ट्रीप ६: विठ्ठलवाडी - प्रति पंढरपूर
Google Map Location: विठ्ठलवाडी, सिंहगड रोड
पंढरपूरला जसे भीमा म्हणजे चंद्रभागेच्या काठी विठ्ठल मंदिर आणि नदीपात्रात पुंडलिक मंदिर आहे, अगदी तसेच मुठेकाठी विठ्ठलवाडीला आहे. आषाढी एकादशीला लाखो लोक ह्या ठिकाणी येतात.
अडीचशे वर्षाहून जास्ती जुने विठ्ठल मंदिर, पुंडलिक मंदिर, पुंडलिक मंदिराकडे जाणारा दगडी घाट, शेजारी पाण्याचा अखंड प्रवाह असलेले दोन गोमुख असा अत्यंत नयनरम्य परिसर आहे.
Pune Window Seat Tip: विठ्ठल मंदिरात दर्शन झाल्यावर बसॉल्ट मध्ये बांधलेले सुंदर मंदिर बघा. आवडेल तो कोपरा पकडून पाच मिनिटे शांत बसा.
विठ्ठलमंदिराच्या नदीच्या बाजूच्या दाराने बाहेर आलात की थोडे डावीकडे नागमोडी वळण घेऊन येणारी मुठा नदी दिसेल.
पुंडलिक मंदिराच्या घाटावरून नदीपात्रात उतरलात की समोर आहे पुंडलिक मंदिर, मुठा नदी आणि नदीपात्रातला काळा बसॉल्ट. पाताळेश्वर लेणी ज्यात कोरली तोच हा, सुमारे 6 कोटी वर्षांपूर्वी ज्वालामुखीच्या उद्रेकांतून निर्माण झालेला अग्निजन्य खडक.
नदीच्या प्रवाहाबरोबर दगड-गोटे फिरतात, खडकावर घासतात आणि रांजणखळगे तयार होतात. इथल्या नदीपात्रात असे रांजणखळगे आहेत.
Pune Window Seat Tip: नदीपात्रातल्या त्या सुंदर खडकावर, आपल्या नैसर्गिक वारशाच्या सानिध्यात बसून नदीवर येणारे विविध पक्षी बघा, कुदळ्या, चित्रबलाक, राखी वंचक, वुली नेकड् स्टॉर्क आणि बरेच. शहराच्या गोंगाटात हरवलेले क्षण बघा इथे सापडतात का.
ट्रीप ७: पांचगाव पर्वती वन विहार
Google Map Link: पांचगाव पर्वती वन विहार
शहराच्या मध्यवर्ती भागात जंगलाचा अनुभव घ्यायचा असेल, एक सकाळ वाहनांच्या आवाजाऐवजी पक्ष्यांच्या किलबिलाटात घालवायची असेल, तर इथे नक्की भेट द्या.
पाण्याची बाटली आणि पायात स्पोर्ट्स शूज आवश्यक.
उन्हाळ्यात आलात तर टोपी हवीच.
व्यायामाचा मूड असेल तर मुख्य रस्त्यापाशीच वाहन ठेवून चालायला सुरुवात करा.
पण वेताळ टेकडीसारखे इथे नाही — डांबरी रस्ताच आहे.
नाहीतर वन विहारापर्यंत वाहनानेही जाता येते.
वेताळ टेकडीप्रमाणे इथेही मोर आहेत. त्यांचे दर्शन मात्र पानगळीच्या काळातच होण्याची शक्यता जास्त.
एरवी हिरव्यागार झाडीतून येणाऱ्या आवाजांवरच समाधान मानावे लागते.
पॅराडाईज फ्लायकॅचर — छोटासा, पण लांब शेपटी असलेला सुंदर पक्षी — इथे दिसतो.
तसेच बुलबुल, स्वर्गीय नर्तक, राखी वटवट्या, मैना, कोतवाल, सूर्यपक्षीही आढळतात.
अशा ठिकाणी शक्यतो निसर्गात मिसळून जातील असे रंग घालावेत —
हिरवे, ब्राऊन, काळे, करडे.
लाल, पांढरा, निळा हे रंग टाळावेत.
Pune Window Seat Tip: फोन सायलेंटवर टाका. निसर्गातल्या आवाजांशी समरूप होत चालत रहा.
बघा कसे वाटते.
इथे आखीव-रेखीव रस्ता आहे, तशाच काही पायवाटाही आहेत. दमलात तर क्षणभर विश्रांती घ्यायला बाक आहेत.
नुसताच फेरफटका मारा.
दुर्बिण घेऊन पक्षीनिरीक्षण करा. झाडांची, पक्ष्यांची नोंद करा. फुलपाखरे बघा. बाकावर बसून पुस्तक वाचा. किंवा चेहऱ्यावर स्मितहास्य ठेवून नुसतेच चालत रहा.
इथून इथे गेलेच पाहिजे, एवढे अंतर पार केलेच पाहिजे —
असे काही बंधन नाही.
आजच सगळे बघितले पाहिजे असाही आग्रह नाही.
Pune Window Seat Tip: बाकावर बसा. डोळे मिटा. पक्ष्यांचे आवाज तुम्हाला तुमच्या गावी, तुमच्या घरी घेऊन जातात का — ते बघा.
ट्रीप ८: आगाखान पॅलेस
Google Map Link: आगाखान पॅलेस
९४२ ते १९४४ या काळात महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी आणि गांधीजींचे सहकारी महादेव देसाई यांना येथे नजरकैदेत ठेवण्यात आले होते.
‘भारत छोडो’ आंदोलनानंतर ब्रिटिश सरकारने त्यांना या ठिकाणी स्थानबद्ध केले होते.
या काळात कस्तुरबा गांधी आणि महादेव देसाई यांचे येथेच निधन झाले.
त्यांच्या समाधी परिसरात आहेत.
महात्मा गांधींचे स्मारकही येथे आहे, ज्यामध्ये त्यांची रक्षा ठेवलेली आहे.
हा पॅलेस तिसरे सुलतान महम्मद शाह आगा खान यांनी १८९२ साली बांधला.
येथे सहा दालनांचे संग्रहालय आहे. त्या दालनांमध्ये ‘भारत छोडो’ आंदोलनाशी संबंधित माहिती, छायाचित्रे आणि दस्तऐवज पाहायला मिळतात.
ही वास्तू ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची आहेच,
पण त्याचबरोबर १९ एकरांवर पसरलेला हा परिसर शांत, हिरवागार आणि देखणा आहे.
इतिहास वाचण्यासाठी नाही, तर अनुभवण्यासाठी इथे यावे असे वाटते.
Pune Window Seat Tip:
स्वतंत्र भारताचे नागरिक म्हणून आपण आज ज्या स्वातंत्र्यात जगतो,
त्या स्वातंत्र्यासाठी झटलेल्या सर्व स्वातंत्र्यसैनिकांची आठवण आणि जाणीव —
हीच त्यांना खरी श्रद्धांजली आहे.
ट्रीप 9: लाल महाल आणि शनिवार वाडा
Google Map Link: https://share.google/Y5t421Zn1qBF8Apn2
Right in the heart of the city — हे या दोन वास्तूंविषयी केवळ त्यांच्या भौगोलिक स्थानामुळे नाही, तर त्यांच्या ऐतिहासिक आणि भावनिक महत्त्वामुळे म्हणता येईल.
लाल महाल हे छत्रपती शिवाजी महाराज आणि मातोश्री जिजाबाई यांचे निवासस्थान होते. त्यांच्या सान्निध्याने पावन झालेले हे ठिकाण.
पुणे आणि सुपे ही छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे यांची जहागीर होती.
स्वराज्यस्थापनेचे बीज इथे पेरले गेले.
सामान्य लोकांना एकत्र करून स्वराज्य उभे करण्याचा प्रवास छत्रपती शिवाजी महाराजांनी याच ठिकाणाहून सुरू केला.
मूळ लाल महाल दुर्दैवाने आज अस्तित्वात नाही.
सध्याची वास्तू पुणे महानगरपालिकेने उभारलेली आहे.
खरे तर पुण्याची ओळख करून घ्यायची असेल तर सुरुवात इथूनच व्हायला हवी.
पण ऐन गावात असल्यामुळे इथले रस्ते, रहदारी आणि गोंधळ पुण्यात नवीन असणाऱ्यांना अवघड वाटू शकतो.
म्हणूनच ही ट्रीप थोडी नंतर — शहराच्या वेगाची आणि रस्त्यांची सवय झाल्यावर — सुचवली आहे.
१६६३ साली औरंगजेबाचा सरदार शाइस्ताखान पुण्यावर चाल करून आला.
तो लाल महालातच राहात होता.
एका रात्री छत्रपती शिवाजी महाराजांनी लाल महालावर छापा घातला.
शाइस्ताखान खिडकीतून पळून जात असताना महाराजांनी तलवारीने त्याची बोटे छाटली —
हीच ती जागा, जी त्या थरारक घटनेची साक्षीदार आहे.
आज लाल महाल परिसरात जिजाबाई आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे उभे आहेत.
🪟 Pune Window Seat Tip
इथे एका जागी क्षणभर बसा.
जिजाबाईंनी शिवाजी महाराजांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना याच ठिकाणी शौर्याच्या गोष्टी सांगितल्या असतील…
शहाजीराजांच्या मार्गदर्शनाखाली दादोजी कोंडदेवांसोबत महाराज मावळच्या दऱ्या-खोऱ्यांत फिरायला इथूनच निघाले असतील…
हे सगळं डोळ्यांसमोर आणा.
क्षणभर ट्रॅफिकचा आणि रहदारीचा आवाज नाहीसा होईल.
मनाने तुम्ही १७व्या शतकात पोहोचाल.
लाल महालातून — आणि १७व्या शतकातून — बाहेर आलात की समोरच आहे शनिवार वाडा.
शनिवार वाडा बाजीराव पेशवे प्रथम यांनी १७३२ साली बांधला.
छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू, छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र — छत्रपती शाहू महाराज साताऱ्याहून राज्य करत असत.
पेशवे हे त्यांचे पंतप्रधान होते.
बाजीराव पेशवे आणि नंतर श्रीमंत नानासाहेब पेशवे यांच्या काळात पुणे हे मराठा साम्राज्याच्या राजकीय घडामोडींचे केंद्र बनले.
शनिवार वाड्यात अनेक मोहिमांचे बेत, युद्धाचे निर्णय घेतले गेले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्याचा विस्तार श्रीमंत नानासाहेब पेशव्यांच्या काळात अटक (आजचे पाकिस्तान) ते कटक (ओडिशा) इतका झाला.
दिल्लीतील लाल किल्ल्यावर भगवा झेंडा तब्बल ११ वर्षे फडकत होता.
१८१८ मध्ये पेशव्यांचा पराभव झाला आणि पुण्यात ब्रिटिश सत्ता प्रस्थापित झाली.
१८२८ मध्ये शनिवार वाड्याला लागलेल्या आगीत आतले लाकडी बांधकाम नष्ट झाले.
आज येथे संध्याकाळी Sound & Light Show होतात — इतिहास जिवंत करणारा अनुभव असतो.
🪟 Pune Window Seat Tip
पटांगणातल्या बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याजवळ क्षणभर थांबा.
त्यांच्या युद्धतंत्राचे धडे आजही सैन्य प्रशिक्षणात दिले जातात.
शनिवार वाड्याच्या दरवाजातून मोहिमेवर निघालेले पेशवे तुम्हाला दिसतात का — बघा.
अशा प्रकारे १७व्या आणि १८व्या शतकात फेरफटका मारून ही ट्रीप संपते.
समोरच छत्रपती शिवाजी महाराज पूल आहे.
तो पूल ओलांडला की पुणे महानगरपालिका बस स्थानक आणि मेट्रो स्टेशन अगदी जवळच आहे.