Sherlock Holmes, Faster Fene and the Leaf Thief

शेरलॉक होम्स, फाफे आणि पानचोर

“चारू चारू…. “अगं ते पोतं.. .”

“काय झालं, एवढा दम का लागलाय तुला? कुठून पळत आलीस?” चारूने धापा टाकणाऱ्या मीनलकडे बघून विचारले.

“ते.. पोतं.. “

“पोत्याचं काय?”

“ते गायब झालंय!!”

“काय!!! पोतं पळवलं कोणी तरी?”

चारू मीनलबरोबर निघाली. तिने आदल्या दिवशी जिथे पोते ठेवले होते तिथे घाईघाईने दोघी पोहोचल्या. खरेच, मीनल म्हणत होती तसेच झाले होते. पोते गायब!!

“कमाल आहे, लोक आता हेही चोरायला लागले?” चारू आणि मीनल विचार करत होत्या.

rough tree trunk

चारूच्या इमारतीच्या आवारात एक मोठे झाड आहे, वावळाचे. तीस वर्षांपूर्वी तिची इमारत बांधली तेव्हाही ते झाड होते. तिची आजी म्हणते ते झाड साठ वर्षांचे तरी नक्की असेल.

त्याचे खोड एवढे मोठे आहे की दोन्ही हात बाजूला पसरून खोडाला मिठी मारली तर चार मुले लागतील!!! एवढा घेर आहे खोडाचा.

रोज भरपूर पक्षी येतात त्यावर. घार, कावळा, कोकिळा, साळुंकी, नाचण, राखी वटवट्या, शिंपी, लालबुड्या बुलबुल, शिपाई बुलबुल, टिकेल्स ब्लू फ्लायकॅचर.   

झाडाला जानेवारी महिन्यात फळे येतात. फळ पापडीसारखे असते आणि मधोमध बी असते.

a seed

त्या बिया धनेश आणि पोपटांना फारच आवडतात. सकाळी धनेशची जोडी तर संध्याकाळी पोपटांचा मोठा थवा ठाण मांडूनच बसलेला असतो. प्रचंड कलकलाट चालू असतो त्यांचा.

A Gray Horn bill on a tree branch

धनेश आणि पोपटांपासून प्रेरणा घेऊन एकदा चारूने एक पापडी घेतली. ती सोलून, बी तळहातावर ठेवून कितीतरी वेळ चारू निरखत होती.कशी लागते ग? कडू तर नसेल ना?चारूने विचारले.

“अगं एवढी घाबरतेस काय. आम्ही लहानपणी भरपूर खायचो ह्या बिया,” आई म्हणाली, “तुम्हाला ना सवयच नाही. कुठेही गेलं की आपले डबे घेऊन जाता किंवा मग ते पाकीटातले चिप्स. आम्ही हा असा रानमेवाच खायचो.” आई म्हणाली. 

धाडस करून चारूने बी तोंडात टाकली. आपण श्रीखंडात चारोळी घालतो ना, त्या चारोळीसारखी वावळाची बी दिसत होती आणि चवही साधारण तशीच होती.

bunch of tree seeds

लांबपर्यन्त बी पोहोचावी आणि नवीन वावळाची झाडे यावीत म्हणून झाडाने ही युक्ति केली आहे. बी पापडीमध्ये सुरक्षित असते. ही पापडी हलकी असल्याने वाऱ्याबरोबर उडत लांब लांब जाते. कुठेतरी मातीवर पडते, वरचे आवरण म्हणजे पापडी कुजून गेली की बी रुजते आणि वावळाचं नवीन झाड येते. वाऱ्याच्या मदतीने झाड हे साध्य करते. 

एरवी वावळाचे हे झाड आजूबाजूच्या लोकांचे खूप लाडके होते. पण हिवाळा सुरू झाला की गडबड व्हायची.

झाली का कटकट सुरू!! इमारतीचे आवार झाडणाऱ्या मावशी खराटा घेऊन, कमरेवर हात ठेवून वावळाकडे बघत उभ्या होत्या. ऑक्टोबर सुरू झाला की वावळाची पाने गळायला सुरुवात होते. एप्रिलपर्यंत असे चालूच राहते. दर आठवड्याला मोठ्ठा ढीग तयार होतो. 

leaf

“पानं कमी होती म्हणून की काय ह्या पापड्या. त्याचाही कचरा.” मावशींची चिडचिड व्हायची. पाने गोळा करून त्यांनी आधीच जमलेल्या ढीगात टाकली आणि त्याला काडी लावली.

वाळलेलीच पाने ती.. भुरुभुरु जळायला लागली. चारू बाल्कनीतून ती जळणारी पाने बघत होती.

मागच्या आठवड्यातला प्रसंग तिला आठवला. एक काका गल्लीतून चालले होते. जळणारी पाने बघून ते आत आले. चारू आणि बाबा त्यांची कार पुसत होते. बाबाशी ते बराच वेळ बोलले, ‘पाने जाळणे चुकीचे आहे, प्रदूषण होते, जागतिक तापमान वाढ होते वगैरे बरेच काही.’

“चारू, अगं आत ये, बाल्कनीचं दार लाव, धूर आत येतोय.” खोकत खोकत आजी म्हणाली.

चारू आत आली खरी पण पानांचा विचार आणि त्या काकांचे बोलणे काही तिच्या डोक्यातून जाईना. “आजी, मी मीनलकडे जाते.” म्हणून थोड्या वेळाने ती निघाली.

पानं काय कुजून जातील ना. जाळायची कशाला? ते काका म्हणत होते ते बरोबर आहे.” मीनलच्या घरी दोघींची चर्चा चांगलीच रंगली.

“मी आई-बाबांना तसं म्हणलं तर ‘एवढ्या पानांचं करणार काय ते सांग. जागा कुठे आहे आपल्याकडे. दर आठवड्याला केवढा ढीग जमतो. करणार काय त्याचं?’ असा उलटा प्रश्न दोघांनी केला.”

 

“त्यांचंही बरोबर आहे ना. पानं जाळली नाहीत तर दर आठवड्याला एक ढीग असे किती ढीग जमा होतील?” मीनल  विचार करत म्हणाली.

“हू, मी शेजारी जोशी काका-काकूंशीही बोलले. ‘बरोबर आहे ग तुझं. पण ज्यांच्याकडे भरपूर जागा आहे त्यांचं ठीक आहे. आपण काय करणार’ असं म्हणाले ते.”

पृथ्वीवरची जीवसृष्टी ही कार्बनपासून बनलेली आहे. त्यामुळे कुठलीही जैविक गोष्ट जाळली की त्यातला  कार्बन आणि हवेतला ऑक्सीजन ह्यामुळे कार्बन डायऑक्साईड वायू तयार होतो. कधी कधी ढीग धुमसत राहतो. पुरेसा ऑक्सीजन मिळाला नाही तर कार्बन मोनॉक्साइड तयार होतो.

कार्बन मोनॉक्साइड हा आपल्या आरोग्याच्या दृष्टीनेही अत्यंत घातक वायू आहे. रक्तातल्या लाल पेशींची ऑक्सीजन वहन क्षमता हळूहळू तो कमी करतो. त्याला तर विषारी वायू म्हणतात.

कार्बन डायऑक्साईड आणि कार्बन मोनॉक्साइड दोन्ही ग्रीन हाऊस गॅसेस म्हणजे हरितगृह वायू आहेत. पृथ्वीवर जो सूर्यप्रकाश पडतो त्यातला बराचसा परावर्तित होतो म्हणजे परत पाठवला जातो. हरितगृह वायू म्हणजे कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, मिथेन हे ती उष्णता धरून ठेवतात. ह्या वायूंचे हवेतले प्रमाण जेव्हा खूप कमी झाले तेव्हा बरीचशी उष्णता परत पाठवली गेली आणि पृथ्वीवर हिमयुग आले.

ह्या वायूंचे हवेतले प्रमाण वाढले तर सूर्याची जास्ती उष्णता हे वायू वातावरणात धरून ठेवतात आणि त्यामुळे पृथ्वीचे तापमान वाढते. जे सध्या होत आहे.

इंधन म्हणून आपण पेट्रोल किंवा डिझेल वापरतो त्यातून, वीज तयार करायला, कारखान्यात यंत्रे चालवायला  कोळसा जाळला जातो ह्या सगळ्यामुळे हवेतले हरितगृह वायूंचे प्रमाण वाढत आहे.

त्या काकांच्या बोलण्याने चारूच्या मनात कुतूहल जागे झाले होते. हरितगृह वायू, जागतिक तापमान वाढ हयाबद्दल तिने बरेच वाचले.

त्यांच्याच नाही, गल्लीतल्या इतर इमारतीतही पाने जाळली जायची. अगदी जागतिक तपमान वाढ, प्रदूषण ह्या कारणामुळे नाही तरी धूरामुळे डोळे चुरचुरणं, घसा बसणं असा त्रास तर सगळ्यांनाच होतो. पण दुसरा काही पर्याय नाही ह्यावर सगळे ठाम होते. ‘केवढा तो ढीग आहे, जळणार नाही तर करणार काय दुसरं’ हे वाक्य सतत त्यांच्या बोलण्यात येत होते. 

‘करणार काय’ हे तर चारूलाही माहित नव्हते. पण ती जळणारी पाने काही तिला बघवत नव्हती.

विचार करता करता तिला एक कल्पना सुचली. घाईघाईने तिने बाल्कनीतले स्टूल आणले. स्वयंपाकघरातल्या माळ्यावर पोती होती. अर्थात स्टूलावर चढूनसुद्धा तिचा हात माळ्यावरच्या पोत्यांपर्यंत नीट पोहचत नव्हता. टाचा उंच करून, परत परत प्रयत्न केल्यावर पोती एकदाची हातात आली.

एक पोते घेऊन ती अंगणात गेली. परवा मोठ्ठा ढीग जाळला होता. काल आणि आज गळलेली पाने होती. दातेरी फावड्याने पाने एके ठिकाणी तिने गोळा केली. मावशींचे काम किती कष्टाचे आहे हे तिला जाणवले.

ती पाने तिने पोत्यात भरली. गल्लीत रस्त्याच्या कडेला रिकामी जागा होती. गवत आणि झुडपे तिथे वाढलेली असायची. त्या जागेत तिने भरलेले पोते ठेवले. पाने आहेत म्हणल्यावर कोणी फारसा इंटरेस्ट दाखवणार नाही.

a gunny bag filled with leaves

आता आई-बाबा, काका-काकू जाळतील कशी पाने? त्यांच्यापासून लपवूनच ठेवली होती ना तिने. एक खोडकर हसू चारूच्या चेहऱ्यावर आले. चला, निदान ही पाने तिने वाचवली. खूश होऊन ती घरी आली.

तिच्या मैत्रिणीला मीनलला तिने हे संगितले. “चल, बघून येऊ पोतं आहे का,” मीनलने सुचवले.

“अगं, पोतं असणारच. पानं कोण पळवणार आहे” असं चारू म्हणाली खरी पण तिलाही उत्सुकता होतीच. दोघी त्या जागी पोहोचल्या आणि खरेच चारूला वाटले तसे पोते जसेच्या तसे तिथे होते.

दुसऱ्या दिवशी मात्र मीनल धापा टाकतच चारूकडे आली. “चारू, चारू, पोतं गायब झालंय”.

“काय” म्हणत चारू बाहेर आली आणि दोघी त्या जागेजडे पळाल्या. खरेच, आज तिथे पोते नव्हते. “आता वाळलेली पानंही लोक चोरायला लागले”, चारू म्हणाली.

पानांचे नक्की काय झाला कळले नाही तरी पाने कोणी जाळली नव्हती ही निश्चित कारण जवळपास कुठे धूर दिसत नव्हता, राख पडली नव्हती. खरोखरंच पाने चोरीला गेली की काय. हरकत नाही, चोर पाने जाळत नाहीये, मग ठीक आहे.   

आता पुढचे पोते भरून ह्या दोन दिवसांत पडलेली पाने सुरक्षित न्यायची होती. ह्यावेळी मीनलही मदतीला होती. त्यामुळे काम भराभर झाले. हे दुसरे पोतेही त्या जागी ठेवून दोघी परत आल्या.   

पहिले पोते गायब झाल्याने आता काय होतंय ही उत्सुकता दोघींना होती.

मीनलच्या घराच्या बाल्कनीतून ती जागा दिसायची. बाल्कनीत चक्कर टाकून पोते आहे ना हे मीनल  दिवसभर बघत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी बघते तर काय पोते गायब.

दोघी तिथे गेल्या. ह्या वेळी दुसरे पोते नुसते गायब नव्हते तर त्या जागी पहिले रिकामे झालेले पोते ठेवले होते, तेही व्यवस्थित घडी करून.

हे काय? दोघी बघतच राहिल्या. ‘पानचोर भलताच किंवा भलतीच प्रामाणिक आहे. रिकामे पोते परत केले आणि तेसुद्धा नीट घडी करून.’

अर्थात विचार करत बसायला दोघींना वेळ नव्हता. पुढचे पोते भरायचे काम होते. अशीच चार पोती ठेवली आणि चारही गायब झाली. पाने गायब झाली, रिकामी पोती परत आली.

सस्पेन्स वाढतच होता. आता छडा लावायचाच असे दोघींनी ठरवले.

पोते ठेवून चारू मीनलच्या घरी गेली. दोघी बाल्कनीत जाऊन बसल्या. ह्यावेळी दोघींनी जय्यत तयारी केली होती. पानचोराला नीट बघता यावे म्हणून दुर्बिण घेतली.

किती वेळ बसावे लागेल माहिती नव्हते. पाण्याची बाटली, भूक लागली तर खायला लाडू, चकली आणि कंटाळा येईल म्हणून वाचायला पुस्तके अशी तयार ठेवली होती. चारू शेरलॉक होम्स वाचत होती तर मीनल फास्टर फेणे.

पंधरा मिनिटे दोघी अगदी डोळ्यात तेल घालून बघत होत्या. “पाळत ठेवणं फारच कंटाळवाणं काम आहे.” मीनल लाडवाचा तुकडा तोंडात टाकत म्हणाली. “हो ना, आणि किती वेळ पाळत ठेवून बसावं लागेल माहित नाही, पानचोर कधीही येऊ शकतो.” चकली खात चारूने दुजोरा दिला.

सोळाव्या मिनिटाला दोघींनी आपापली पुस्तकेkउघडली. पुस्तक वाचत, अधून मधून त्या पोत्यांकडे नजर टाकत होत्या.

शेरलोक होम्स ‘मसग्रेव्ह रिच्युअलचा’ अर्थ लावत होता. गणित वापरून त्याने कोडे जवळजवळ सोडवलेच होते. गोष्ट फारच रंगत चालली होती. तर इकडे फास्टर फेणे प्रतापगडावर काय करतोय हे वाचण्यात मीनल गर्क झाली होती.

दोघी पुस्तकात गढून गेल्या. दारावरची बेल वाजली तेव्हा कुठे त्या भानावर आल्या. किती वेळ गेला होता कोण जाणे. दोघींनी एकदम पोत्याकडे नजर टाकली आणि काय पोते गायब! अरे यार, तेवढ्यात पोते नेले.

दोघी पळत तिकडे गेल्या. परत तेच. पानांनी भरलेलं पोते नेले होते आणि आधीचे रिकामे पोते व्यवस्थित घडी करून ठेवलेलं होते.

तीन दिवसांनी पोते भरून दोघींनी परत तिथे ठेवले. पण आज त्या पाळत ठेवणार नव्हत्या. खूप विचार केल्यावर त्यांना एक कल्पना सुचली होती. पाळत ठेवण्याच्या बोअर कामापेक्षा ही कल्पना फारच इंट्रेस्टिंग होती.

आता काय होतंय अशी उत्सुकता मनात ठेवून देऊन दोघी घरी गेल्या. सारखी चक्कर मारून पोते आहे की नाही बघण्याची आता गरज नव्हती. त्यांचा प्लॅनच असा भारी होता.

दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे पोते गायब होते. पण त्यांचा प्लॅन यशस्वी झाला होता.

दोघींनी हाय-फाय केले आणि पानांचा माग काढायला सुरुवात केली. पाळत ठेवण्याचा प्लॅन फसल्यावर दोघींनी खूप विचार केला. एवढी गुप्तहेरांची पुस्तके वाचली होती की कल्पना भरपूरच होत्या. चारूने कात्रीने पोत्याचा खाली थोडा भाग कापला. अगदी थोडा, साधारण एका पानाच्या आकाराचा.

पाने पोत्यात भरल्यावर चारूने पोते उचलले, मीनलने पोत्याच्या खाली भोकावर हात धरला. अशी ही मजेशीर जोडगळी त्यांच्या नेहमीच्या जागेवर पोहोचली. पोते जमिनीवर ठेवल्यावर पाने पडण्याचा काही प्रश्न नव्हता. पण ‘पानचोर’ पोते उचलून चालायला लागला की मात्र त्या भोकातून थोडी पाने पडत जाणार होती. आणि तसे झालेही. त्यांनी पोते ठेवले होते त्या जागेपासून थोड्या थोड्या अंतरावर पाने पडली होती.  

पानांचा माग काढत दोघी निघाल्या. पानांची रांग रस्ता सोडून एका इमारतीत शिरली. माग घेत दोघी रस्त्यावरून वळून त्या इमारतीच्या आवारात शिरल्या.

“ही अरमानच्या आजीची सोसायटी.” चारू म्हणाली.  

“म्हणजे वीणा मावशीची आई राहते ना इथे?”

“हो!”  

इमारतीच्या आवारातून दोघी जिन्याकडे वळल्या. पायरीवर काही पाने पडलेली होती. त्या जिना चढायला निघाल्या. पहिला मजला गेला. पानांचा माग अजून संपला नव्हता. दुसरा, तिसरा आणि चौथा मजला गेला. शेवटी पाचवा मजला आला. हा मात्र शेवटचा मजला होता. त्यावर गच्ची होती. पाचवा मजला खाली टाकून दोघींनी गच्चीकडे जाणारा जिना चढायला सुरुवात केली.

पानांचा माग गच्चीतच गेला होता. गच्चीचे दार उघडे होते. जावे की नाही असा विचार करत शेवटी दोघी त्या दारातून आत गेल्या.

आणि बघतच राहिल्या.

गच्ची कसली ते शेत होते. इकडे टोमॅटोची रोपे तर तिकडे दोडक्याचा वेल, पलीकडे मेथीचा वाफा तर कोपऱ्यात शेवग्याचे झाड. संपूर्ण गच्ची पालेभाज्या, फळभाज्याच्या वाफ्यांनी भरून गेली होती. अंजीर, स्ट्रॉबेरीसुद्धा होती. भिंतीला लागून एक शेल्फ ठेवलं होते. घमेले, खुरपे आणि इतर बागकामाचे सामान त्यात होते.

आणि

आणि

त्यांचे रिकामे पोते तिथे नीट घडी करून ठेवलेले होते. दोघी बघतच राहिल्या.

“चारू!!!” एका वेलीच्या मांडवामागून वीणा मावशी बाहेर आली, “इकडे कशी काय?” 

“मावशी, ही तुझी बाग आहे?” चारूने विचारले.

“हो”

“हे पोतं इथे कोणी आणलं?” मीनलने पोत्याच्या घडीकडे बोट दाखवत विचारले.

“ते पोतं..” बोलता बोलता वीणा मावशी थांबली, “अच्छा, तर तुम्ही दोघी आहात माझ्या ‘मिस्टरी लिफ डोनर’. मी विचारच करत होते ह्या मिस्टरी डोनरपर्यंत पोहोचयचं कसं”

चारू आणि मीनल मिस्किल हसल्या.

“थॅंक यू!!”.

“थॅंक यू कशासाठी मावशी?”

“ह्यासाठी. वाफ्यांकडे बघत मावशी म्हणाली. मीनल आणि चारूने बघितले. वाफ्यात माती दिसतच नव्हती. सगळ्या वाफ्यात पानांचा थर पसरलेला होता.

cabbage and dry leaves

दोघी गोंधळल्या. “त्याचा काय उपयोग?” मीनलने विचारले.  

“पानं मातीवर पसरल्यामुळे जमिनीत ओलावा जास्ती वेळ टिकून राहतो. मुळांची वाढ चांगली होते. पाणी कमी द्यावं लागतं त्यामुळे पाण्याचीही बचत होते. पानं कुजली की त्यातली पोषणद्रव्यं आपोआप मातीला मिळतात.

“पानांचा हा थर कुजला की परत पानं घालायची?” चारूने विचारलं.

“हो” वीणा मावशी म्हणाली.

“म्हणजे तुला पानं सारखीच लागत असतील.”

“नेहमीच. माझ्या घरच्या बागेत आणि इथे आईच्या गच्चीवरच्या बागेत, दोन्हीसतही मला पानं हवी असतात. पानांचे आणि स्वयंपाकघरातल्या कचऱ्याचे खत सगळ्या वाफ्यांमध्ये भरले आहे. माती अगदीच कमी आहे. ही सगळी बाग पानांच्या खतावर आणि स्वयंपाकघरातल्या कचऱ्यावरच फुलली आहे.”

“साधारण किती पानं लागतात तुला?” चारूच्या डोक्यात चक्र सुरू झाले.

“आठवड्याला सात ते आठ पोती.”

“आमच्या आवारात आठवड्याला तीन-चार पोती निघतात.“ चारू म्हणाली.

“आमच्या शेजारच्या सोसायटीत पानं खूप असतात. तेही जाळून टाकतात. त्यांना पोती देऊन त्यात पानं भरायला सांगितली तर.” मीनल म्हणाली.

“छानच होईल.” वीणा मावशी म्हणाली.

“मावशी, तू काळजी करू नकोस. माझ्या आवारातून आणि मीनलच्या शेजारच्या इमारतीतून आम्ही तुला पोती आणून देत जाऊ”.

“खूप मदत होईल. पानं कोठून आणायची हा प्रश्नच असतो”.

“पण पानं तर भरपूर असतात की मावशी, सध्या जिथे बघू तिथे पानं आहेत, रस्ता, फूटपाथ सगळीकडे” चारूने विचारलं.

“पानं खूप आहेत ग. पण आपल्याकडे पानं कचरा समजली जातात ना, त्यामुळे पानं पडलेली दिसली की लोक त्यात कचरा टाकतात. तुमची पानं मिळाल्याने किती मदत झाली मला. नाहीतर मी रस्त्याच्या कडेची पानं आणायचे. कचरा वेगळा करण्यात वेळ जातोच आणि किळसही वाटते. वाट्टेल तो कचरा असतो त्यात,  अगदी डायपरसुद्धा!!

“ई!!!!”

“लोक थुंकतात सुद्धा त्यात, मी बघितलं आहे.”

“हो ना. रबरी हातमोजे घालूनच करावं लागतं हे काम. तुझी आवारातली पानं होती त्यामुळे त्यात अजिबात कचरा नव्हता. खूप पटापट काम झालं आणि छानही वाटलं.” 

“अशी कचरा-विरहित पानं तुला कायम मिळाली तर?“

“खूपच मदत होईल. मीच नाही, आपल्याच गल्लीत एकूण चार गच्चीवरच्या बागा आहेत. आमचा गट आहे, आम्ही रोपांची, बियांची देवाणघेवाण करतो. शेजारच्या गल्लीतले लोकही आहेत त्या गटात. आम्हा सगळ्यांनाच मदत होईल.”   

“हे भारी आहे. म्हणजे ‘पानं असणारे’ आणि ‘पानं हवी असणारे’ दोन्ही लोक आपल्या आणि शेजारच्या गल्लीत आहोत. त्यांनी एकमेकांत पानांची देवाण-घेवाण केली तर आपल्या ह्या दोन गल्लीतली पानं जाळणं बंद होईल आणि अशा सुंदर बागा होतील.” चारू म्हणाली.  

“खरंच, फारच सुंदर आहे तुझी बाग मावशी.” मीनल म्हणाली.

दोघी घाईघाईने निघाल्या. “कुठे चाललात?”

“फार काम करायचं आहे मावशी. गल्लीतल्या सगळ्या सोसायटयांमध्ये जाऊन लोकांशी बोलणं सुरू करतो.”

“हो हो, हे तर घेऊन जा”. मावशी म्हणाली.

”आज रिकाम्या पोत्याबरोबर हे मी ठेवणार होते, मिस्टरी डोनरसाठी ‘थॅंक यू’.”

“थॅंक यू!” चारूच्या हातात ताज्या भाज्यांनी भरलेली टोपली देऊन, दोघींच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवत वीणा मावशी म्हणाली.

———–समाप्त ———–

ह्या गोष्टीतली पात्रे जरी काल्पनिक असली तरी त्यांचा खऱ्या आयुष्यातल्या व्यक्तींशी संबंध आहे.

———

ही गोष्ट अदिती देवधरने सुरू केलेल्या ब्राऊन लिफ  ग्रुपची आहे. 

हा ग्रुप पुण्यात सुरू आहे. ह्या उपक्रमामुळे काही लाख पोती पाने जाळली न जाता खत म्हणून परत मातीत गेली आहेत. अर्थात, एकूण पानगळीचे प्रमाण बघता, पानांच्या समस्येचा काही भाग सोडवण्यात ह्या उपक्रमामुळे यश आले आहे. अजून मोठा टप्पा गाठायचा आहे. पण वैयक्तिक आणि सामाजिक पातळीवर हा उपक्रम करणे शक्य आहे. 

 ही गोष्ट ब्राऊन लिफ ग्रुपच्या सर्व सदस्यांना समर्पित आहे 

ब्राऊन लिफबद्दल इथे वाचा. त्यातून प्रेरणा घेऊन आपल्या शहरातही असा ग्रुप सुरू करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *