ठेवायचो. 

परवा गिरणी उघडायला आलो तर दाराशी एक खोकं होतं. त्यावर माझं नाव होतं. ही बघ ती चिठ्ठी जपून ठेवली आहे मी.” एक पिवळ्या रंगाची पोस्ट-ईट दाखवत काका म्हणाले. 

“मग?” शंतनुने अधीरपणे विचारले. 

“माझा नाव होतं म्हणून म्हणलं उघडून बघू. जरा घाबरतच खोकं उघडलं तर ही स्टीलची नवीकोरी बाटली होती त्यात.”

 

“बस, बाटलीच? कोणी दिली वगैरे काही नव्हतं?” अरमानने विचारले. 

“नाही ना. नाव नव्हतं पण एक पत्र होतं आत.” काकांनी फळीवर ठेवलेले पाकीट अरमानला दिले.

 

पाकीट उघडून अरमानने पत्र बाहेर काढले. हाताने लिहिलेले पत्र होते. 

“प्रिय काका, 

गेली अनेक वर्षे आपला परिचय आहे. लहान असल्यापासून आईने दिलेला दळणाचा डबा घेऊन तुमच्याकडे यायचो. 

तुमची फळीवरची प्लॅस्टिकची बाटली मला खुपत होती. ती तुम्ही वापरू नये असं मनापासून वाटत होतं. 

प्लॅस्टिक आपल्या आरोग्यासाठी चांगलं नाही. प्लास्टिकच्या डब्यातून अन्न खाताना, बाटलीतून पाणी पिताना,  प्लॅस्टिकमधली रसायनं तसेच प्लॅस्टिकचे सूक्ष्मकण म्हणजे मायक्रोप्लॅस्टिक आपल्या शरीरात जातात. कॅन्सरसारखे रोग त्याने होऊ शकतात. 

तुम्ही वापरता ती बाटली तर ‘सिंगल-युज’ आहे म्हणजे ती एकदाच वापरणे अपेक्षित आहे. ती तुम्ही पुन्हा-पुन्हा वापरत आहात ते तर आणखी घातक आहे. 

तुम्ही ही बाटली न वापरता एखादी धातूची किंवा काचेची बाटली वापरावी असे मला मनापासून वाटले. मग मी ठरवले आपण भेटच देऊ ही बाटली. 

एक नम्र विनंती. आजपासून, आत्तापासूनच ही बाटली वापरायला लागा. तुमची प्लॅस्टिकची बाटली आठवणीने रिसायक्लिंगला द्या. ह्या चौकात दर रविवारी कलेक्शन-ड्राइव्ह असतो, त्यात ती बाटली देऊन टाका. 

आपला एक हितचिंतक.”

“पत्रात नाव, पत्ता काहीच नाही.” पत्र उलटसुलट करत अरमान म्हणाला, “कोणी दिली असेल ही बाटली, काहीच कल्पना नाही?”

“नाही ना, इथे चाळीस वर्षे गिरणी चालवत आहे. नेहमी येणारे खूप गिर्हाइक आहेत.” काका म्हणाले. 

“चाळीस वर्षे?” अरमानने आश्चर्याने विचारले.  

“मग. तू जसा दळण घेऊन येतोस ना, तसाच तुझा बाबा आजीने दिलेलं दळण घेऊन यायचा माझ्याकडे. इतकी वर्षे झाली माझ्या गिरणीला.” काका अरमानचा वसलेला आ बघून म्हणाले. 

“अच्छा, म्हणजे हा हितचिंतक कोणीही असू शकेल.” अरमान म्हणाला. 

“हो ना,  नक्की कोण हे सांगणं अवघड आहे.” काका म्हणाले, “शिवाय चौकात गिरणी आहे ना, ह्या चारही रस्त्याच्या सोसायटीतून लोक येतात.”

“टॉक्क!!!!” आवाजाने काका आणि अरमान दचकले. 

“शंतनु, तुझ्यात फा. फे संचारला आहे.” आवाजाचा स्रोत लक्षात येताच अरमान म्हणाला. 

शंतनु हसला. काका गोंधळून दोघांकडे बघू लागले. 

“ह्या वाढदिवसाला भा. रा. भागवतांची बरीच पुस्तकं आणि त्यात फास्टर फेणेचा संच त्याला भेट म्हणून मिळाला आहे. कपडे बघा ना, आत टीशर्ट आणि वर चौकटीचा शर्ट, बटणं उघडी ठेवलेला, फा. फे सारखेच कपडे घालतो हल्ली.” गोंधळलेल्या काकांना अरमान म्हणाला. 

काका हसले. “हो हो, मी पुस्तक नाही वाचलं, पण सिनेमा बघितला होता फास्टर फेणेचा.”  

“हा वयाने मोठा आहे असं वाटतं.” शंतनु विचारमग्न चेहऱ्याने म्हणाला. 

“कशावरून?” 

“हे पत्र ज्या पेनने लिहिलं आहे ते महाग पेन आहे. बाबाकडेही आहे असंच. भारी आहे. बाबा मला हातही लावू देत नाही त्याला. आपल्या वयाच्या कोणाकडे असं पेन असणं शक्य नाही.” शंतनु म्हणाला. 

काका आणि अरमान त्याच्याकडे आश्चर्याने आणि कौतुकाने बघत राहिले. 

“शिवाय त्याने स्वतः बाटली घेऊन तुम्हाला दिली आहे असं वाटतं. आई-बाबांना सांगून घेऊन आला असं नाही वाटत पत्राच्या रोखावरून.” अरमान म्हणाला. 

“हा अंदाज आहे, पण चांगला अंदाज आहे.” नाक उडवत शंतनु म्हणाला. 

“हो का ‘फा फे’ महाराज?” कमरेवर हात ठेवत अरमान म्हणाला. 

“बरं, म्हणजे काकांचा हितचिंतक मोठा असावा पण त्याने काका म्हणले आहे त्या अर्थी खूप मोठा नाही पण स्वतः कमावण्याइतका मोठा आहे.” दोघांनी विचार-विनिमयानंतर निष्कर्ष काढला. 

ह्या हितचिंतकाला कसे शोधायचे हा विचार करत दोघे ट्री-हाऊसकडे निघाले. 

——————

“अरे, परवा मी आणि आई रिक्षाने लक्ष्मी रोडकडे चाललो होतो. रिक्षात एक छोटा छान स्टँड केला होता आणि त्यावर एक लिटरची स्टीलची बाटली होती. मला छान वाटलं.” अरमान आणि शंतनुची गोष्ट ऐकून मीनल म्हणाली, “एरवी प्लॅस्टिकची सिंगल-युज बाटली ठेवतात. ह्यांची स्टीलची होती म्हणून मी चौकशी केली. त्यांनीही हे असंच सांगितलं. एक मुलगा म्हणे रिक्षात बसला, उतरताना त्याने बॅगमधून स्टीलची बाटली काढून त्यांना दिली, भेट म्हणून. ‘प्लॅस्टिकची वापरू नका. ही वापरा असं सांगितलं.’ ”

 

“हाच असणार तो.” सिद्धांत म्हणाला. 

“तो मुलगा कसा होता? रिक्षावले काका काही म्हणाले का?” अरमानने विचारले. 

“नाही रे, मीही काही विचारले नाही त्यावेळी. एक ‘मुलगा’ असं म्हणाले म्हणजे त्यांच्यापेक्षा वयाने लहान असणार.” मीनल म्हणाली. 

“म्हणजे आपला अंदाज बरोबर आहे. तो अगदी कॉलेजमध्ये नसेल पण नुकताच नोकरी करायला लागला असणार.” अरमान म्हणाला. 

“तो भारी काम करतोय. आपण भेटेलंच पाहिजे त्याला.”

“आपल्याचा भागात कुठेतरी तो राहतो हे नक्की.”

“पण शोधायचं कसं त्याला?” गँग विचारात पडली.

————————— 

“गंपू.. गंपू..” चारू आणि क्षमा हाक मारत गल्लीत फिरत होत्या. 

“काय झालं?” सिद्धांतने चौकशी केली. 

“ही क्षमा, माझी मैत्रिण आहे. चौकातल्या सोसायटीत राहते. तिचा गंपू बोका हरवला आहे.” चारू म्हणाली. 

“कधी हरवला?” 

“काल रात्री. बाहेर जातो, भूक लागली की आणि झोपायला घरी येतो. काल जो गेला तो आलाच नाही अजून. आज सकाळी दूधवाले काका म्हणाले की त्यांनी ह्या गल्लीत त्याला बघितलं. म्हणून शोधायला आले.” क्षमा म्हणाली.

 

“चल, आपण सगळे शोधू.” मीनल म्हणाली. संपूर्ण गँग शोधमोहिमेत सामील झाली. संपूर्ण गल्ली पालथी घातली. गंपू सोडून बरीच मांजरे दिसली. त्याला हाक मारत, इकडे तिकडे शोधत गँग परत क्षमाच्या सोसायटीत पोहोचली.   

क्षमाच्या सोसायटीत दुःखी वातावरण होते. गंपू सगळ्यांचा लाडका होता. सोसायटीतले लोकही आवारातल्या झाडांवर, गंपूच्या नेहमीच्या जागांवर शोधत होते. 

अरे, आपल्या सोसायटीत cctv आहे ना, त्यात बघू ना काही कळतं का.” शेजारच्या काकांच्या एकदम लक्षात आले.

 

“हो, मागच्या वर्षी जोशींकडे चोरी झाली तेव्हापासून cctv लावलाय.” दुसऱ्याने कल्पनेला दुजोरा दिला. 

“काल रात्रीचं फुटेज बघितलं तर गंपू निदान कुठल्या बाजूला गेला ते कळेल ना.”

 

“हो, खरंच की.”

“चला मग.” 

सेक्रेटरी काका आणि वॉचमन काका बरोबर आले. सगळेजण कम्प्युटरभोवती जमले आणि आदल्या रात्रीचे फुटेज बघू लागले. 

गंपू सोसायटीच्या गेटमधून बाहेर पडलेला दिसत होता. इकडे तिकडे हिंडत तो रस्त्याच्या समोरच्या बाजूला गेला. तेवढ्यात दोन कुत्री जोरजोरात भुंकत आली आणि गंपूने गिरणीशेजारच्या दुकानाकडे धाव घेतली. दुकानाचे दार  cctv फुटेजमध्ये स्पष्ट दिसत होते. त्यांनी ते रेकॉर्डिंग पुढे पुढे नेले. दुकान बंद झाले तरी गंपू बाहेर आलेला काही दिसला नाही.

 

“गंपू बहुदा त्या दुकानातच आहे. घाबरून लपून बसला असणार. दुकानदाराला दुकान बंद करताना लक्षात आलं नाही आणि गंपू आत अडकला.” काका क्षमाला म्हणाले.

 

सगळेजण आशेने दुकानाकडे गेले. दुकान अजून उघडायचे होते. क्षमाने गंपूला हाक मारली. काही आवाज आला नाही. मग सगळ्यांनी हाका मारायचा सपाटा लावला. दुकानाच्या शटरला कान देऊन ऐकल्यावर आतून ‘म्याव म्याव’ ऐकू आले.

गिरणीतल्या काकांकडून त्या दुकानदाराचा फोन नंबर घेतला. काय झाले आहे कळताच ते लगेच आले. त्यांनी दुकानाचे शटर उघडले आणि गंपू महाराज बाहेर आले. 

“टॉक्क!!!” परत आवाज आला. 

“आता काय सुचलं तुला?” कमरेवर हात ठेवत अरमान शंतनुला म्हणाला.

 

“काका, तुम्हाला ती स्टीलची बाटली कुठल्या दिवशी मिळाली ते लक्षात आहे?” शंतनुने ‘गंपूची सुटका’ प्रकरण बघायला आलेल्या गिरणी काकांना विचारले. 

  

“हो, तारीख अगदी पक्की लक्षात आहे.” काका म्हणाले, “मागच्या महिन्याच्या वीस तारखेला सकाळी!!”. 

“म्हणजे १९ तारखेला रात्री किंवा वीस तारखेला पहाटे ती बाटली दादाने दुकानाबाहेर ठेवली.” शंतनू पुटपुटला, “ काका, आम्हाला मागच्या महिन्यातलं फुटेज तुमच्या cctvवर बघता येईल?” सेक्रेटरी काकांकडे वळत शंतनु म्हणाला. 

त्यावर मात्र सगळ्याच गँगकडून ‘टॉक्क!’ आले. 

————-

“तो कसा दिसतो हे आपल्याला कळलं.”

“हो ना, शंतनुची कल्पना भारी होती.” 

“गिरणी काकांनी सांगितलं त्या दिवशीच्या आदल्या रात्रीच्या फुटेजमध्ये तो दादा दिसला, गिरणीबाहेर खोकं ठेवताना.” 

“हो ना.” 

“म्हणजे तो कसा दिसतो, वयाने साधारण केवढा आहे, त्याची बाईक कशी आहे हे आपल्याला कळलं. तो ह्याच भागात राहतो हेही माहित आहे. पण तरी अजून त्याच्यापर्यंत कसं पोहोचयचं हे कळत नाही.”

 

“त्याचा फोटो छापून तयार पत्रक करू आणि सगळीकडे चिकटवू ‘आपण ह्याला पाहिलंत का?’ म्हणून.” सिद्धांत म्हणाला. 

सगळे हसले. 

—————-

दारावरची बेल वाजली. पोस्टमन  काका आले होते. “स्पीड पोस्ट आहे.” सिद्धांतने दार उघडताच त्यांनी जाहिर केले. सिद्धांतने सही केली आणि पाकिट घेतले. 

“काका, पाणी देऊ का?” म्हणून सिद्धांतने विचारल्यावर, “ही बाटली अर्धी भरून दे” असे म्हणत काकांनी सायकलला लावलेली एक लांबूडकी पिशवी काढली आणि त्यातली चकचकीत स्टीलची बाटली सिद्धांतच्या हातात दिली. 

सिद्धांतने बाटली भरली. “स्टीलची बाटली जरा जड असते ना, म्हणून अर्धी भरून घेतो. गरज लागली तर अशीच कुठल्या तरी घरातून परत भरायची.” काका बाटली परत पिशवीत ठेवत म्हणाले.

 

“जड असूनही तुम्ही स्टीलची बाटली का वापरता काका?” सिद्धांतने विचारले. 

“खूप जड नाही पण थोडा फरक आहे. पण ते प्लॅस्टिक चांगला नसतं ना आपल्या आरोग्याला.” काका म्हणाले. 

“हे तुम्हाला कोणी सांगितलं?” सिद्धांतचे कान टवकारले. 

“एक मुलगा आहे. त्यानेच ही बाटली दिवाळीची भेट म्हणून दिली.” काका कौतुकाने बाटलीकडे बघत म्हणाले. 

“काका, तुम्हाला माहिती आहे तो मुलगा? असा दिसतो का?” सिद्धांतने त्यांना cctv त दिसलेला त्या दादाचा फोटो फोनवर काकांना दाखवला. 

“हो, हाच तो. गेली पस्तीस वर्षे ह्याच भागात पत्र टाकतो आहे. ह्याला लहानपणापासून ओळखतो.” काका म्हणाले

“काका, तो कुठे राहतो सांगाल?” सिद्धांतने आशेने विचारले. 

 “का?” काकांनी डोळे बारीक करत विचारले. 

“आम्ही त्याला शोधतोय. त्याचा हा स्टीलच्या बाटल्यांचा उपक्रम आहे तरी काय नक्की हे माहिती करून घ्यायचं आहे. गिरणीतल्या काकांनाही त्याने अशीच बाटली दिली आहे. आम्हीही सध्या प्लॅस्टिक प्रदूषण कमी करण्यासाठी सोसायटीत काम करत आहोत ना, तोही हेच करतोय. त्याला भेटायला आवडेल आम्हाला.” सिद्धांत म्हणाला. 

 

“अच्छा, अच्छा, मग हरकत नाही. चांगलं आहे, समविचारी मंडळी तुम्ही एकत्र याल. इथून सोसायटीतून बाहेर पडलास की चौकापर्यंत जायचं आणि सरळ तोच रस्ता घ्यायचा. उजवीकडे चौथी इमारत आहे त्याची. योगेश नाव त्याचं.” काकांनी माहिती दिली. 

“धन्यवाद काका. जवळ जवळ उड्या मारतच सिद्धांत म्हणाला. 

————–

“बेल वाजवू का?” 

“काय करायचं?” 

“त्याला जरा विचित्र वाटेल का आपण असे टपकलो म्हणून?”

“काय म्हणायचं?”

“तो काय म्हणेल?” 

“ते बेल वाजवल्याशिवाय कळणार नाही.” 

गँगचे हे दादाच्या घरासमोर ‘तू-तू-मैं-मैं’ चालू होते तेवढ्यात दार उघडले आणि दादाच बाहेर आला. त्याच्या दारात उभ्या असलेल्या गँगची फारच मजेशीर अवस्था झाली. 

चारुने सावरून, ओळख करून दिली आणि आपण का आलो आहोत हे सांगितले. 

आधी गोंधळलेल्या दादाने आता हसून गँगला आत यायला सांगितले. आतून पाणी घेऊन आला.

 

“तुम्ही माझ्यापर्यंत कसे पोहोचलात?” त्याने शेवटी त्याच्या तोंडावर असलेला प्रश्न विचारला.

 

“सोप्पं, नव्हतं ते. एकदम फा. फे स्टाईल शोध घेतला आम्ही.” शंतनु म्हणाला. 

दादाने प्रश्नार्थक नजरेने बघितले तेव्हा गँगने त्यांच्या शोधकार्याची त्याला माहिती दिली. 

“भारी आहात तुम्ही.” सगळा वृतान्त ऐकून दादा म्हणाला, “खरं सांगू का मला मनापासून वाटलं म्हणून मी हे केलं. त्याला प्रसिद्धी द्यायची नव्हती. पण तुम्ही माझा शोध का घेतलात?” 

“गणपतीत आम्ही शून्य-कचरा उपक्रम आमच्या सोसायटीत राबवला.” चारू म्हणाली. 

“त्यावेळी प्लॅस्टिकबद्दल आम्ही खूप वाचलं. प्लॅस्टिकमुळे खूप प्रदूषण होतं हे आम्हाला कळलं.” अरमान म्हणाला. 

 

“मला माझ्या आजोबांचा जुना स्टीलचा डबा सापडला. आम्ही सगळे  आता प्लास्टिकच्या डब्याऐवजी स्टीलचा डबा वापरतो.”  सिद्धांतने सांगितले. 

“ही स्टीलच्या बाटलीची कल्पना खूप भारी आहे.  त्यामुळे आम्हाला तुला भेटायची उत्सुकता आहे.”  मीनल म्हणाली.

 

“तू हे का करतोस, हे असं करावसं का वाटलं हे सगळं समजून घ्यायचं आहे.” चारू म्हणाली. 

“अरे बापरे, मला मुलाखत वगैरे दिल्यासारखं वाटतंय.” दादा हसत म्हणाला, “तुम्हाला गोष्ट सांगतो.” 

गोष्ट म्हणल्यावर गँग सरसावून बसली.

“कॉलेजमध्ये असताना मी NSS मध्ये होतो. त्यातला एक उपक्रम म्हणून आम्ही फलटणजवळच्या एका गावात गेलो होतो. गावातली जैवविविधता, तिथल्या लोकांची जीवनशैली ह्याचे निरीक्षण करायचे आणि नोंद करायची असं आमचं काम होतं. गावातल्या शाळेत त्या दिवशी एक कार्यक्रम होता. शाळेच्या शिक्षकांनी आम्हाला त्या कार्यक्रमाचे आमंत्रण दिले म्हणून आम्ही सगळे तिकडे गेलो. एक वेगळाच कार्यक्रम त्या दिवशी आम्ही बघितला. आठवीच्या वर्गातले विद्यार्थी शाळेच्या हॉलमध्ये बसले होते. पुण्याहून एकजण आले होते. मुख्याध्यापकांनी त्यांची ओळख करून दिली आणि ते बोलायला उभे राहिले.

प्लॅस्टिक हा काय प्रकार आहे ते त्या दिवशी मला कळलं. प्लॅस्टिकचा शोध का आणि कसा लागला, त्याचा सुरुवातीला काय उद्देश होता हे त्यांनी सांगितलं. तसेच आता अतिरिक्त वापरामुळे निसर्गाची कशी हानी होत आहे, आपल्या आरोग्यावर किती घातक परिणाम होत आहे हेही त्यांनी सांगितलं. ओढे आणि नद्यांमार्फत हे प्लॅस्टिक शेवटी समुद्रात जातं आणि साठत राहतं हे त्यांनी सांगितलं तेव्हा मी अस्वस्थ झालो. हा एवढा पुढचा विचार मी प्लॅस्टिक वापरताना कधीच केला नव्हता. आपल्या समुद्रांमध्ये प्लॅस्टिकच्या कचऱ्याचे ढीग साचले आहेत हे ऐकून मी हादरलो.” दादा सांगत होता. 

“ग्रेट पॅसिफिक गार्बेज पॅच.” सिद्धांत म्हणाला. 

“बरोब्बर. पहिल्यांदा पॅसिफिक महासागरात हे कचऱ्याचे बेट कॅप्टन चार्ल्स मूरला दिसले. सगळ्याच समुद्रात असा कचरा साठत आहे हे नंतर लक्षात आलं. ही माहिती मला नवीन होती. मी त्यांचं बोलणं ऐकतच राहिलो. प्लॅस्टिकबद्दल एवढा विचार मी खरंच केला नव्हता.” दादा म्हणाला, “नुसती माहिती देऊन ते थांबले नाहीत. त्यांनी आठवीच्या त्या वर्गातल्या प्रत्येकासाठी स्टीलच्या बाटल्या आणल्या होत्या.” 

“काय?” 

“हो. वर्गातल्या प्रत्येकाला एक बाटली त्यांनी भेट दिली. प्लॅस्टिकची बाटली वापरू नका असं सांगून मग पुढे कधीतरी मुलं तसं करतील ही वाट न बघता ते स्टीलची बाटली मुलांना भेट देतात. आख्खा वर्ग मग स्टीलच्या बाटल्या लगेच त्या दिवशीपासून खात्रीशीर वापरायला लागतो. 

दुसऱ्या दिवशीपासून शाळा भरते तेव्हा प्रत्येक वर्गात हजेरी होते ना तेव्हा अट एवढीच की ‘हजर’ म्हणून हात वर करताना बाटली दाखवायची. ज्यांनी बाटली आणली नसेल त्यांची गैरहजेरी मांडली जाते. उद्देश हा की चुकूनसुद्धा मुलांनी प्लॅस्टिकची बाटली वापरू नये.” दादा म्हणाला. 

“भारी आहे.” मीनल म्हणाली. 

“सगळ्या मुलांना त्यांनी स्टीलच्या बाटल्या दिल्या?” चारू म्हणाली. 

“हो, आत्तापर्यंत विविध शाळांत त्यांनी सुमारे पाच हजार बाटल्या अशा प्रकारे विद्यार्थ्याना भेट दिल्या आहेत.” दादा म्हणाला. 

“वा!!!” अरमान म्हणाला. 

“त्यांच्या कार्याने मी भारावून गेलो. आपणही असंच काही करायचं असं त्या दिवशीच ठरवलं. गिरणीतल्या काकांची प्लॅस्टिकची बाटली बघितली आणि जाणवलं आपण इथूनच सुरुवात करू शकतो. तडक दुकानात गेलो आणि बाटली आणली. हल्ली दोन-तीन बाटल्या माझ्या बॅगमध्ये ठेवतोच. प्लॅस्टिकची बाटली वापरणारे दिसले की त्यांना स्टीलची बाटली भेट देतो.” दादा म्हणाला. 

गँगने उत्स्फूर्त टाळ्या वाजवल्या. 

“पण दादा, मला अजूनही कळत नाही. एवढ्या सस्पेन्सची काय गरज होती. पोस्टमन काका आणि रिक्षा काकांना तू जशी बाटली दिलीस, तशी सरळ सरळ गिरणी काकांनाही देऊ शकला असतास की.” शंतनुने विचारले. 

 “फास्टर फेणे काय फक्त तुला आवडतो का?” डोळे मिचकावत दादा म्हणाला. 

_____समाप्त _____

खूप मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक आपल्या पर्यावरणात पसरले आहे. आणखी प्लॅस्टिक पर्यावरणात जाणार नाही ह्यासाठी काम करणे आपल्या हातात आहे. सुरुवात करणे खूप महत्वाचे आहे.

विशेषत: सिंगल-यूज प्लॅस्टिक आपल्या आरोग्यासाठीही खूप घातक आहे. 

‘प्लॅस्टिकच्या बाटलीऐवजी स्टीलची बाटली वापरणे’ हा छोटासा निर्णय खूप मोठा सकारात्मक बदल घडवेल.

आपणही करून बघायचे?

—————

ह्या गोष्टीतली पात्रे जरी काल्पनिक असली तरी दादा आणि त्याने ज्यांच्यापासून प्रेरणा घेतली ते ह्या दोन्ही खऱ्या व्यक्ती आहेत आणि त्यांचे उपक्रमही.

 

गोष्टीतला योगेश दादा म्हणजे मंगेश गायकवाड. मंगेशने त्याच्या Neon Beauty and Hair Studio मध्ये प्लॅस्टिकच्या बाटल्यांचा वापर पूर्णपणे थांबवला. त्याच्या स्टुडिओच्या सगळ्या शाखांमध्ये आता सर्वजण केवळ स्टीलच्या बाटलीतून पाणी पितात.  

 

 त्यापुढे जाऊन आत्तापर्यंत अनेक लोकांना त्याने स्टीलच्या बाटल्या भेट दिल्या आहेत. 

 

ज्यांच्या उपक्रमामुळे गोष्टीतला योगेश प्रेरित झाला ते आहेत टेलस संस्थेचे श्री. लोकेश बापट. Tellus हा पृथ्वीसाठीचा लॅटिन शब्द आहे. 

 

श्री. लोकेश बापट २००१ पासून निसर्ग संवर्धनासाठी विविध उपक्रम करत आहेत. २०१२ सालपासून त्यांनी स्टीलच्या बाटल्यांचा उपक्रम हाती घेतला. आत्तापर्यन्त त्यांनी सुमारे पाच हजार स्टीलच्या बाटल्या विद्यार्थ्यांना भेट दिल्या आहेत. 

 

काही हॉटेल्समध्ये  त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन प्लॅस्टिक ऐवजी काचेच्या बाटल्या वापरण्यास सुरुवात केली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *