Story of Orpahn Taps

अनाथ नळांची गोष्ट

२० एप्रिल २०१६. मिरजेहून निघालेली रेल्वे लातूरला पोहोचली. ही रेल्वे प्रवाशांची वाहतूक करत नव्हती. ही रेल्वे सामानाचीही वाहतूक करत नव्हती. तिचे नाव होते ‘जलदूत’. ती पाण्याची वाहतूक करत होती. पन्नास डब्यांची ही रेल्वे पंचवीस लाख लीटर पाणी घेऊन लातूरमध्ये दाखल झाली.

२०१५ सालचा पावसाळा महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक, उत्तर प्रदेश, पंजाब ह्या राज्यांसाठी फारसा चांगला नव्हता. नेहमीपेक्षा कमी पाऊस पडला.. २०१६ साल उगवले तेच भले मोठे प्रश्नचिन्ह घेऊन.

लातूरइतकी बिकट नसली तरी सगळ्यांची परिस्थिती अवघड होती. पुणे शहराला पाणी पुरवठा करणारी चार धरणे, पण एकही २०१५च्या पावसाळ्यात संपूर्ण भरले नाही. २०१६च्या एप्रिलपर्यन्त धरणातील पाण्याची पातळी झपाट्याने खाली गेली होती. 

सगळे जण उद्या नळाला पाणी येईल का ह्या चिंतेत होते तेव्हा एक व्यक्ती महाराष्ट्रातून कार्यक्रमाच्या निमित्ताने फिरत होती. अनेक गावांत सरकारने जनावरांसाठी चारा छावण्या सुरू केल्या होत्या. दुष्काळी प्रदेशातले लोक आपल्या गाई-गुरांना घेऊन ह्या चारा-छावण्यात रहात होते कारण गावी गुरांना चार-पाणी कोठून द्यायचे हा प्रश्न होता. धरणांच्या एरवी विस्तृत जलाशयांना डबक्याचे स्वरूप आले होते. 

हे सगळे बघत एका सरकारी ऑफिसमध्ये कामानिमित्त ते पोहोचले. आतून कोठून तरी धो-धो पाणी वहात असल्याचा आवाज येत होता. तासाभराने काम संपवून ते निघाले तरी तोच आवाज. आख्खा महाराष्ट्र इथे पाणी टंचाईचा सामना करत असताना नळातून तासभर पाणी वहात आहे? 

त्यांना राहवले नाही. नळ बंद का करत नाही म्हणून चौकशी करता नळाची तोटी चोरीला गेली आहे असे उत्तर मिळाले. मग नवीन लावत का नाही? ह्यावर नवीन नळासाठी अर्ज केला आहे हे उत्तर मिळताच  ‘मग मी नवीन नळ आणून देतो’ असे ह्या व्यक्तीने सांगितले. 

‘ते चालत नाही’ असे ‘आम्हाला आमच्या लायनीपरमाणे जाऊ द्या’ अशा थाटाचे सरकारी उत्तर आले. सरकारी ऑफिसमधून मी नळ चोरला तर चालणार नाही, नवीन नळ आणून देत असेन तर काय प्रॉब्लेम आहे? ह्या प्रश्नावर सगळे निरुत्तर कारण हे कसे कधी पूर्वी घडलेच नव्हते. हे चालते की नाही कसे सांगणार? मग वरिष्ठ साहेबांना बोलावण्यात आले. त्यांच्याशी चर्चा झाली. स्टोअररूममध्ये नळ होते. ते तेथून घेऊन केवळ बसवायचे एवढेच काम होते पण त्यासाठी संपूर्ण आठवडा पाणी वाया घालवले. 

साहेबांच्या आज्ञेने ताबडतोब नवीन नळ बसला, पाणी वहायचे थांबले. ती व्यक्ती तेथून बाहेर पडली, समाधानाने? नाही! आणखी अस्वस्थ होऊन. राज्यभरात असे किती नळ गळत असतात. किती पाणी आपण रोज वाया घालवतो? 

‘आपण हे थांबवायचे. पाणी वाचवायचे. त्या गळक्या अनाथ नळांचे वाली व्हायचे!!’ हा निर्धार त्यादिवशी झाला.

अनाथ नळांची गोष्ट 

“काय खुडबुड चालली आहे शंतनु?” ओट्याखालच्या कपाटात शिरलेल्या शंतनुला आईने विचारले. 

“बाटली शोधतोय.” शंतनुचे आतून उत्तर आले. 

“कसली बाटली?” 

“पाण्याची!”

“कशासाठी?” 

“माहित नाही.” 

“काय?? तू आधी बाहेर ये बघू.”  शंतनुने कपाटातून बाहेर काढलेली पातेली आणि इतर सामान बघत आई म्हणाली. 

घामाघूम शंतनु रांगत कपाटातून बाहेर आला. “मिळाली!!” विजयीमुद्रेने बाटली समोर धरत, दुसऱ्या हाताने केसांतील  जाळी जळमटे झटकत म्हणाला. 

“ही बाटली कधीपासून त्या कपाटात आहे? हयात पाणी प्यायचं नाही हा..” आईने बजावले. 

“नाही गं. पाणी पिण्यासाठी नकोय. मागच्या वर्षी मामा आला होता तेव्हा त्याने एअरपोर्टवर ही बाटली विकत घेतली होती. रिसायक्लिंगला द्यायची म्हणून मी इथे ठेवली आणि नंतर विसरून गेलो.” शंतनु बाटली पुसत म्हणाला. 

“बाटली कशाला हवी आहे? नीट सांगशील का?” आईने विचारले. 

“आम्हाला शाळेत येताना एक लिटरची रिकामी बाटली घेऊन या असं सांगितलं आहे.” शंतनु बाटली दप्तरात ठेवत म्हणाला. “कशासाठी माहित नाही. ते उद्याच कळेल, बाटली घेऊन या एवढंच सांगितलं आहे.” आईच्या प्रश्नार्थक नजरेकडे बघत शंतनु म्हणाला. 

——–

“मुलांनो, नामजोशी सरांचा आपल्या शाळेतला पहिला दिवस आहे. सगळ्यांनी त्यांचे स्वागत करू या.” मुख्याध्यापिकांनी सांगितले. मुलांनी उत्साहाने टाळ्या वाजवल्या. टाळ्यांचा आवाज ओसरल्यावर नवीन सर बोलायला उभे राहिले. 

“धन्यवाद मॅडम!” हात जोडत ते म्हणाले, “मुलांनो, माझे नाव संजय नामजोशी. तुम्ही मला संजय सर असे म्हणू शकता. माझा विषय भूगोल आहे. तुमच्यापैकी किती जणांना भूगोल विषय आवडतो?” 

शंतनुने उत्साहाने हात वर केला. आजूबाजूला बघितले तर जेमतेम दोन-चार हात वर आले होते. 

“मला कल्पना आहे भूगोल बऱ्याचशा मुलांना आवडत नाही. ह्या वर्षाच्या शेवटी ह्याच प्रश्नावर सगळेच्या सगळे हात वर असतील बघा, मी तुम्हाला खात्री देतो. हा विषय रंजक वाटेल ही जबाबदारी माझी!!” सर म्हणाले. 

सरांनी मग सगळ्या मुलांशी ओळख करून घेतली. पहिला तास त्यातच संपला. तास संपता संपता सरांनी विचारले, “आपल्या शाळेत किती नळ आहेत?” 

‘किती नळ आहेत?’ हा काय प्रश्न आहे. मुलांनी मोजायला सुरुवात केली. “कोण बघून येतंय?” गणती काही जुळत नाहीये म्हणल्यावर सरांनी विचारले. 

‘सर मी, सर मी’ ह्या प्रश्नावर मात्र सगळ्यांचे हात वर गेले. 

तीन मुली आणि तीन मुले अशी टीम सरांनी पाठवली. पाच मिनिटांत त्यांनी येऊन शाळेत एकूण दहा नळ आहेत असा रीपोर्ट दिला. 

‘मी सांगतच होते’, ‘मला माहितच होतं’ वगैरे’ अशी कुजबूज झाली. 

“नळ कसे आहेत?” सरांच्या ह्या प्रश्नावर मुले गोंधळली. 

कसे आहेत म्हणजे? चांगले आहेत. कोणी म्हणले धातूचे आहेत. 

“बागेतला नळ आणि हात धुवायच्या टाकीपैकी एक नळ गळतोय.” आरूष म्हणाला. 

“बरं.” सर म्हणाले, “आपल्याला प्लॅस्टिकच्या दोन रिकाम्या बाटल्या लागतील उद्या, कोण आणेल?” 

परत एकदा, ‘सर मी, सर मी’ झाले. अनन्या आणि शंतनुकडे जबाबदारी आली. 

आणि त्यामुळेच शंतनु आणि आईचा मगाशी झालेला संवाद. 

रात्री शंतनुने किमान दहा वेळा तरी बाटली दप्तरात आहे ना ही खात्री केली होती. शेवटी बाबा म्हणाला, “अरे, ती बाटली काय रांगत रांगत दप्तरातून बाहेर जाणार आहे का?”

बाटली का आणायला सांगितली असेल हा विचार करत करत शंतनु त्यादिवशी झोपला. 

———–

नेहमीसारखी शाळा भरली. प्रार्थना झाली, सगळेजण आपापल्या वर्गात गेले. 

काल सरांनी प्लॅस्टिकची रिकामी बाटली घेऊन या एवढेच सांगितले होते, कशासाठी, का हा अजून सस्पेन्स होता. 

संजय सर आले. “जगात किती भूखंड आहेत?” त्यांनी आत येताच विचारले.

“सात!!” मुलांकडून उत्तर येताच ते म्हणाले, “बरोब्बर!! पण हे कायम असे नव्हते. सुमारे पंचवीस कोटी वर्षांपूर्वी हे सगळे भूखंड एकत्र होते. साधारण इंग्लिश अल्फाबेट Cच्या आकाराचा हा एकसंध भूखंड होता ज्याला आपण नाव दिले आहे  ‘पँजिया’ म्हणजे one earth. पँजिया सर्व बाजूंनी पँथालसा समुद्राने वेढेलेला होता. त्या Cच्या पोटात होता टेथीस समुद्र.

सुमारे २३ कोटी वर्षांपूर्वी पँजियाचे दोन भाग झाले. उत्तरेकडे लॉरेशिया तर दक्षिणेकडे गोंडवनालँड. दक्षिण अमेरिका, आफ्रिका, भारत, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका, सेचेल्स, मादागास्कर हे गोंडवनालँडमध्ये एकत्र होते.बरोब्बरa

सुमारे १८ कोटी वर्षांपूर्वी गोंडवनालँडचेही विघटन होऊ लागले. पंधरा ते सोळा कोटी वर्षांपूर्वी मादागास्कर-सेचेल्स-भारत हे आफ्रिकेपासून वेगळे झाले.

तेरा कोटी वर्षांपूर्वी मादागास्कर-सेचेल्स-भारत हे ऑस्ट्रेलिया-अंटार्क्टिकापासून वेगळे झाले.

आफ्रिकेपासून वेगळे झाले तरी मादागास्कर अजून पुढचे चार कोटी वर्ष भारताला धरून होते जे सुमारे ८.८ कोटी वर्षांपूर्वी सेचेल्स-भारतापासून वेगळे झाले आणि आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्यापासून थोडे दूर जाऊन स्थानापन्न झाले.

भारत म्हणजे भारत, पाकिस्तान, बांग्लादेश, भुतान, नेपाळ, ब्रह्मदेश, श्रीलंका असे सगळे एकत्र असलेलं हा बृहद भारत उत्तरेकडे सरकू लागला. 

अफ्रिकेजवळ रियूनियन बेटांवरून हा भारत सरकत असताना ज्वालामुखीचा मोठा उद्रेक झाला. लँडमाईनवर पाय पडावा आणि मोठा स्फोट व्हावा तसेच काहीसे झाले. ह्या ज्वालामुखीच्या प्रचंड उद्रेकामुळे वरून सरकणाऱ्या भारताच्या जमिनीला काही ठिकाणी छेदून लाव्हा भारतभूमीवर आला आणि पसरला. हे घडले साधारण साडे सहा कोटी वर्षांपूर्वी.

पुढे सुमारे सात लाख वर्षे हे उद्रेक सुरू होते. प्रत्येक उद्रेकातून लाव्हा बाहेर यायचा, काही अंतर वहात जायचा, थंड झाला की त्याचा खडक व्हायचा.

सुमारे सहा कोटी वर्षांपूर्वी ह्या अशा उद्रेकांतून आपले दख्खनचे पठार तयार झाले. ‘कणखर देशा, दगडांच्या देशा’ ही ओळख महाराष्ट्राला देणारे दख्खनचे पठार. आपल्या शहरातल्या टेकड्या, नदीपात्रातले खडक, एवढे जुने आहेत – सहा ते साडे सहा कोटी वर्ष!

हॉटस्पॉटमधून प्रचंड प्रमाणात बाहेर पडणाऱ्या ह्या लाव्हामुळे भारताची पश्चिम बाजू किंचित वर उचलली गेली. त्यामुळे पश्चिमेकडून पूर्वेकडे असा उतार निर्माण झाला. त्यामुळेच आजही पेनिन्सुलामधल्या बहुतेक नद्या या पूर्ववाहिनी आहेत. कृष्णा, भीमा, गोदावरी सारख्या पश्चिम घाटात उगम पावणाऱ्या नद्या ह्या पूर्वेकडे काहीशे अंतर वहात जाऊन बंगालच्या उपसागराला मिळतात. 

६.४ कोटी वर्षांपूर्वी सेचेल्स आणि भारत एकमेकांपासून वेगळे होऊ लागले. सेचेल्स वेगळे झाल्यामुळे दख्खन पठाराचा पश्चिमेकडचा भाग तुटल्यासारखा झाला. काही काळ त्या कड्याची धूप होत राहिली आणि मग आज आपल्याला दिसतो तो सह्याद्री, पश्चिम घाट निर्माण झाला. गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ आणि तमिळनाडू ह्या राज्यांची पश्चिम बाजू व्यापलेला पश्चिम घाट.

पुढे भारत उत्तरेकडे सरकत आशियावर धडकला. पहिली धडक ही आत्ताच्या लडाख आणि तिबेटजवळ झाली. भारत आशियात धडकत राहिला. त्यामुळे तेथीस समुद्रातला गाळ वर उचलला जाऊन टप्प्याटप्प्याने टेथीस समुद्र संपत गेला आणि हिमालयाच्या रांगा वर येत गेल्या.

दोन भूभागांच्या सीमारेषेवर जन्माला आलेला हा जगातला सगळ्यात तरूण पर्वत, अवघे तीन ते चार कोटी वयोमान.“

हिमालयाची आणि तिबेटच्या पठाराची निर्मिती झाली, त्याच्या ऊंच शिखरांनी मान्सूनचे ढग अडवायला सुरुवात केली आणि आपल्याकडे पाऊस पडू लागला. अशाप्रकारे काही कोटी वर्षांपूर्वी सुरू झालेला हा मान्सून बरं का. तेव्हापासून मान्सून आलाच नाही असं कधी झालं नाही. म्हणजे ‘टोटल फेल्युर’ कधी झालं नाही. पण ‘रिजनल फेल्युअर’ मात्र होतं. एखाद्या वर्षी एखाद्या ठिकाणी पाऊस नेहमी इतका पडला नाही असं होतं.” सर सांगत होते. 

सर बाटलीबद्दल काहीच बोलत नाहीत म्हणल्यावर मुलांची चुळबुळ सुरू झाली. दप्तरातून बाटली काढून तयार असलेले अनन्या आणि शंतनु तर आणखीनच अस्वस्थ झाले. 

सर नवीन असल्याने अजून ओळख व्हायची होती. विचारणार कोण? मग एकमेकांना कोपराने ढोसत तू विचार, तू विचार करून झाले. 

“काय झालं, काही अडचण आहे का?” कोपराने शेजारच्या अवनिशला ढोसणाऱ्या शंतनुला सरांनी विचारले. 

“काही नाही सर.” शंतनु घाईघाईने म्हणाला. 

“सर बाटलीचं विसरले का असं शंतनु मला विचारतोय.” अवनिशने सरळ सांगून टाकले. 

“नाही सर, नाही सर.” म्हणत शंतनुने सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. 

“अच्छा अच्छा, अरे मग विचारायचं की.” सर हसत म्हणाले, “तुला काय वाटलं मी विसरलो का?”. 

“नाही सर” परत शंतनु अवनिशकडे चिडून बघत पुटपुटला. 

“मी तुम्हाला बाटली का आणायला सांगितली असा प्रश्न पडला आहे ना. तिकडेच येतोय. ही माहिती त्यासाठीच आहे. आपल्या प्रयोगाची पूर्वतयारी.” सर म्हणाले. 

प्रयोग म्हणल्यावर सगळ्यांचेच कुतूहल परत जागे झाले. मगाचची कुजबूज आणि चुळबुळ संपून सगळे लक्ष देऊन ऐकू लागले. 

“आपल्या देशासाठी मान्सून हे वरदान आहे. पण मान्सून बेभरवशाचा आहे. आता वातावरण बदलामुळे तो आणखी अनिश्चित होईल असं म्हणतात.” सर म्हणाले. 

“शिवाय सर वर्षाचे चार महिनेच फक्त पाऊस ना आपल्याकडे. माझा मामा लंडनला राहतो, तिथे वर्षभर कधीही पाऊस पडतो.” 

“बरोबर आहे. वर्षातले चार महिनेच पाऊस होणार आपल्याकडे. ते पाणी साठवून पुढे वर्षभर आपल्याला वापरायचे असते. शिवाय पुढच्या वर्षीचा पावसाळा वेळेवर सुरू होईल ही खात्री नाही. पूर्वी बारा बारा वर्षेसुद्धा पाऊस पडला नाही असं घडलं आहे. त्याचे पुरावे आपल्याला साहित्यात, तसेच पुरातत्व संशोधनातून मिळतात.”

“पण म्हणजे सर ते आपल्या हातात नाहीच ना. म्हणजे पाऊस पडणं, न पडणं, वेळेवर पडणं, न पडणं.”

“काही अंशी बरोबर आहे. पण पडलेला पाऊस वाया जाऊ न देणं आपल्या हातात आहे.” सर म्हणाले. 

“कसं काय?”

“पाऊस पडतो तेव्हा आजूबाजूचा सगळा प्रदेश एखाद्या स्पंजसारखा काम करतो. पाणी मातीत शोषले जाते. जमिनीतून ते पुढे ओढे आणि नद्यांपर्यंत पोहोचते. पावसाचे पाणी डोंगर धरून ठेवतात आणि मग हळूहळू सोडत राहतात. डोंगरफोड केली की आपण थेट पाण्याच्या स्रोताला धोक्यात आणतो.

जेथे झाडी आहे अशा ठिकाणी मुळे मातीला धरून ठेवतात. सावलीमुळे ऊन थेट मातीपर्यन्त पोहोचत नाही आणि मातीत ओलावा टिकून राहतो, मातीची धूप होत नाही. मातीची धूप झाली की गाळाने धरणे भरू लागतात. दरवर्षी काही प्रमाणात धरणांची पाणी साठवण्याची क्षमता कमी होत जाते.” 

“शिवाय आहे ते पाणी वायाही घालवतात. आमच्या शेजारच्या इमारतीची टाकी नेहमी भरून वाहत असते.” तृप्ती म्हणाली. 

“बरोब्बर मुद्दा मांडलास. आपल्या पाण्याच्या स्रोतांचे जतन जसे महत्वाचे आहे तसेच आहे ते पाणी जपून वापरणे गरजेचे आहे. काय काय करता येईल त्यासाठी?” सरांनी वर्गाला विचारले. 

“सर, आपण आपल्याला हवे तेवढेच पाणी ग्लासमध्ये ओतून घ्यायचे.” 

“पाणी ग्लासमध्ये उरलेच तर झाडांना घालायचे.”

“किंवा आपल्या पाण्याच्या बाटलीत भरून घ्यायचे, म्हणजे नंतर पिता येईल.”

“भरून ठेवलेले पाणी शिळे झाले म्हणून ओतून द्यायचे नाही.” 

“फरशी पुसताना घातक रसायाने न वापरता साध्या पाण्याने पुसले तर ते पाणी झाडांना वापरता येईल, पाण्याचा पुनर्वापर होईल.” 

“हॉटेलमध्ये आपले जेवण संपत आले तरी वेटर येऊन ग्लास पूर्ण भरतात. आपण लक्षात ठेवून नाही सांगायचे.”

“माझ्या बाबांच्या मित्राचे हॉटेल आहे. बाबांनी त्यांना सांगितले प्रत्येक टेबलवर पाण्याचा जग ठेव. लोक हवे तसे आणि हवे तेवढेच पाणी घेतील. त्यांनी तसे केले. त्यामुळे ५०% पाणी वाचतेच शिवाय त्यांचा खर्च कमी झाला त्यामुळे.” अनन्या म्हणाली. 

“अरे वा, फारच छान.” सर म्हणाले. सगळ्यांनी टाळ्या वाजवून कौतुक केले. 

“आज तुम्हाला बाटली आणायला सांगितली ती ह्याच कारणाने.” सर म्हणाले. 

एकदाचा बाटलीचा उल्लेख आला. शंतनु आणि अनन्या बाटली हातात धरून सरसावून बसले. 

“तुम्ही काल शाळेतले सगळे नळ तपासले. एकूण दहा नळ आहेत आणि त्यातले दोन गळके आहेत, बरोबर?” 

“हो सर!!” 

“चला मग, आपल्याला दोन टीम्स करायच्या आहेत. प्रत्येक टीममध्ये तिघं. शंतनु एका टीमचा लीडर आणि अनन्या दुसऱ्या टीमची.” 

एकच गलका सुरू झाला. चाळीस मुलांच्या वर्गातून फक्त चार मुले निवडायची. प्रत्येकालाच टीममध्ये सामील व्हायचे होते. शंतनु आणि अनन्याचे स्थान लीडर म्हणून निश्चित होते. त्यामुळे दोघेजण मिस्किल हसत सगळा गलका बघत होते. 

“काळजी करू नका. ही सुरुवात आहे. सगळ्यांना भरपूर काम आहे. आत्ता जे टीममध्ये नाहीत त्यांनी खट्टू होऊ नका.” सर म्हणाले. 

टीम्स झाल्या, सगळे जण मग वर्गातून बाहेर पडले. आता उत्सुकता आणखीनच वाढली. टीममध्ये नाही म्हणून नाराज झालेले सुद्धा आता सर काय दाखवणार म्हणून उत्साहाने सामील झाले. 

पहिल्या गळक्या नळाशी येऊन सर थांबले. अनन्या आणि टीमला त्यांनी पुढे यायला सांगितले. 

“अनन्या, मी सांगितलं की ही बाटली नळाखाली भरायला लाव. निलेश, अनन्याने बाटली  नळाखाली धरली की स्टॉप वॉच सुरू कर,” सरांनी आपला मोबाईल निलेशच्या हातात दिला, ““दीपक, बाटली भरली रे भरली की स्टॉप वॉच वर काय आकडा आहे तो वहीत लिही.” सर म्हणाले. 

सरांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी खूण करताच अनन्याने बाटली नळाखाली धरली, निलेशने स्टॉपवॉच सुरू केले. बाटली भरताच दिपकने स्टॉपवॉचवरचा आकडा वहीत लिहून घेतला. 

“शाब्बास!! शंतनु आणि टीम चला आता दुसऱ्या नळाकडे जाऊ.” घोळका दुसऱ्या गळक्या नळाकडे निघाला. तिथेही परत शंतनु, स्वरा आणि अन्वी ह्या टीमने तेच केले. 

“आता चला.” म्हणत सर वर्गाकडे चालू लागले. दोन भरलेल्या बाटल्या, वह्यांमद्धी नोंद घेऊन कंपूही वर्गात येऊन बसला. 

“पहिली बाटली भरायला किती वेळ लागला?” सरांनी अनन्याच्या टीमला विचारले. 

“पंधरा मिनिटं सर.”

“आणि दुसरी बाटली?” सरांनी शंतनु टीमला विचारले. 

“दहा मिनिटं.” 

“बर. मग आता आपल्याला सगळ्यांना एक गणित करायचं आहे बरं का.” सर फळ्यावर हे दोन्ही आकडे लिहीत म्हणाले. भूगोलाच्या सरांनी गणितावर कशी काय उडी मारली हा प्रश्न कोणाला पडला नाही इतके सगळेजण सर काय सांगणार हे ऐकण्यासाठी आतूर होते. 

सरांनी फळ्यावर लिहिले, एक लिटरची बाटली भरायला १५ मिनिटे लागली. म्हणजे दर १५ मिनिटांनी एक लिटर पाणी पहिल्या गळक्या नळातून वाया जाते. दिवसाचे तास २४. म्हणजे २४ x ६० म्हणजे १४४० एवढी मिनिटे. १४४०/ १५ म्हणजे म्हणजे एका दिवसात ९६ लिटर एवढे पाणी वाया जाते. म्हणजे वर्षभरात किती?”

“सर, एका वर्षात ३६५ दिवस. म्हणजे ९६ x ३६५ म्हणजे ३५,०४०.” तृप्ती गणित करत म्हणाली.   

“त्या बाटलीवर किंमत काय  लिहिली आहे अनन्या?” सरांनी विचारले. 

“वीस रुपये!” बाटलीवर छापलेली किंमत अनन्याने वाचली. 

“एक लीटर पाण्याची किंमत वीस रुपये. आपले वर्षभरात गळक्या नळातून पाणी वाया गेले त्याची किंमत मोजायची तर किती होईल?”

“सर मी सांगतो.” अवनिश घाईघाईने म्हणाला, “वर्षभरात ३५,०४०  लिटर पाणी गळले. त्याला  २० ने गुणले म्हणजे ७,००,८०० एवढी पाण्याची किंमत झाली.” 

“बरोब्बर!! शंतनु आणि टीमच्या नळातून दर १० मिनिटांनी एक लिटर पाणी वाया जाते. त्याचे गणित काय होईल?” 

मुले सरसावली. हे गणित करायला फारच मजा येत होती. गणिताची भीती कुठल्या कुठे पळाली. 

“सर, शंतनु आणि टीमच्या नळातून १०, ५१, २०० इतके रुपयाचे पाणी वाया जात आहे. 

मुलांचे डोळे विस्फरले. 

“पाण्याची किंमत करता येत नाही, पाणी अनमोल आहे कारण त्याशिवाय आपण जगूच शकत नाही. पण तरीही अगदी हिशोब करायचाच झाला, तर पहिल्या नळातून साधारण सात लाख आणि दुसऱ्यातून दहा लाख म्हणजे सुमारे १७ लाखाचे पाणी एका वर्षात वाया गेले.” 

“त्यावर उपाय काय सर?” 

“हे दोन्ही नळ आपण दुरुस्त करायचे.” पिशवीतून दोन नळ काढत सर म्हणाले. 

“सर? आपण?” 

“मग त्याला काय झालं?” 

“तुम्हाला येतं?” 

“मी शिकून घेतलं.”

सरांनी नळांपाठोपाठ पाना बाहेर काढला. “चला मग, हे अनाथ नळ आपण दत्तक घेऊ” असे सरांनी म्हणल्याबरोबर परत एकदा सगळी वरात नळांकडे निघाली. 

सरांनी सराईतपणे जुना नळ काढून नवीन नळ बसवला. 

“आम्ही काही समविचारी लोकांनी मिळून अशी टीम तयार केली आहे. नळ कसे बदलायचे हे शिकून घेतले. गळका नळ दिसला की आम्ही दुरुस्त करतो. दुरुस्त होणार नसेल तर बदलून टाकतो. साधारण पाच नळ सतत ह्या पिशवीत असतात माझ्याकडे.” 

“सर, हे नळ मिळतात कुठे तुम्हाला?” पिशवीत डोकावत शंतनुने विचारले. 

“आणले विकत मी.” सर म्हणाले. 

—————–

“सर, मी राहतो त्या वस्तीत आमच्या प्रत्येकाच्या घरी नळ नाही. पन्नास घरं मिळून एक नळ आहे. उन्हाळा सुरू झाला की अनियमित पाणी येतं. खूप त्रास होतो. पण पावसाळा आला की लोक हा त्रास विसरतात. वस्तीतले नळ गळत आहेत. कोणी लक्ष देत नाही. मी काय करू शकतो?” राजेश म्हणाला. 

“काही हरकत नाही. आपण नळ बदलू. पण एका अटीवर.” सर म्हणाले. 

“काय सर?” राजेशने विचारले. 

“नळ दत्तक घ्यायचे ते वस्तीत राहणाऱ्या तुम्हा मुलांनीच.” सर म्हणाले. 

“चालेल सर. आमची गँग आहे. आम्ही लहान मुलांना गोष्टी वाचून दाखवणं, स्वच्छता करणं वगैरे करतो. ही जबाबदारी आम्ही घेतो. एका नळापासून सुरुवात करतो.” राजेशचा चेहरा खुलला. 

“उत्तम!!” 

“नळातून किती किमतीचे पाणी वाया जाते हे आपल्या आजच्या प्रयोगातून मोजा, आणि वस्तीतल्या नळांजवळ ठळक अक्षरात तशी पाटी लावा.” सर पिशवीतून नळ काढत म्हणाले. 

“नक्की सर. आमच्या शेजारी राहणारा संजू दादा प्लंबिंगचे काम करतो. त्याच्या मदतीने आम्ही नळ बदलून घेऊ.” सरांनी दिलेला नळ दप्तरात ठेवत राजेश म्हणाला. 

———–

दुसऱ्या दिवशी सर आले तर काल राजेशला दिलेला नळ टेबलावर होता. 

“काय रे, नळ बदलला नाही? काही अडचण आली का?” सरांनी विचारले.  

“सर, बाबा तुम्हाला भेटायला आले आहेत. बाहेर थांबले आहेत.” राजेश म्हणाला.

“नमस्ते सर. राजेश आणि त्याच्या मित्रांनी एक पाटी काल नळापाशी लावली. तो आकडा पाहून आमचे डोळे उघडले सर. किती पाणी आम्ही वाया घालवत होतो.” पिशवीतून पाण्याची बाटली काढत राजेशचे वडिल म्हणाले, ”हे एवढे पाणी दर सात मिनिटाला नळातून गळून जात होते, मुलांनी आम्हाला दाखवलं. तुमच्यामुळे आम्हाला जाणीव झाली.”  

सरांनी टेबलावरचा नळ त्यांना दिला. “हा तुमच्यासाठीच दिला होता.” सर म्हणाले. 

“धन्यवाद सर. काल नवरात्रीच्या कार्यक्रमासाठी सगळे जमले होते. तिथे राजेशने तुमच्या उपक्रमाबद्दल सांगितलं. हे गणित तिथे दाखवलं. आमच्या नवरात्री मंडळाने ठरवलं आपण गोळा केलेल्या वर्गणीतून नवीन नळ घेऊ. उगीच सजावट करण्यावर खर्च करण्यापेक्षा अशा कामाला वापरू.”  

“सर, तुमच्या उपक्रमासाठी आमच्या वस्तीकडून ही भेट.” असे म्हणत दोन नळ त्यांनी सरांच्या टेबलवर ठेवले. 

सर बघतच राहिले. मुलांनी टाळ्यांचा कडकडाट केला. त्यात वर्गाच्या दाराशी आलेल्या मुख्याध्यापिका आणि इतर शिक्षकही सामील झाले. 

———–समाप्त —————-

ही गोष्ट काल्पनिक असली तरी अनाथ नळांना दत्तक घेणारी व्यक्ती खरी आहे. 

ही गोष्ट आहे श्री. मकरंद टिल्लू आणि त्यांच्या उपक्रमाची. 

२०१६ सालपासून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात आतापर्यंत शेकडो गळके नळ बदलले आहेत. त्यांचे कार्य बघून लोक आता त्यांच्या उपक्रमाला नळ देणगी म्हणून देतात. ते ह्याला ‘cashless’ डोनेशन म्हणतात. 

 

ते आणि त्यांची टीम सगळीकडे फिरून गळके नळ बदलायचे काम करतात. शाळेतल्या, वस्तीतल्या मुलांना एकत्र आणतात, हे गणित करून किती पाणी वाया जाते हे मोजतात आणि मग नळाची जबाबदारी मुलांवर सोपवतात. 

 

आत्तापर्यन्त त्यांनी ह्या उपक्रमाद्वारे जे पाणी वाचवले आहे त्याची किंमत करायची झाली तर ती कोटींमध्ये  आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *