Witch of the Blackbird Pond by Elizabeth George Speare
विच ऑफ द ब्लॅकबर्ड पॉण्ड
किट टाईलर नावाची मुलगी बार्बाडोसहून बोटीने अमेरिकेतल्या कनेक्टीकट राज्यातल्या एका छोट्या गावाकडे निघालेली असते.
सगळ्यात आधी तिला जाणवतो तो change in landscape. बार्बाडोसच्या प्रशस्त बागा, तिथलं प्रसन्न वातावरण आणि इथे कनेक्टीकटमधली छोटी गावं, थंड, कोरडं वातावरण.
बोटीतल्या लहान मुलीची लाकडी बाहुली पाण्यात पडते. आपल्या आजोबांनी दिलेली बाहुली पडली म्हणून रडणाऱ्या त्या मुलीकडे कोणीच लक्ष देत नाही. बाहुली लाकडी असल्याने पाण्यावर तरंगत असते. अजून बोटीच्या जवळ असते. किटला रहावत नाही. ती पाण्यात उडी मारते. बोटीच्या कॅप्टनचा मुलगा तिला वाचवायला म्हणून लगेच उडी मारतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं किटला व्यवस्थित पोहता येतं.
भिजलेली किट बोटीवर परत येते तेव्हा बोटीवरच्या लोकांचे बदललेले वागणे तिला जाणवते. अर्थात ती छोटी मुलगी सोडून. तिच्या चेहऱ्यावर आपल्या आवडत्या बाहुलीला वाचवणाऱ्या किटबद्दल भक्तीभाव असतो. इतर लोक मात्र, काही तिच्याकडे संशयाने, काही तिरस्काराने, काही रागाने तर कॅप्टनचा मुलगा काळजीने बघत असतो.
किटला आणि आपल्यालाही हळूहळू ह्या सगळ्या प्रतिक्रियांचा अर्थ लक्षात येऊ लागतो. आपण जेथून आलो आणि आता जेथे जात आहोत त्या दोन जागांमधल्या, लोकांमधला फरक लख्ख जाणवू लागतो.
१९५८ साली हे पुस्तक लिहिलं. त्यातला काळ आहे तो १६८७चा. War of Independence च्या आधीची, अजून ब्रिटिशांच्या ताब्यात असलेली वेगळीच अमेरिका आपल्याला अनुभवायला मिळते.
‘नॉर्मल’ बायकांना पोहता येत नाही. कारण त्यांना पोहणं कधी शिकवलंच जात नाही. केवळ चेटकिणी म्हणजे witch पोहू शकतात. असं मानणाऱ्या लोकांत किट आलेली असते.
आई-वडिलांच्या अपघाती मृत्यूनंतर आजोबांबरोबर किट त्यांच्या बार्बाडोसच्या मोठ्या इस्टेटवर राहत असते. आजोबा श्रीमंत असतात. भरपूर नोकरचाकर, गुलामही त्यांच्याकडे असतात. आजोबांच्या मृत्युनंतर तिच्या लक्षात येतं ते कर्जबाजारी होते. इस्टेट विकून ती सर्व कर्ज फेडते. आपल्या वडिलांच्या वयाच्या एका श्रीमंत माणसाशी नाईलाजाने लग्न करण्याचे नाकारून, मिळेल ती पहिली बोट पकडून किट तिच्या आईच्या बहिणीकडे, मावशीकडे निघालेली असते.
मावशीला ती कधीही भेटलेली नसते. तिची पत्रं आलेली असतात. त्या आधारावर, मावशी आणि तिच्या कुटुंबाशिवाय जगात तिचे असे दुसरे कोणी नाही, अशी किट मावशीच्या घरी दाखल होते.
पुस्तकातल्या सगळ्याच व्यक्तिरेखा सुंदर रंगवल्या आहेत. किटला प्रेमाने आपलेसे करणारी, कष्टाने गांजलेली मावशी, आपल्याशिवाय किटला कोणी नाही म्हणून तिला कर्तव्यबुद्धीने आपल्या घरात घेणारे, गरीबीने वैतागलेले पण तरीही तत्वांशी एकनिष्ठ असलेले, शेवटी किटच्या बाजूने उभे राहणारे काका.
तिचं वेगळं असणं, वेगळं वागणं, लोकांनी वाळीत टाकलेल्या ‘witch’ असल्याचा संशय असणाऱ्या स्त्रीला भेटणं, तिच्या घरी जाणं, हे सगळं पुढे किटला न्यायालयात उभं करतं.
ती पाण्यावर तरंगते, ज्याला अनेक साक्षीदार असतात ह्याचा अर्थ ती witch आहे असा आरोप तिच्यावर केला जातो. तो आरोप किती गंभीर आहे हे आपल्याला गोष्ट वाचताना जाणवत जाते.
हे पुस्तक आपल्याला एका वेगळ्याच काळात घेऊन जातं.
खूप प्रश्न निर्माण करतं, अस्वस्थ करतं. एमीच्या लायब्ररीतल्या ‘banned book list’ मध्ये हे पुस्तक नसतं तरच नवल.
पुस्तक मुलांसाठी म्हणजे young adult साठी असलं तरी मोठ्यांसाठी बराच वैचारिक खुराक त्यात आहे.
तो काळ जरी आपण आता खूप मागे टाकला असला तरी त्याच्या खाणाखुणा ह्या जगात आहेत. किटच्या बाबतीत जे घडू शकलं असतं आणि हजारो स्त्रियांच्या बाबतीत जे घडलं ते अनेक प्रश्न निर्माण करणारं आहे.
“Well-behaved women seldom make history” and “We are the grand daughters of the witches they could not burn.” ही वाक्ये सूचक आहेत.
witch म्हणजे काय?
विच शब्दाला मराठी प्रतिशब्द म्हणजे चेटकीण.
गोष्टींमधली चेटकीण ही साधारण दुष्ट असते. तिच्या जादूचा, त्या ज्ञानाचा वापर ती वाईट गोष्टींसाठी, लोकांना त्रास देण्यासाठी करते.
युरोप आणि अमेरिकेतही गोष्टींमध्ये चेटकीण असते. Wizard of Oz मध्ये आहेत. पण ती witch आणि ह्या पुस्तकातली witch हयात फरक आहे.
ह्यात जी witch आहे ती साधारण मध्ययुगात निर्माण झालेली व्यक्तिरेखा आहे. त्या काळात अनेक स्त्रियांना त्या witchcraft करतात ह्या आरोपावरून मारण्यात आले. जाळून, पाण्यात बुडवून अशा विविध पद्धतीने.
स्कॉटलंडची राजधानी एडिनबरा येथे Princes Street Garden आहे. मध्ये टेकडी आहे. त्यावर एडिनबरा पॅलेस आहे. त्या टेकडीच्या भोवती खंदक आहे. पूर्वी त्यात पाणी असायचे. यूनायटेड किंगडम म्हणजे UKची निर्मिती झाल्यावर इंग्लंड आणि स्कॉटलंडचे पारंपरिक वैर संपून एकमेकांवरचे हल्ले (म्हणजे लष्करी, बाकी चालूच आहेत अजून) संपले. मग संरक्षणासाठी खंदकाची गरज उरली नाही. तो बुजवून तिथे बाग करण्यात आली. तिथे एक दगड आहे. ते स्मारक आहे खंदकात witchcraft च्या आरोपावरून बुडवून मारलेल्या काही हजार स्त्रियांचे.
संपूर्ण युरोपचा विचार केला तर हा आकडा खूप मोठा आहे. ह्या स्त्रियांबद्दल साहित्यात जे वाचायला मिळतं त्यात ह्या सगळ्या स्त्रिया विविध देशातल्या असल्या तरी एक समान धागा मिळतो, जो ह्या पुस्तकातही मिळाला.
कारण होते त्या स्त्रियांचे वेगळेपण. त्या विचार करणाऱ्या स्त्रिया होत्या. स्वतःची मतं असणाऱ्या आणि ती मतं व्यक्त करणाऱ्या स्त्रिया होत्या.
स्त्रियांनी कसे असावे, काय करावे, मुख्य म्हणजे काय करू नये ह्या समाजाने ठरवलेल्या चौकटीत न बसणाऱ्या होत्या. बहुतांश स्त्रिया लग्न न केलेल्या, एकट्या राहणाऱ्या होत्या.
त्या बायकांवर धर्माचा पगडा नव्हता, पाप-पुण्य, नरक ह्यांची भीती दाखवून इतरांना घाबरवता येत होतं ते ह्यांच्या बाबतीत चालत नव्हतं. बऱ्यापैकी स्वतंत्र राहणाऱ्या होत्या. A woman with nothing to lose can be dangerous.
अशा बायकांचे काय करायचे? काहीच केले नाही आणि त्यांचा प्रभाव वाढला आणि इतर बायका ‘बिघडल्या’ तर?
ज्या बाईला कसली भीती दाखवू शकत नाही तिची भीती मग इतरांना दाखवायची. ती पाप-पुण्य, नरक, सैतान ह्याला घाबरत नसली तरी इतर समाज घाबरत होता ना.. त्यामुळे काम सोपे होते. ती सैतानाला घाबरत नाही कारण ती स्वतःच सैतान किंवा त्याची हस्तक आहे अशी एक अफवा त्याकाळी पुरेशी होती.
‘Ban this Book’ मध्ये एमी म्हणते , ‘People who said and did whatever they were thinking got into trouble.’ किटची गोष्ट तशीच आहे.