कॅप्टन मूर, अल्गिता आणि माझ्या आजोबांचा डबा
साल १९९७. कॅप्टन चार्ल्स मूर त्याच्या अल्गिता बोटीतून कॅलिफोर्नियाला जायला निघाला. हवाई बेटावर बोटींच्या स्पर्धेत भाग घेऊन तो आता घरी निघाला होता.
नेहमीच्या मार्गाने न जाता ह्यावेळी त्याने लांबचा मार्ग निवडला. ह्या भागाला प्रशांत म्हणजे पॅसिफिक महासागरातले वाळवंट म्हणतात. तिथे मासे फारसे नाहीत त्यामुळे मासेमारी करणाऱ्या बोटी ह्या भागात फिरकत नाहीत. सागरी प्रवाह असे आहेत की जहाजे आणि बोटींना फारशी अनुकूल परिस्थिती नाही कारण वारा सतत पडलेला असतो.
एक आठवडा चार्ल्स मूर आणि त्याचे सहकारी प्रवास करत होते पण दुसरी बोट त्यांना दिसली नाही. तिसऱ्या दिवशीपासून पाण्यात प्लॅस्टिक मात्र दिसू लागले. बाटलीचे झाकण, कुठे प्लॅस्टिक सील, अशा छोट्या गोष्टींनी सुरुवात झाली. मग ते प्रमाण वाढत गेले. सातव्या दिवशी समोर जे दिसले त्याने चार्ल्स मूर हादरला.
समुद्रात प्लॅस्टिकचा कचरा पसरलेला होता, जणु प्लॅस्टिकचे बेटच होते. त्याची व्याप्ती किती होती? सहा महाराष्ट्र त्यात मावतील!! त्याला त्याने ‘ग्रेट पॅसिफिक गार्बेज पॅच’ असे नाव दिले.
समुद्राच्या ज्या भागात कोणी फिरकत नाही तिथे एवढा कचरा आलाच कसा? चार्ल्स मूरला वाटले बहुदा नौदलाच्या गस्त घालणाऱ्या नौकांनी टाकला असेल.
तो कचरा काही त्याच्या मनातून जाईना. दोन वर्षांनी मोठी टीम घेऊन पूर्ण तयारीसह तो त्या ठिकाणी परत गेला. गार्बेज पॅचमधल्या काही वस्तू नमुना म्हणून गोळा केल्या. बहुतांश प्लॅस्टिक होते. त्यांचा अभ्यास केल्यावर त्याला आणखी धक्का बसला. त्यातल्या ८०% वस्तू जमिनीवर कचरा म्हणून टाकलेल्या होत्या. ओढे-नद्यांमार्फत त्या समुद्रापर्यंत पोहोचल्या होत्या. समुद्री प्रवाहांमुळे त्या भोवऱ्यात येतात तशा इथे गोळा होत होत्या.
त्यानंतर लक्षात आले की असे पॅचेस सगळ्याच समुद्रांमध्ये आहेत. आपल्या शहरात नदीत वाहताना दिसणारा कचरा हा असा शेवटी समुद्रांत जमा होतो.
कॅप्टन मूर, अल्गिता आणि माझ्या आजोबांचा डबा
सिद्धांत त्याच्या आजी-आजोबांच्या घरी गेला होता. आजीने त्याला खास मदतीला बोलवले होते.
आता आजी-आजोबा दोघेच रहात होते. त्यांच्याकडे भांडी मात्र भरपूर होती. आजीने ठरवले नवीन लग्न झालेल्या जोडप्यांना ती द्यायची. ही भांडी त्यांना उपयोगी पडतीलच शिवाय त्यांना उगीच नवीन भांडी आणण्याचा खर्च नको. आत्तापर्यंत बरीच भांडी देऊन झाली तरी आणखी माळ्यावर होती.
भांडी माळ्यावरून खाली काढायला आजीला सिद्धांतची मदत हवी होती. एरवी हे काम स्वानंदकडे म्हणजे सिद्धांतच्या दादाकडे असायचे. तो उंच होता ना. पण गेल्या सहा महिन्यात सिद्धांतची ऊंची वाढून जवळजवळ दादाएवढी झाली होती. दादाऐवजी आजीने आपल्याला बोलावले म्हणून गडी खूश होता.
आजीने स्टूल धरून ठेवले आणि सिद्धांत वर चढला. एकेक भांडे आजीकडे देत होता.
“आजी, अगं तुझ्याकडे सोन्याची परात आहे.” माळ्यावरच्या पिवळ्या धमक परातीकडे बघत सिद्धांत हळूच कुजबुजला.
“सोन्याची?” आजी गोंधळली. सिद्धांतने परात खाली काढून आजीपुढे धरली.
“अरे, ही पितळ्याची आहे. देवळात घंटा वाजवायला तुला आवडते ना, ती पितळ्याचीच असते. पूर्वी पितळ्याचीच भांडी वापरायचो आम्ही.” आजी म्हणाली.
“हू”, म्हणत सिद्धांतने परात आत ठेवली. ती सोन्याची नाही म्हणल्यावर त्याला फारसा रस नव्हता शिवाय आणखी एका गोष्टीने त्याचे लक्ष आता वेधले होते. परातीच्या मागे एक स्टीलचा डबा त्याला दिसला. एकावर एक असे तीन डबे असलेला डबा होता. त्याने तो आजीपुढे धरला.
“हा होय. अरे तुझ्या बाबाचा डबा आहे.” आजी म्हणाली.
“बाबाचा?”
“हो, शाळा आणि नंतर कॉलेजलासुद्धा हाच डबा न्यायचा तो. त्याचं नावही आहे बघ त्यावर,” आजी म्हणाली.
“खरंच की”, उजेडात डबा निरखत सिद्धांत म्हणाला, “एवढी वर्षे वापरूनही काहीच झालं नाहीये.”
“स्टीलला काय होणार? तुझ्या आजोबांचा डबाही आहे अजून. ऑफिसला चाळीस वर्षे न्यायचे ते. तूच काय तुझा नातूही वापरेल हा.” आजी कपाटातून एक डबा काढत म्हणाली.
“काय!!” सिद्धांतने स्टूलवरून टूणकन् उडी मारली.
आजीच्या हातातला डबा भारीच होता. बाबाच्या डब्यासारखाच होता तीन छोटे डबे असलेला पण थोड्या वेगळ्या आकाराचा.

“आजी, मी घेऊन जाऊ?” त्याने विचारले.
“तू काय करणार त्याचं?” आजीचा प्रश्न.
“ते माहित नाही, पण मला डबा जाम आवडलाय.” सिद्धांत म्हणाला.
“अहो, सिद्धांतला तुमचा डबा हवा आहे, नेऊ दे का?” आजीने आजोबांना विचारले.
“मी निवृत्त झाल्यापासून कुठे तो डबा वापरलाय. तुझेच दागिने असतात ना त्यात हल्ली. तुला काही हरकत नसेल तर खुशाल नेऊ दे की.” एवढे बोलून आजोबा परत शब्दकोडे सोडवण्यात गर्क झाले.
“मला काय हरकत असणार.” असे म्हणत आजीने तिचे दागिने दुसऱ्या डब्यात ठेवायलाही सुरुवात केली होती.
“हं, हा घे.” म्हणत तिने डबा सिद्धांतच्या हातात दिला.
सिद्धांत डबा घेऊन घरी आला. एकदम खजिनाच मिळाल्यासारखे त्याला वाटत होते.
“सिद्धांत, अरे ती रोपं लावायची आहेत ना आपल्याला, मागच्या आठवड्यात आणली होती. तशीच पिशवीत आहेत अजून.” बाबाची हाक आली.
“आलो आलो!!” म्हणत सिद्धांतने डबा त्याच्या खोलीत टेबलावर ठेवला. दाराजवळच्या कपाटातून कुदळ-फावडे आणि खुरपे काढून तो बागेत धावला.
खास बागकामासाठी ठेवलेला जुना टीशर्ट आणि जीन्स घालून बाबा तयार होता. “ह्या रोपांना सावली लागते. ती इथे वावळाच्या जवळ लावायाची का?” बाबा सिद्धांतला म्हणाला.
“हो, आणि ती फुलझाडं इथे कट्ट्याजवळ लावूयात. इथे पाच-सहा तास तरी नक्की ऊन असतं”, सिद्धांत कट्ट्याकडे बोट दाखवत म्हणाला.
“गुड आयडिया!” कुदळ घेत बाबा म्हणाला.
“बाबा, तू कट्ट्याजवळ खड्डे खण, वावळाच्या जवळचे मी खणतो. तिथली माती भुसभुशीत आहे. खुरप्याने खणता येईल.” सिद्धांत खुरपे उचलत म्हणाला.
बाबाबरोबर बागेत काम करणे सिद्धांतला खूप आवडायचे. दादा आणि आईला बागकामाची विशेष आवड नव्हती. हे खास त्याचे आणि बाबाचे काम होते.
आई आणि दादा कुठे गेले की येताना ही एवढी पुस्तके घेऊन यायचे तर सिद्धांत आणि बाबा रोपे. त्यांच्या कारमध्ये माणसे कमी आणि पुस्तके, रोपे आणि बागकामाची सामुग्रीच जास्ती असायची.

वावळाच्या जवळ सिद्धांतने खुरप्याने खणायला सुरुवात केली. खरेच भराभर माती निघत होती. दिवसभर वावळाची सावली असल्याने ह्या जागी सूर्यप्रकाश थेट असा यायचाच नाही. त्यामुळे माती कायम ओलसर असायची. उकरलेल्या मातीचा शेजारी मोठा ढीग होऊ लागला.
आता आणखी थोडे खणले की झाले सिद्धांत अंदाज घेत म्हणाला आणि त्याने खुरपे परत मातीत घातले.
‘बद्’ असा आवाज आला. माती किंवा दगडाला खुरपे लागले नव्हते. वेगळीच काहीतरी वस्तू होती.
त्याने खुरप्याच्या टोकाने बाजूने उकरले आणि हळूहळू ती वस्तू मातीतून मोकळी केली. हातात धरून त्यावरची माती बाजूला केल्यावर ती काय वस्तू आहे हे सिद्धांतच्या लक्षात आले. त्याचे डोळे आश्चर्याने मोठे झाले.
“काय रे, काय झालं”, खुरप्याचा आवाज थांबला म्हणून बाबाने वळून विचारले.
“बाबा, हे बघ मला काय मिळालं,” सिद्धांत हातातली वस्तू पुढे करत म्हणाला.

“काय आहे ते?” बाबाला काही ते ओळखता आले नाही.
“अरे, मी दुसरीत असताना नाही का, बॅटमॅनचा स्टीकर असलेला डबा आणला होता. त्याचं झाकण आहे”, सिद्धांत उत्साहाने म्हणाला.
अरमानकडे स्पायडरमॅनचा स्टीकर असलेला डबा होता, लाल डबा आणि पिवळं झाकण. एकदम भारी डबा होता तो. मग काय, सिद्धांतने हट्ट करून आईला बॅटमॅनचा डबा आणायला लावला. त्याच्या डब्याचे झाकण निळे आणि डबा हिरवा होता.
हेच ते झाकण. आता त्याची अगदीच रया गेली होती. चिरा पडल्या होत्या. अनेक तुकडे गायब होते.
डबा नवीन आणला त्यादिवशी कधी एकदा शाळेत जातो आणि सगळ्यांना डबा दाखवतो असे सिद्धांतला झाले होते. जेवायच्या सुट्टीत सगळे मित्रमैत्रिणी ‘बघू, बघू’ म्हणत आजूबाजूला जमले.
डबा समोर धरून, “आय अॅम बॅटमॅन” असे सिद्धांत धीरगंभीर आवाजात म्हणाला आणि सगळे हसले. तो दिवसच काय पण पुढचा आख्खा आठवडा सिद्धांत आणि त्याचा डबा हा चर्चेचा विषय होता.

महिन्याभरात मात्र पाण्यामुळे झाकणावरचा स्टीकर खराब व्हायला लागला. कड सुटून आली, चित्र फिकट व्हायला लागले. सहा-सात महिन्यानंतर इथे कुठला तरी स्टीकर होता असे कळण्यापुरताच तो उरला. बॅटमॅन कधीच गायब झाला.
एक दिवस जेवण्याच्या सुट्टीत सिद्धांत डबा उघडायला गेला तर झाकणाची कडीच त्याच्या हातात आली.

चारपैकी एक कडी तुटून गेली. नंतर आणखी एक तुटली. दोन कड्यांवर झाकण रहात होते, नाही असे नाही. आधीसारखे घट्ट मात्र बसत नव्हते.
एकदा डबा दप्तरात असतानाच तिसरी कडीही तुटली. मग काय, एकाच कडीवर झाकण कसे राहणार? उपमा दप्तरात सांडला. एवढा व्याप झाला. पुस्तक, वह्या, कंपास पेटी सगळ्याला प्रसाद मिळाला.
आई वैतागली आणि तडक जाऊन नवीन डबा घेऊन आली. नवीन डबा निळा आणि जांभळा होता. त्यावर ‘इनक्रेडिबल हल्क’ होता.
जुन्या डब्याचे काय करायचे कारण डबा चांगला होता. मग बाबाने त्यात माती भरली आणि धने पेरले. कट्ट्यावर भरपूर ऊन यायचे, त्यावर तो ठेवून दिला.

कोशिंबीर किंवा पोह्यावर घालायला कोथिंबीर कापून आणायचं काम सिद्धांतचं असायचं. बरेच दिवस त्या डब्यात कधी कोथिंबीर, कधी मेथी-पालक असायचं.
उन्हात राहून त्याच्या डब्याला चीरा पडल्या आणि मग तुकडे पडायला लागले. झाकणाचा तसा काहीच उपयोग नव्हता. ते इकडे तिकडे पडले, कधीतरी बागेत टाकलं गेलं बहुतेक आणि मातीत गाडले गेले ते आज सापडले.
डब्याचे पुढे काय झाले आठवत नाही. टाकून दिला बहुतेक.
सिद्धांतने झाकण जेवढे स्वच्छ करता येतील तेवढे केले आणि खोलीत टेबलावर आजोबांच्या डब्याला टेकवून ठेवले.

‘आपला डबा कुठे असेल काय माहिती?’ सिद्धांत विचार करत होता.
असेल तरी का? असा विचार त्याच्या मनात आला आणि मागे कुठतरी वाचलेले वाक्य आठवले, ‘Every single molecule of plastic that has ever been manufactured is still somewhere in the environment, and some 100 million tons of it are floating in the oceans.’
‘जगभरात जेवढे प्लॅस्टिक आत्तापर्यंत निर्माण केले गेले आहे, ते सर्व आजही पर्यावरणात कुठेतरी अस्तित्वात आहे. आणि सुमारे दहा दशलक्ष टन प्लॅस्टिक हे समुद्रांत आहे’ त्यावेळी त्याने ह्या वाक्याचा विशेष विचार केला नव्हता. पण आता त्यांच्या डोक्यात चक्र सुरू झाले.’
म्हणजे माझा डबा कुठेतरी आहे हे नक्की.
त्याचे आजोबांच्या डब्याकडे लक्ष गेले. आजी म्हणाली होती चाळीस वर्षे रोज तो डबा आजोबा वापरत होते. आजोबा निवृत्त होऊनही आता वीस वर्षे झाली असतील बहुतेक. म्हणजे डबा कमीतकमी साठ वर्षांचा आहे. डबा आजही अगदी छान आहे. घासून घासून थोडे चरे आले आहेत, पण अगदीच किरकोळ.
“स्टीलला काय होणार आहे, तूच काय तुझाही नातूही वापरेल.” सिद्धांतला आजीचे वाक्य आठवले.
‘माझ्या आजोबांचा साठ वर्षांचा डबा आणि मी एक वर्षभर वापरलेला डबा. दोन्ही डबे अस्तित्वात आहेत.
फरक काय? तर आजोबांचा डबा अजूनही चांगल्या स्थितीत आहे. पुढे साठ वर्षेही तो चांगल्या स्थितीत राहील. माझा डबा मात्र, कुठेतरी आहे. कुठेतरी म्हणजे नक्की कुठे?’
प्लॅस्टिकचे विघटन होत नाही. ते non-biodegradable आहे. पण ते photo-degrade होते. फोटो म्हणजे प्रकाश. सूर्यप्रकाशामुळे प्लॅस्टिक कडक होते आणि त्याचे तुकडे पडायला लागतात, आणखी छोटे छोटे तुकडे होत राहतात. ५ मि. मि.पेक्षा लहान आकाराच्या तुकड्यांना मायक्रोप्लॅस्टिक म्हणतात.
“माझ्या डब्याचे तुकडे होत होत मायक्रोप्लॅस्टिक तयार झाले असतील.” सिद्धांतच्या मनात आले.
हे तुकडे काय मग हलके असतात, कुठेही जातात.
आपले पूर्वज बराचसा काळ भटके जीवन जगत होते. शिकार करायचे, फळं आणि कंदमुळे गोळा करायचे. एखाद्या ठिकाणचा साठा संपला की तेथून दुसरीकडे जायचे.
बिया मातीत गेल्या की त्याच प्रकारचे रोप उगवते हे लक्षात आले आणि हळूहळू आपले अन्न आपण पिकवू लागलो म्हणजेच शेती करू लागलो. साधारण दहा हजार वर्षांपूर्वी शेतीची सुरुवात झाली.
आपला अन्नपुरवठा आपण निर्माण केल्याने आता एका ठिकाणहून दुसरीकडे जाण्याची गरज नव्हती. शिवाय पिकांची काळजी घेण्यासाठी त्याच ठिकाणी राहणे गरजेचे होते.
शेतीसाठी आणि राहण्यासाठी सगळ्यात चांगली जागं कुठली असेल? अर्थात नदीकाठ. पिण्यासाठी, इतर वापरासाठी आणि शेतीसाठी पाणी होते.
नदीला पूर येतो तेव्हा तिच्याबरोबर आणलेला गाळ ती काठावर पसरते. त्यामुळे नदीकाठांवरची माती अत्यंत सुपीक असते. त्यामुळेच नदीच्या काठाकाठाने वस्ती झाली, ती वाढत गेली आणि आज जी मोठी शहरे बघतो ती वसली.

नदी इतर प्रदेशाच्या तुलनेने खालच्या पातळीवर असल्याने पावसाचा पडलेला थेंब शेवटी नदीला येऊन मिळतो. पावसाचे पाणी पुढे वाहून नेणे हे एक खूप मोठे काम नदी करत असते.
नदीला येऊन मिळणारे हे पाणी आपल्याबरोबर वाटेतल्या अनेक गोष्टी घेऊन येते. अशा तऱ्हेने कचरा म्हणून पडलेले प्लॅस्टिक नदीत जाते. एक नदी दुसरीला मिळते तेव्हा हा कचरा पुढे जातो. असे करत शेवटी सगळा कचरा हा समुद्रापर्यंत पोहोचतो. समुद्रात सापडणाऱ्या प्लॅस्टिकपैकी सुमारे ८०% हे अशा प्रकारेच तिथे पोहोचलेले असते.
पुणे शहराचे उदाहरण घ्यायचे तर मुळा आणि मुठा ह्या दोन मुख्य नद्या. पवना ही मुळा नदीची उपनदी. तर अंबी आणि मोशी ह्या मुठा नदीच्या.
मुळा-मुठा संगमानंतर मुळा-मुठा नदी शिरूर तालुक्यात रांजणगाव सांडस गावात भीमा नदीला मिळते. पुणे शहराचा नदीतला कचरा भीमा नदीत जातो. भीमा म्हणजेच पंढरपूरला जिला चंद्रभागा म्हणतात ती.
त्या आधी आहे सोलापूरजवळचे उजनी धरण, हे भीमा नदीवरचे महाराष्ट्रातले शेवटचे धरण. त्याला टर्मिनल डॅम म्हणतात. मुळा-मुठा, इंद्रायणी, भामा आणि इतर उपनदयांचे पाणी जसे भीमेत आणि उजनी धरणात येते तसेच त्यांनी आपापल्या प्रदेशातून वाहून आणलेला कचराही येतो.
धरण भरले की त्याचे दरवाजे उघडले जातात. मग हा सगळा कचरा पुढे कर्नाटकात भीमा जेव्हा कृष्णा नदीला मिळते तेव्हा तिच्यात जातो. कृष्णा नदी शेवटी आंध्रप्रदेशात बंगालच्या उपसागराला मिळते.
माझा डबा गेला कुठे? कदाचित त्याचे झाकण जसे मातीत खोल गाडले गेले तसाच डबा कुठेतरी मातीत असेल?
किंवा कुठे टेकडीच्या पायथ्याशी वगैरे?
असाच कुठेतरी पडलेला, एखाद्या पावसाळ्यात नदीत पोहोचला असेल? एका नदीतून दुसऱ्या नदीत? मग समुद्रात?
किंवा माझ्या शहाराजवळच्या गावातल्या कचरा डेपोमध्ये?
जगभरात एकूण प्लॅस्टिक निर्माण होते त्याच्या सरासरी केवळ ९% प्लॅस्टिकचेच रिसायकलिंग होते. रिसायकलिंग म्हणजे ते प्लॅस्टिक वितळवून त्याच्यापासून परत काही वस्तू तयार करणे. ९% म्हणजे समजा प्लॅस्टिकच्या १०० वस्तू असतील, तर फक्त ९ वस्तूंचं शेवटी रिसायकलिंग होतं? १०० पैकी फक्त ९?
बाकी ९१ वस्तू कुठे जातात तरी कुठे?
३% वस्तू शेवटी समुद्रात जातात? म्हणजे प्रत्येक १०० वस्तू ज्या तयार होतात, त्यातल्या ३ कचरा म्हणून समुद्रात जातात?
माझ्या डब्याचे तुकडे मातीत, नदीत, समुद्रात, कुठेही असतील.

समुद्रातले मासे अन्न समजून प्लॅस्टिकचे तुकडे खातात.

पक्षी जेव्हा मासे खातात तेव्हा हे तुकडे त्यांच्या पोटात जातात. अमेरिकेत एका मेलेल्या पक्ष्याच्या पोटात प्लॅस्टिकचे किती तुकडे मिळाले माहित आहे? तब्बल १६०३!!
सिद्धांतच्या डोक्यातल्या विचारचक्राला आता चांगलीच गती मिळाली होती.
‘माझ्या एका डब्याने निसर्गाचं किती नुकसान केलं. हे नुकसान चालूच आहे कारण तो डबा अजून आहेच.’
त्याच्या डोक्यात पुढचा विचार आला. हा एकच डबा नाही. कधी कडी तुटली, कधी झाकणाला चीर गेली, ह्यामुळे वर्षाला दोन डबे तरी त्याला आणावेच लागतात. दादा कसा त्याच्या वस्तू नीट वापरतो वगैरे ऐकावे लागतेच शिवाय. अगदी दादाचं उदाहरण घेतले तरी त्याचा डबा दोन वर्षे टिकतो. अगदी दादासारखे वस्तू ‘नीट’ वापरणारा विद्यार्थी असेल तरी शाळेची पहिली ते दहावी अशा दहा वर्षांत तो पाच डबे तरी वापरतोच.
सिद्धांतने एक पाठकोरा कागद आणि पेन्सिल घेतली आणि आकडे मांडायला सुरुवात केली.
प्रत्येक वर्गात साधारण पन्नास विद्यार्थी. पहिली ते दहावी अशा दहा इयत्ता. प्रत्येक इयत्तेच्या दोन तुकड्या. म्हणजे वीस वर्ग. प्रत्येक वर्गात पन्नास विद्यार्थी. म्हणजे शाळेत एकूण हजार विद्यार्थी.
प्रत्येकाचे पाच डबे म्हणजे दर दहा वर्षांनी माझ्या शाळेतल्या विद्यार्थ्यांचे एकूण ५००० प्लॅस्टिकचे डबे कचऱ्यात जातात.

वरच्या गणिताप्रमाणे केवळ ९% डब्यांचे रिसायकलिंग होणार, ३% समुद्रात जाणार, बाकीही कचरा म्हणून निसर्गात राहणार. किती वर्षे? कितीतरी हजार वर्षे.
माझ्या आजोबांसारखा स्टीलचा डबा जर आम्ही सगळ्यांनी वापरला तर?
हा डबा तयार करण्यासाठी स्टील वापरलं. स्टील हा alloy म्हणजे मिश्र धातू आहे. लोखंड आणि कार्बन पासून ते तयार होते. लोखंड खाणीतून काढले गेले. निसर्गाचे नुकसान झालेच, नाही असे नाही.
डबा कारखान्यात तयार झाला तेव्हाही प्रदूषण झालेच. पण एवढेच. त्यानंतर आज ६० वर्षे झाली तो डबा वापरात आहे. अजून ६० वर्षे सहज वापरता येईल.
प्लॅस्टिकप्रमाणे स्टीलचेही विघटन होत नाही. पण स्टीलचे १००% रिसेकलिंग होते. प्लॅस्टिकचा दर्जा खालवातो तसे स्टीलचे होत नाही. म्हणजे माझ्या प्लॅस्टिकच्या डब्याचे रिसायकलिंग झाले तरी परत अशा प्रतीची वस्तू तयार होणार नाही. म्हणजे ज्यात अन्न खाता येईल असा डबा तयार होणार नाही. मग त्याची कुंडी, कचऱ्याचा डबा, अशा काहीतरी वस्तू होतील.
आजोबांच्या स्टीलच्या डब्याचे जेव्हा कधी रिसायक्लिंग होईल तेव्हा त्याच प्रतीचे स्टील परत मिळेल, ज्यापासून परत डबा किंवा नवीन काहीतरी तितकीच उपयोगी वस्तू तयार करता येईल.
पहिलीत स्टीलचा डबा घेतला तर शाळाच काय कॉलेजलाही तो वापरता येईल. आजोबांनी वापरला तसा नंतरही वापरता येईल.
“चांगली कल्पना आहे. आपल्या मुख्याध्यापिकांना का नाही सांगत”, दादा त्याची आकडेवारी निरखत म्हणाला.
“विद्यार्थ्यांनी डबा कुठला आणावा हे त्या कसं सांगणार?” सिद्धांत गोंधळला.
“का नाही. आपल्या शाळेत पुस्तकांना प्लॅस्टिकचे किंवा खाकी कागदाचे कव्हर घालायची परवानगी नाही. मुलं पाहिलीला प्रवेश घेतात तेव्हा पालकसभेत मुख्याध्या[पिका सांगतात, की पुस्तकाला कव्हर घालावे असा आमचा आग्रह नाही. तुम्हाला घालायचेच असेल तर वर्तमानपत्राचे घाला. प्लॅस्टिक किंवा बाजारातून विकत आणून घालायचे नाही.” दादा म्हणाला.
“हो, आणि आपल्या शाळेच्या नियम-पुस्तिकेतही हा नियम आहे.” सिद्धांत म्हणाला.
“मी शाळेत गेलो तेव्हा हा नियम नव्याने केला होता. आपण पुस्तक वापरणार वर्षभर, आणि त्याला घातलेलं प्लॅस्टिकचं कव्हर निसर्गात राहणार पुढची कितीतरी हजार वर्षे, हा निव्वळ वेडेपणा आहे, असं मुख्याध्यापिका म्हणाल्या होत्या. त्यांचं वाक्य माझ्या डोक्यात पक्कं बसलं. ते पहिलंच वर्ष होतं, त्यामुळे एवढं सांगूनही काही मुलांनी प्लॅस्टिक कव्हर घातलंच होतं. त्यांना ते भर वर्गात काढायला लावलं. मुख्याध्यापिका ठाम राहिल्या त्यामुळे आता हा नियम सगळ्यांच्या अंगवळणी पडला आहे.” दादाने सांगितले.
“आपल्याला ६ विषय असतात. १००० x ६ म्हणजे ६००० प्लॅस्टिकची कव्हरं दरवर्षी कचऱ्यात गेली असती, ते टळलं. खूप मोठा परिणाम आहे हा.” सिद्धांत कागदावरचे आकडे बघत म्हणाला.
“मुख्याध्यापकांकडे खूप मोठा बदल घडवायची क्षमता आहे. देशाच्या पातळीवर केंद्र सरकार, राज्याच्या पातळीवर राज्य सरकार, आपल्या शहराची महानगर पालिका तसेच शाळेसाठी मुख्याध्यापक ना. सरकार जसे कायदे करते तसे ते शाळेच्या पातळीवर करतात.” दादा म्हणाला.
“मुलं पाहिलीला प्रवेश घेतात तेव्हा त्यांनी शाळेसाठी काय काय खरेदी करायची ही यादी देतात. त्यात स्टीलचा डबाच हवा असा नियम शाळा करू शकते.” सिद्धांतचा चेहरा खुलला.
“नक्कीच. शिवाय असा नियम का आहे हेही ते सांगू शकतात. पहिले ते दहावी मुलं रोज शाळेत येणार आहेत. भरपूर वेळ आहे कारण सांगायला, चर्चा करायला.” दादा म्हणाला.
“मुख्याध्यापिका माझं ऐकतील का?” सिद्धांतने शंका बोलून दाखवली.
“हे गणित त्यांना दाखव. तुझं म्हणणं बरोबर आहे, जगभरातल्या लोकांनी केलेला अभ्यास तुझ्यापाशी संदर्भ म्हणून आहे. तू जे सुचवतो आहेस, ते सगळ्यांच्या फायद्याचं आहे. आर्थिकदृष्ट्याही कमी खर्चाचा पर्याय आह.” दादा म्हणाला.
“ही आकडेवारी आणि संदर्भ सगळं घेऊन मी मुख्याध्यापिकांकडे जातोच.” सिद्धांत उत्साहाने म्हणाला.
——समाप्त ——-
खूप मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक आपल्या पर्यवारणात पसरले आहे. आणखी प्लॅस्टिक पर्यावरणात जाणार नाही ह्यासाठी काम करणे आपल्या हातात आहे. सुरुवात करणे खूप महत्वाचे आहे.
प्लॅस्टिकच्या डब्याऐवजी स्टीलचा डबा वापरणे हा छोटासा निर्णय खूप मोठा सकारात्मक बदल घडवेल.
सिद्धांतप्रमाणे आपणही करून बघायचे?
—————
ह्या गोष्टीतली पात्रे जरी काल्पनिक असली तरी त्यांचा खऱ्या आयुष्यातल्या उपक्रमाशी संबंध आहे.
असा उपक्रम पुण्यात सुरू आहे. अधिक माहितीसाठी लिंकवर क्लिक करा,