Going Zero Waste

बाकी शून्य

साल १९१३. जग पहिल्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर होते.

इंग्लंडमध्ये शेफील्ड येथील मेटॅलर्जी म्हणजे धातूशास्त्राच्या प्रयोगशाळेत हॅरी ब्रिअरली खूप महत्वाच्या कामात गुंतला होता. गन बॅरल म्हणजे बंदूक/ तोफेची जी पुढची नळी असते ती जेवढी मजबूत करता येईल तेवढी करायची आणि त्यासाठी योग्य मटेरियल शोधायचे हे त्याचे काम होते.

हॅरी ब्रिअरलीला मजबूत मटेरियल निवडायचे होते. तो विविध मटेरियल मिसळून वेगवेगळे alloy तयार करून बघत होता. Alloy करायचा, त्याची बॅरल तयार करायची आणि ती किती मजबूत झाली आहे ह्याची चाचणी घ्यायची असे त्याचे काम चालू होते. कितीतरी मटेरियल्स वापरून कितीतरी प्रयोग त्याने केले पण त्याला हवे तितके मजबूत मटेरियल काही तयार होत नव्हते.

मजबूतपणाच्या कसोटीवर न उतरलेले नमुने तो प्रयोगशाळेच्या बाहेर एका कोपऱ्यात फेकून देत होता. हळूहळू त्या फेकून दिलेल्या, मजबूतपणाच्या चाचणीत नापास झालेल्या मटेरियल्सचा ढीग वाढत होता. इंग्लंडच्या दमट हवेत, पावसात पडून ती मटेरियल्स काळी पडली, गंजू लागली.

एक दिवस मात्र छान ऊन पडले होते. त्या गंजलेल्या, काळवंडलेल्या मटेरियल्सच्या ढीगात हॅरीला काहीतरी चमकताना दिसले. असेल काहीतरी म्हणून खांदे उडवून तो निघून जाऊ शकला असता. पण त्याने तसे केले नाही. आणि त्याबद्दल आपण सगळे त्याचे ऋणी आहोत.

त्याने तो तुकडा निरखून बघितला. त्या मटेरियलवर कुठलाही थर आला नव्हता किंवा तो गंजला नव्हता. 

काय मटेरियल त्याने तयार केले होते?

लोखंड आणि कार्बन ह्यांचा alloy म्हणजे स्टील. लोखंड ऑक्सिजनच्या किंवा पाण्याच्या संपर्कात आले की आयर्न ऑक्सायाईड तयार होते. त्याला आपण गंज म्हणतो. 

लोखंड, कार्बन ह्यांच्या जोडीला क्रोमियम मिसळला की आणखी वेगळा alloy तयार होतो, जो हॅरीने अपघाताने तयार केला होता.

इथे मात्र एक गंमत होते. ‘पाहुण्याच्या काठीने साप मारावा’ तसे हा पाहुणा म्हणजे क्रोमियम हा ऑक्सिजनबरोबर प्रक्रिया करतो आणि क्रोमियम ऑक्साइड तयार होते. ह्या क्रोमियम ऑक्साइडचा संरक्षक थर तयार होतो ज्यामुळे लोखंड ऑक्सिजनच्या संपर्कात येतच नाही. त्यामुळे स्टीलपेक्षाही एक फायदा आपल्याला मिळतो की हे मटेरियल कधीही गंजत नाही.

क्रोमियम ऑक्साइडला स्वतःला काही चव नाही, रंग नाही, वास नाही. लोखंडाच्या भांड्यात काही पदार्थ ठेवला की अर्थात त्याचे आरोग्यासाठी फायदे असले तरी पदार्थांचा रंग आणि चव बदलते, तसे इथे होत नाही. 

हे मटेरियल एव्हाना तुम्ही ओळखलेच असेल ना? बरोब्बर!! हॅरी ब्रिअरलीने तयार केलेले हे मटेरियल होते स्टेनलेस स्टील!!

———

बाकी शून्य

“काकू, तुमच्याकडे किती ताटल्या आहेत?” शंतनुने विचारले. 

“ताटल्या? कसल्या ताटल्या?” काकू गोंधळून गेल्या.

“काकू, स्टीलच्या ताटल्या.” मीनलने तपशीलवार सांगितले. 

“काय बेत काय आहे? काहीतरी नवीन प्लॅन चाललेला दिसतोय तुमच्या गँगचा.” आधी गोंधललेल्या काकू आता मीनलच्या हातातले डायरी आणि पेन बघून उत्सुकतेने विचारू लागल्या. 

“हो काकू, प्लॅन आहे. पण आत्ता नाही सांगत. सरप्राईज आहे. ” मीनल म्हणाली. 

“बरं बाई, हरकत नाही. तुम्ही पाचजण करत आहात म्हणजे काहीतरी चांगलंच असणार.” काकू कौतुकाने म्हणाल्या, “आमच्याकडे ना एकूण सहा ताटल्यांचा सेट आहे आणि दोन थोड्या वेगळ्या आहेत. चालतील का?” 

“हो काकू, मग तुमच्या आठ ताटल्या धरते. आणि चमचे?” मीनल म्हणाली. 

“चमचे एक डझन लिही.” काकूंनी आठवून सांगितले. 

“एक डझन म्हणजे बारा!” नुकतेच हे सगळे शाळेत शिकल्याने शंतनु विजयीमुद्रेने म्हणाला. 

“थॅंक यू काकू!” म्हणत दोघे तेथून पुढच्या घरी निघाले. 

ह्या दोघांना ताटल्या आणि चमच्यात काय एवढा रस आहे हा विचार करत शिर्के काकूंनी दार लावले. 

तासाभराने पाचही जण त्यांच्या लाडक्या ट्रीहाऊसमध्ये जमले. सगळ्यांकडे कागद होते. सिद्धांत, अरमान आणि चारूही सोसायटीतल्या लोकांकडून माहिती गोळा करून आले होते. शंतनु लहान असल्याने तो आणि मीनल अशी जोडगळी एकत्र गेली होती. 

चारुने कागद गोळा केले. सिद्धांतने लॅपटॉप सुरू केला. चारू नाव आणि संख्या सांगत गेली आणि एक्सेलमध्ये सिद्धांत यादी करत गेला. 

“एकूण किती झाल्या ताटल्या?” चारूची यादी संपली तसे अरमानने विचारले.

“सांगतो हा,” म्हणत सिद्धांतने त्या रकान्याची बेरीज करून, “एकूण ताटल्या दोनशे” असे सांगितले. 

“आणि चमचे?” 

“दोनशे वीस.” सिद्धांतने सांगितले. 

“अरे वा. खूप झालं की. पुरेल आपल्याला.” चारू म्हणाली, 

“हो. म्हणजे हे काम झालं. आता आदल्या दिवशी यादीप्रमाणे सगळ्यांकडून हे सामान गोळा करून ठेवलं की झालं.” सिद्धांत म्हणाला. 

“स्टीलच्या ताटल्यांचे वजन खूप होईल बरं का.” मीनल म्हणाली. 

“माझ्या आई आणि बाबाच्या बॅगला चाकं आहेत. विमानाने जातात ना तेव्हा त्याच बॅग घेऊन जातात. त्यात भरलं की वजनाचं काहीच टेंशन नाही.” शंतनु म्हणाला. 

“खरंच की. भारी कल्पना आहे शंतनु.” त्याला दाद देत सिद्धांत म्हणाला. 

“भारी!!” मीनलने दुजोरा दिला. 

शंतनु स्वतःवर खूश होऊन हसला. गँगमध्ये सगळ्यात लहान असल्याने असे ताई आणि दादा लोकांकडून कौतुक झाले की तो जाम खूश व्हायचा. 

“आई-बाबांना विचारून ठेव त्यांना त्या दिवशी बॅग लागणार नाहीये ना.” सिद्धांत म्हणाला. शंतनुने मान डोलावली. पाचही जण मग पुढचा बेत ठरवून आपापल्या घरी गेले. 

———

ह्याची सुरुवात झाली ती आदल्या आठवड्यात. लवकरच गणपती येणार होते. सगळीकडे तयारी सुरू होती. लोकांच्या घरी गणपती बसतोच पण सोसायटीचा एकत्र गणपतीही असतो. सोसायटीच्या बागेसमोर मांडव घालणे चालू होते. 

दहा दिवस नुसती धमाल असणार होती. गणपतीसमोर रांगोळी कोणी काढायची, दहा दिवस संध्याकाळी आरती कोणी कोणी करायची, प्रत्येक दिवशीचा प्रसाद काय असेल, कार्यक्रम काय ठेवायचे, नुसती धांदल सुरू होती.

गणपतीची मूर्ती रंगवायला दिली होती. गणेश चतुर्थीला तेथून वाजत-गाजत मूर्ती सोसायटीत आली. लहान-मोठे सगळे मिरवणुकीत सामील झाले. मूर्ती मांडवात स्थानापन्न झाली. 

पहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी एकत्र जेवण असायचे. मस्त बेत होता. सगळ्यांनी मोदकांवर ताव मारला. 

चारू तिची ताटली ठेवायला गेली आणि मात्र तिला धक्का बसला. वापरलेल्या ताटल्या टाकायला दोन मोठे टब ठेवले होते. ते भरून वहात होते. तिथेच कडेला दोन पोती वापरलेल्या ताटल्या-चमचे ह्यांनी भरली होती. 

आज जवळ जवळ दिडशे लोक जेवले होते. पेपर कप्स, कागदाच्या ताटल्या, प्लॅस्टिकचे चमचे. एका तासात हा एवढा कचरा आपण निर्माण केला? 

ते दृश्य बघून चारू अस्वस्थ झाली. ताटली ठेवायला गेलेल्या चारूला एवढा वेळ का लागला बघायला बाबा आले. 

“ह्याचं पुढे काय होणार?” टबकडे बोट दाखवत चारूने विचारले. 

“आपण रिसायक्लिंगला पाठवू, मी सेक्रेटरींशी बोलतो.” बाबा म्हणाले. 

काही वर्षांपूर्वी मुंबई जवळच्या देवनार कचरा डेपोला आग लागल्याची बातमी तिने बघितली होती. कचऱ्याचे डोंगर होते तिथे. आठवडाभर ते डोंगर जळत होते. काळाकुट्ट धूर सगळीकडे पसरला होता. तिथल्या लोकांच्या मुलाखती दाखवत होते. कचऱ्यामुळे किती त्रास होतो हे त्यांनी सांगितले. हवा प्रदूषित, पाणी प्रदूषित. त्यात हा धूर. कसे रहात असतील ते लोक? 

‘हा आपण निर्माण केलेला कचरा असाच कचराडेपो मध्ये जाणार की बाबा म्हणतात तसा रिसायक्लिंगला जाईल?’ चारू विचार करत होती. तो टब काही केल्या चारूच्या नजरेसमोरून जाईना. घरी जाताच तिने इंटरनेटवर माहिती घ्यायला सुरुवात केली. जे कळले त्यामुळे ती आणखीनच अस्वस्थ झाली. 

दुसऱ्या दिवशी रविवार, सुट्टीचा दिवस. रात्री झोपताना तिने गँगला ग्रुपवर मेसेज टाकला की उद्या सकाळी दहा वाजता ट्रीहाऊस मध्ये भेटू, महत्वाचे बोलायचे आहे. 

त्यांची सोसायटी म्हणजे काही इमारती आणि काही बंगले अशी होती. मीनलच्या काका-काकूने बंगल्यासाठी म्हणून जागा घेतली होती. पण ते भारतात नव्हते. बरीच वर्षे अमेरिकेत आणि आता सध्या दुबईत रहात होते. निवृत्त झाल्यावर पुण्यात स्थायिक व्हायचे, घर बांधायचे म्हणून ही जागा घेऊन ठेवली होती. आत्ता ती रिकामीच होती. वावळाचा एक मोठा वृक्ष तेथे होता. त्यावर काका आणि गँगने मिळून ट्रीहाऊस बांधले होते. 

हे ट्रीहाऊस म्हणजे गँगचा अड्डा होता. खेळायला, चर्चा करायला ते इथे जमायचे. 

—–——–

 

“काय झालं चारू? एवढी तातडीची मीटिंग?” सिद्धांतने विचारले. मीनल आणि शंतनु आले होते. 

“थांब, अरमानलाही येऊ दे, मग सांगते” पळत पळत येणाऱ्या अरमानकडे बघत चारू म्हणाली.

“सॉरी, सॉरी, उशीर झाला. बाप्पासाठी जास्वंदीची फुलं शोधत होतो.” धापा टाकत बसत अरमान म्हणाला. 

“काल आपलं सोसायटीचं जेवण झालं.” चारूने सुरुवात केली. 

“मोदक भारी होते. मी किती खाल्ले माहित आहे?” शंतनु हाताची चार बोटे दाखवत म्हणाला.   

“भारी शंतनु!!” चारु त्याच्या उत्साहाला दाद देत म्हणाली, “काल जेवायला आपण डिस्पोजेबल ताटल्या, वाट्या आणि चमचे वापरले. पाणी प्यायला पेपर कप होते. आपलं जेवण झाल्यावर कचऱ्याचा मोठा ढीग झाला होता.” 

“हो, मी बघितला.” अरमान म्हणाला. 

“पण ते सगळं रिसायक्लिंगला जाईल  ना?” मीनल म्हणाली. 

“नाही. मी रात्री त्याबद्दल वाचलं इंटरनेटवर.  ते रीसायकल नाही होणार.” चारू म्हणाली. 

“का?”

“चमचे प्लॅस्टिकचे होते पण बाकी सगळं तर कागदाचं होतं ना. पेपर कप, पेपर प्लेट? कागद कुजून जातो शिवाय रीसायकलही होतो.” सिद्धांत म्हणाला. 

“पेपर कप म्हणजे कागदाचा कप आहे असं आपल्याला वाटतं. मी तुम्हाला प्रयोग करून दाखवते.” असे म्हणत चारूने पेपर कप हातात धरला आणि त्यात पाणी ओतले. “पाण्याच्या संपर्कात आल्यावर कागदाचं काय होतं?” 

“कागद ओला होतो.” अरमान म्हणाला. 

“आणि मग त्याचा लगदा होतो.” मीनल म्हणाली. 

चारूने पेपर कप समोर धरला. “म्हणजे पेपर कपचा एव्हाना लगदा व्हायला हवा होता?” तिने विचारले.

“हो. आत्तापर्यन्त कागदातून पाणी गळायला पाहिजे.” अरमान म्हणाला. 

“काल ह्या पेपर कप्समधून सगळे पाणी प्यायले. संध्याकाळी आरतीनंतर चहा-कॉफीला सुद्धा असेच पेपर कप होते. गरम चहा त्यात ओतला तरी कप तसाच्या तसा होता. हे कसं काय?” चारूने प्रश्न केला. 

“ह्याचा अर्थ हा नुसता कागद नाही?” मीनल पुटपुटली. 

“त्याला वॉटरप्रूफ केलं आहे.” सिद्धांत म्हणाला. 

“पण कसं? काय वापरलं असेल?” अरमानने विचारले. 

“अर्थात प्लॅस्टिक! पेपर कपला बाहेरून कागद आणि आतून प्लॅस्टिकचा पातळ थर असतो. पेपर कप हे फसवं नाव आहे.” चारू म्हणाली. 

“पण तरीही मला प्रॉब्लेम काय आहे हे कळलं नाही चारू. प्लॅस्टिकचं रिसायक्लिंग होतं आणि कागदाचंही.” सिद्धांतने विचारले. 

“तिथेच सगळी गोम आहे. सगळ्या प्लॅस्टिकचं रिसायक्लिंग होत नाही. जगात एकूण जे प्लॅस्टिक वापरलं जातं त्यातलं फक्त ९ टक्केच रीसायकल होतं.” चारू म्हणाली. 

“९ टक्के म्हणजे?” शंतनुने विचारले. 

“प्लॅस्टिकच्या १०० वस्तू असतील तर त्यातल्या फक्त ९ रीसायकल होतात.” चारू म्हणाली. 

“म्हणजे ९१ वस्तू रीसायकल होतच नाहीत?” सिद्धांतने विचारले. 

“नाही. प्रत्येक १०० वस्तूतल्या ९१ कचरा ठरतात. एवढंच नाही. प्लॅस्टिक फक्त दोन ते तीन वेळाच रीसायकल होऊ शकतं.” चारू म्हणाली. 

“का?” 

“प्लॅस्टिक रिसायक्लिंग म्हणजे प्लॅस्टिकच्या वस्तू वितळवून त्यापासून नवीन वस्तू केली जाते. प्लॅस्टिक मटेरियल जेव्हा वितळवल जातं तेव्हा ते कुमकुवत होतं. मूळ दर्जाचं प्लॅस्टिक मिळत रिसायक्लिंगनंतर नाही. प्रत्येक रिसायक्लिंगबरोबर प्लॅस्टिकचा दर्जा खालावतो. दोन-तीन वेळा रिसायक्लिंग झालं की प्लॅस्टिक इतकं कुमकुवत झालेलं असतं की ते कशासाठीच वापरता येत नाही. त्यापासून नवीन काहीच करता येत नाही. त्यामुळे मग ते कचरा डेपोत जातं.” चारू म्हणाली. 

“मी ऐकलं होतं ज्याला अन्न लागलेलं असतं म्हणजे ‘सोईल्ड प्लॅस्टिक’ रीसायकल होत नाही.” अरमान म्हणाला. 

“हो, ही आणखी एक समस्या आहे. म्हणजे पेपर कप आणि पेपर प्लेट रिसायक्लिंगला जाणारच नाहीत कारण त्याला तेल, अन्नाचे कण, चहा-कॉफीचा अंश असेल. ते थेट कचरा डेपोला जाणार.” चारू म्हणाली. 

“कचरा डेपोमध्ये ते साठत राहणार आणि कचऱ्याचे नवीन डोंगर तयार होत राहणार.” मीनल म्हणाली. 

“प्लॅस्टिकचं विघटन करण्याचं आत्ता आपल्याकडे तंत्रज्ञान नाही. राहू दे आत्ता साठत. नाहीतरी प्लॅस्टिक ‘ईनर्ट’ आहे ना. पुढे भविष्यात काही तरी तंत्रज्ञान येऊ शकेल ना. त्यावेळी त्या कचऱ्याच्या डोंगराचं काहीतरी करता येईल. असंही होऊ शकतं ना?” सिद्धांत विचार करत म्हणाला. 

“हा विचार बरोबर आहे. पण मी काल जे वाचलं त्याप्रमाणे प्लॅस्टिकचं विघटन होत नाही, पण ते तसंच्या तसं रहातही नाही.” चारू म्हणाली. 

“म्हणजे?” 

“म्हणजे प्रकाशात राहून राहून त्याचे तुकडे पडत जातात. त्याला फोटो डिग्रेडेशन म्हणतात.” चारू म्हणाली. 

“फोटो?” शंतनुने विचारले. 

“फोटो म्हणजे प्रकाश. प्लॅस्टिकचे छोटे तुकडे होत जातात. साधारण तिळापेक्षा लहान तुकडा झाला की त्याला मायक्रोप्लॅस्टिक म्हणतात.” चारू म्हणाली. 

“हो, गच्चीवरच्या बागेतल्या झाडाच्या कुंड्यांचे नाही का तुकडे पडत. प्लॅस्टिक कडक होतं आणि मग हात लावला तरी तुकडा पडतो.” मीनल म्हणाली. 

“बरोबर. कचरा डेपोतल्या प्लॅस्टिकचं तेच होतं. ते छोटे तुकडे पावसाच्या पाण्याबरोबर, वाऱ्याबरोबर सगळीकडे पसरतात. आज अशी अवस्था आहे की मायक्रोप्लॅस्टिक सगळीकडे आहे, आपल्या हवेत, पाण्यात, मातीत आणि समुद्रात, आपल्या अन्नसाखळीत.” चारू म्हणाली. 

 

“बापरे!!!!”  

  ———-

 

“प्लॅस्टिक तयार कसं होतं हयाबद्दल मी वाचलं.” संगीता म्हणाली, “बरीच घातक रसायनं त्यात मिसळली असतात.” 

 

“का पण? ती घातक आहेत हे माहित आहे ना? मग का घालतात?” अरमानने विचारले. 

 

“आपल्याला रंगीत गोष्टी आवडतात ना. शिवाय आकारही. रंग, लवचिकता यावी अशा बऱ्याच कारणांसाठी ही रसायनं घालतात.” संगीता म्हणाली. 

“प्लॅस्टिक आता आपण खूप वर्षे वापरत आहोत. अभ्यास होऊन आता ह्या रसायनांचे दुष्परिणाम लक्षात आले आहेत.” चारू म्हणाली. 

“रिसायक्लिंग होत नाही ही समस्या आहेच. संगीता म्हणते तसं प्लॅस्टिकमध्ये घातक रसायनं असतील तर पेपर कपमधून चहा पिताना आपल्या पोटातही जाणारच ना?” गणेशने विचारले. 

“हो, तर. त्याला लिचिंग का काही तरी म्हणतात. म्हणजे रसायनांचा काही अंश त्यात ठेवलेल्या पदार्थात उतरतो.” संगीता म्हणाली. 

“त्यातसुद्धा गरम पदार्थ असेल तर लिचिंगचं प्रमाण जास्ती.” 

“आणि काल चहा घेताना लोक गरम आहे ना रे चहा, मला उकळता चहा लागतो वगैरे म्हणून पेपर कपमध्ये चहा घेत होते.” मीनल म्हणाली. 

गणेश आणि गँगशी ऑनलाईन चर्चा सुरू होती. आता त्यांचा हा दर रविवारचा कार्यक्रमच होऊन गेला होता. “काल आमच्या सोसायटीचा गणपती बसला. त्यावेळी जेवण आणि नंतर चहा-कॉफी ह्यासाठी वापरलेल्या सिंगल-यूज ताटल्या-कप-चमच्यांच्या कचऱ्याचा मोठा ढीग झाला. त्यामुळे आम्ही अस्वस्थ झालो आहोत.” चारूने सांगितले आणि त्यावरून चर्चा सुरू झाली. 

“आपण देवीच्या जत्रेला काय युक्ती केली ती सांग ना.” राजू म्हणाला. 

“आम्ही का? तू सांग की.” शैलेश त्याला चिडवत म्हणाला. 

“नको रे. मला तुमच्यासारखं मुद्देसूद बोलता येत नाही. लिहून देऊ शकतो.” राजू लाजून म्हणाला. 

“ह्या २६ जानेवारीला राजूचं भाषणच ठेवू शाळेत आपण.” पूजा म्हणाली. 

चिडवाचिडवीची ही संधी कोणी सोडणार थोडंच होते? मग काय, दोन्ही गँगने राजूला भरपूर त्रास दिला. 

“आमच्या गावात दरवर्षी देवीचा उत्सव असतो. त्यावेळी गावजेवण असतं. पूर्वी पत्रावळ्या असायच्या. खाऊन झालं की दिली टाकून, मातीत मिसळून जायची. पण आता प्लॅस्टिकच्या प्लेट्स आहेत. मागे थरमोकोलच्याही होत्या त्या आता बंद केल्या. मटेरियल बदललं पण सवय तीच राहिली, वापरली आणि दिली फेकून. देवीच्या देवळामागे दरवर्षी खूप कचरा जमा व्हायचा. बघवत नव्हतं आम्हाला. आम्ही एक कल्पना केली.” गणेश म्हणाला. 

 

गणेश आणि गँगची युक्ती ऐकायला सगळ्यांचे कान टावकरले. 

“मला काय वाटतं गणपतीच्या पहिल्या दिवशी कचरा झाला. आता त्याबद्दल वाईट वाटून घेण्यापेक्षा विसर्जनाच्या दिवशी तुमचे परत एकत्र जेवण आहे ना, त्यावेळी हे सगळं टाळता येईल का ह्यांबद्दल विचार करू. अजून नऊ दिवस आहेत ना आपल्याकडे.” गणेश म्हणाला. 

 

“आपला प्रॉब्लेम सारखाच आहे. तुम्ही केलेली युक्ती आम्हालाही वापरता येईल.” चारू म्हणाली.  

“हो ना. आम्हीही तसंच करतो.” सिद्धांत म्हणाला. 

“चला मग, कामाला लागतो आम्ही.” अरमान म्हणाला.  

गणेश आणि गँगमुळे प्लॅन तर मिळाला होता. आता तो अमलात आणायचा होता. 

 

————–

प्रत्येक घरातून थोड्या ताटल्या, वाट्या, भांडी मिळाली तरी काम होणार होते. म्हणूनच गँग घरोघरी जाऊन ताटल्या, चमचे आणि भांड्यांचा हिशोब लावत होती. गँग आणि त्यांच्या आई-वडिलांची चर्चा रंगली. 

“कल्पना चांगली आहे. पहिल्या दिवशी खूप कचरा निर्माण झाला हेही मान्य आहे. पण वापरलेली ताटे धुणार कोण?” मीनलच्या आईने विचारले. 

“गणेशच्या गावात त्यांनी लोकांकडून ताटे गोळा करून गाव जेवणात वापरली. प्रत्येकाला आपलं ताट धुवायला सांगितलं.” मीनल म्हणाली. 

“पण लोकांना आपण असं सांगणार?” चारूचे बाबा म्हणाले. 

“काय हरकत आहे. आपण हिमालयात ट्रेकिंगला जातो तेव्हा आपापली ताटं धुतो की.” चारूची आई म्हणाली. 

“हो, ते आहे. मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये गेलो होतो. थंड पाण्यात हात गोठत होते तरी आपापली ताटं धुतलीच आपण.” अरमानचे बाबा म्हणाले. 

 

“तिथे इलाजच नसतो ना. करावंच लागतं. इथे लोक तयार होतील का?” अरमानची आई म्हणाली. 

“असं का करायला सांगत आहोत हे नीट सांगू ना. मला नाही वाटत कोणी काही हरकत घेईल.” शंतनुचे बाबा म्हणाले.  

“लोकांना कचरा किंवा त्यातही प्लास्टिकचा कचरा ही मोठी समस्या आहे असं वाटतंच नाही ना. तो प्रॉब्लेम आहे.” अरमानची आई म्हणाली. 

“हो ना. कचरा काय तिकडे कचरा डेपोत जातो. दृष्टीआड सृष्टी!! शंतनुची आई म्हणाली. सगळे विचारात पडले. 

“कचरा आपल्या दारात पडला ना तर लोकांना कळेल ही समस्या किती गंभीर झाली आहे ते.” चारूची आई म्हणाली. 

“एक कल्पना सुचली मला.” सिद्धांत म्हणाला. 

 

————-

दुसऱ्या दिवशी संजू नेहमीप्रमाणे सकाळी पेपर टाकायला आला. सोसायटीच्या मधल्या भागात क्लब हाऊस होते. त्याच्या आजूबाजूने इमारती आणि बंगले होते. क्लब हाऊसच्या भोवती छान झाडे लावून बाग केली होती. सोसायटीतल्या सगळ्यांची ती आवडती जागा होती. 

 

संजूसुद्धा फाटकातून आत आला की त्या बागेकडे, त्यातल्या फुलांकडे, झाडावरच्या पक्ष्यांकडे बघत यायचा. आज मात्र काहीतरी वेगळे दृश्य तिथे होते. संजू तेथे बघत बघत आता आला तो दुधाच्या पिशव्या देऊन परत जाणाऱ्या काकांवर धडकलाच असता. 

 

“अरे, हळू हळू. झोप उतरली नाही का अजून?” काका त्यांची बाईक थांबवत म्हणाले. 

“सॉरी हं काका.” असे म्हणत संजूने परत मान तिकडे वळवली. 

हा बघतोय काय नक्की म्हणून काकांनी तिकडे पहिले. 

“हा, हे काय आहे? मगाशी इथूनच गेलो मी. तेव्हा लक्ष नाही गेलं माझं.” काका म्हणाले, ”अरे, दादा, हे काय रे?” म्हणून त्यांनी फाटकातल्या सुरक्षा रक्षकाला हाक मारली. 

 

“ते काल रात्री ठेवलंय.” तो म्हणाला. 

“पण आहे काय हे?” 

“ते नाही माहित. पुढचे दोन दिवस असंच ठेवायचं असं सांगितलंय.” खांदे उडवत तो म्हणाला. 

क्लब  हाऊससमोर आदल्या दिवशी वापरलेल्या कागदी ताटल्या, वाट्या, कप आणि प्लॅस्टिकच्या चमच्यांचा ढीग पडलेला होता. खाली पाटी होती, ‘कालच्या आपल्या जेवणाची उरलेली बाकी’. 

 

शेजारी स्टीलच्या ताटल्या-वाट्या-भांडी आणि चमचे होते. ‘दहाव्या दिवशी हे वापरू आणि बाकी शून्य करू’ असे लिहिले होते. 

 

सोसायटी जागी होत गेली तशी त्यावर चर्चा सुरू झाली. येणारा-जाणारा तिथे थांबून बघत होता. सोसायटीच्या व्हॉटस्ॅप ग्रुपवर फोटो यायला सुरुवात झाली. काही वेळाने सेक्रेटरींकडून हयाबद्दल विस्तृत पोस्ट आली. आपण सगळ्यांनी मिळून कचरा कमी करूया असे आवाहन केले होते. 

————-

बाप्पाचे विसर्जन झाले. सगळ्यांचे एकत्र जेवण सुरू होते. आता हे संपले की दहा दिवसांची लगबग, गडबड संपणार होती, चुकल्या चुकल्यासारखे वाटणार होते. 

 

“क्लब हाऊससमोर जो कचऱ्याचा ढीग ठेवला होता ना. फार वाईट वाटलं ते बघून. आपल्या एका जेवणामुळे एवढा कचरा निर्माण होतो हा विचारच केला नव्हता तोपर्यंत.” जोशी काका म्हणाले. 

 

“हो ना. माझ्या डोळ्यासामोरून तर हालत नव्हता तो ढीग.” 

 

“ह्या मुलांनी डोळे उघडले आमचे.” 

 

चारू आणि मीनल सुक्या कचऱ्याचा टब घेऊन आल्या. गणपतीच्या पहिल्या दिवशीच्या जेवणानंतर कचऱ्याने भरून वाहणारा टब आज रिकामा होता. मिरच्यांचे तुकडे, कढीलिंबाची पाने असा ओला कचरा काय तो होता. तो काय सोसायटीच्या खत प्रकल्पात जाणार होता. सगळ्यांनी टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला. 

 

“तुम्ही सगळ्यांनी ह्याला मान्यता दिली म्हणून होऊ शकले.” सेक्रेटरी म्हणाले, “सगळ्यात महत्वाचे म्हणजे ह्या मुलांचे आभार ज्यांनी ही कल्पना मांडली आणि अमलात आणली. परत एकदा टाळ्यांचा कडकडाट झाला. 

 

“सोसायटीच्या कमिटीने स्टीलच्या दोनशे ताटल्या, वाट्या आणि भांडी घ्यायचे ठरवले आहे. आपल्या क्लब हाऊस मध्ये ते असेल. सोसायटीच्या कार्यक्रमाला आता तेच वापरायचं.” सेक्रेटरी म्हणाले. 

 

“शिवाय सोसायटीत कोणाकडे काही कार्यक्रम असेल तेव्हा क्लब हाऊसमधून ते घेऊन जायचं, वापरायचं आणि धुवून परत आणून द्यायचं.”  चारूचे बाबा म्हणाले. 

 

“माझ्याकडे आणखी एक कल्पना आहे. गणपती-दिवाळी सोडली तर संपूर्ण सेट काही आपल्याला सोसायटीत लागणार नाही. आपल्या ह्या गल्लीत आपल्यासारखीच सोसायटी आहे, शेजारी बऱ्याच इमारती आहेत. त्यातल्या लोकांनाही सांगू तुमच्याकडच्या कार्यक्रमाला लागतील तशा वापरायला घेऊन जा.” अरमानची आई म्हणाली. 

 

“अरे वा. ही फारच छान कल्पना आहे. स्टील असल्यामुळे तुटण्याची, फुटण्याची काही भीती नाही.” 

 

“एक प्लेट शेअरिंग ग्रुप करू व्हॉटस् ॅप वर. इथल्या आसपासच्या लोकांना सामील होता येईल.”  

 

“नीट धुवून परत द्या एवढं मात्र बजावायचं हा.”

 

“ग्रुपवर स्पष्ट नियमच लिहू.” 

 

“एकत्र येऊ, आनंद वाटून घेऊ पण कार्यक्रमाच्या शेवटी ‘बाकी शून्य’ राहिल हे बघू.” जोशी काका म्हणाले. 

 

सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवून दाद दिली. 

 

———–समाप्त ———–



ह्या गोष्टीतली पात्रे जरी काल्पनिक असली तरी त्यांचा खऱ्या आयुष्यातल्या व्यक्तींशी संबंध आहे. 

———

ही गोष्ट शैलेश आणि पल्लवी ह्या दोघांनी सुरू केलेल्या ‘प्लेट शेअरिंग’ ग्रुपची आहे. 

हा ग्रुप पुण्यात सुरू आहे. आत्तापर्यन्त खूप कचरा ह्या उपक्रमामुळे कमी झाला आहे. 

‘बाकी शून्य’ ही गोष्ट 

शैलेश, पल्लवी, श्रीहरी आणि प्लेट शेअरिंग ग्रुपच्या सर्व सदस्यांना समर्पित आहे 

प्लेट शेअरिंग ग्रुपबद्दल इथे वाचा. त्यातून प्रेरणा घेऊन आपल्या शहरातही असा ग्रुप सुरू करा.  

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *