Where Water or Soil

तळ्यात की मळ्यात

फुले आपल्याला कोण देतं? नदी की माती? 

माती !!! 

मग ती फुलं परत कुठे गेली पाहिजेत? नदीत की मातीत? 

मातीत !!! 

निसर्गात ‘मातीतून मातीत’ हे तत्व आहे. मातीतून झाड उगवते. मातीतून पाणी आणि पोषणद्रव्ये घेऊन ते वाढते. झाडाला पाने, फुले, फळे येतात. ती वाळून गळतात, झाडाच्या आजूबाजूच्या मातीत पडतात, कुजतात, त्यांच्यातली पोषणद्रव्ये मातीला मिळतात आणि झाडासाठी परत उपलब्ध होतात. 

ही निसर्गातली चक्राकार व्यवस्था आहे. सगळ्या गोष्टी परत परत वापरल्या जातात. कचरा ही संकल्पनाच तिथे अस्तित्वात नाही. 

हे असेच आपल्या शहरात केले तर आपण आपली शहरे कचरा-मुक्त करू शकू का? 

तळ्यात की मळ्यात ?

“काल दसरा झाला आणि आज लगेच वाहनांना आणि दाराला लावलेले झेंडूच्या फुलांचे हार पुलांवर आणि नदीकाठावर फेकलेले दिसायला लागले.” चारू म्हणाली. 

“नवरात्रीतले घटही तिथे नदीपात्रात कचरा म्हणून पडले आहेत.” मीनल म्हणाली. 

“घट म्हणजे?” शंतनुने विचारले. 

“पूर्वी काही टेस्टिंग वगैरे नव्हतं ना. मग मातीचा कस चांगला आहे आणि धान्य चांगलं आहे हे कळणार कसं. एका बांबूच्या टोपलीत शेतातली माती घालून त्यात वेगवेगळ्या प्रकारचं धान्य पेरतात. जे धान्य त्या टोपलीत जोमाने वाढेल तेच पेरणीला वापरायचं. आपण सॅम्पल टेस्टिंग म्हणतो ना तसं.” संगीता म्हणाली. 

“तुला खूपच माहिती आहे.” अरमान म्हणाला, “आम्हाला ही काही कल्पनाच नव्हती.”

“शेतीच्या दृष्टीने निर्माण झालेल्या ह्या प्रथा आहेत. शेतीतून उत्पन्न मिळालं नाही तर करणार काय? म्हणून मातीचा कस आणि बियाणाची उत्पादकता तपासण्यासाठी ही परीक्षा!!” शैलेश म्हणाला. 

“तुमच्याकडे काय परिस्थिती असते दसऱ्यानंतर?” सिद्धांतने विचारले.  

“गावातही प्रॉब्लेम आहेच रे. लोकसंख्या कमी आहे म्हणून इतकं जाणवत नाही एवढंच. तुमच्याकडे एवढ्या मोठ्या शहरातलं निर्माल्य नदीकाठावर येतं म्हणून डोळ्यात भरतं.” गणेश म्हणाला.  

“आमच्याकडे मातीही जास्ती उपलब्ध आहे ना. त्यामुळे ओढ्याच्या काठावर टाकलेले फुलांचे हार कुजून मातीत जातात.” कविता म्हणाली. 

“हो, ते आहेच. इथे निर्माल्य पुलाकाठच्या फरशांवर किंवा नदीपात्रात कॉँक्रीटवर पडलेलं असतं.” चारू म्हणाली.  

“पण समस्या आमच्याकडेही आहेच अजून शहराइतकी गंभीर झाली नाही एवढंच.” राजू म्हणाला.  

————

“परवा गंमतच झाली. मी आमच्या एका नातेवाईकांकडे गेलो होतो. पुण्याजवळच कात्रजच्या थोडं पुढे त्यांचं गाव आहे. त्यांना भेटून बाहेर पडलो. त्यांनाही जवळच कुठेतरी जायचं होतं म्हणून तेही माझ्याबरोबर निघाले. त्यांनी घरातून निघताना एक पिशवी बरोबर घेतली. त्यात निर्माल्य होतं. जाताना ओढ्यात टाकतो म्हणाले.” मीनलच्या बाबांचे मित्र सांगत होते. 

“ओढ्यात?” मीनल किंचाळली, “आणि तेही प्लॅस्टिकच्या पिशवीत घालून?” 

“हो ना. मलाही खटकलं. त्यांना सांगितलं असं करू नका. ओढ्यात कशाला टाकता? आणि त्यात परत प्लास्टिकच्या पिशवीत. सडेलच ना ते. पण ते काही ऐकायला तयार नव्हते.” काका म्हणाले. 

“पुण्यातही नाही का नदीकाठावर, नदीपात्रात, पुलावर, थेट नदीत, पिशवीतून निर्माल्य टाकलेलं असतं.” मीनलची आई म्हणाली.  

“मी त्यांना सांगून बघितलं ओढ्यात टाकू नका पण ते ऐकतच नव्हते. मग मी सोडून दिलं.” 

“मग त्यांनी टाकलं ते ओढ्यात?”

“नाही. तीच तर गंमत आहे.”

 

गंमत म्हणल्यावर मीनलचे कान टवकारले. 

“आमची चर्चा सुरू होती. मी त्यांना सांगत होतो पण ते काही ऐकत नव्हते. आम्ही अगदी ओढ्याजवळ पोहोचलो होतो. आता हे ओढ्यात ती पिशवी टाकणार म्हणून वाईट वाटत होतं. तेवढ्यात एक मुलगी आली. तुझ्याच वयाची असेल. ‘काका, तुमचं निर्माल्य आमच्या शाळेच्या खत प्रकल्पासाठी द्याल का?’ म्हणून तिने विचारलं.”

 

“मग?” 

“काय आश्चर्य, मी एवढा वेळ त्यांना सांगत होतो ओढ्यात टाकू नका तर ऐकत नव्हते. पण तिने विचारलं की आमच्या खत प्रकल्पासाठी निर्माल्य द्याल का तर लगेच तयार झाले. निर्माल्याची पिशवी तिच्याकडे दिली त्यांनी.”

 

“भारी!!!”

“‘असं करू नका’ हे सांगण्यापेक्षा ‘असं करा’ असा पर्याय दिला की लोकांना ते पटतं असं मला वाटतं.” 

“कोण मुलगी होती?” 

“त्यावेळी लक्षात नाही आलं मला तिचं नाव विचारायचं.”

“तिच्या शाळेचं नाव?” 

“तेही नाही विचारलं.” काका म्हणाले. 

“काय हो काका, आता कस शोधणार? त्यांच्या प्रकल्पावरून आपल्यालाही काही नवीन कल्पना मिळाली असती ना.” मीनल म्हणाली. 

“माफी असावी!!” काका दोन्ही कान धरून मिस्कीलपणे म्हणाले.

मीनलला खुदकन् हसू आले. “कात्रज जवळचं गाव आहे हे माहिती आहे ना आपल्याला. शोधता येईल.” ती विचार करत पुटपुटली. 

“निळ्या रंगाचा चौकडीचा युनिफोर्म होता तिचा.” काका आठवून म्हणाले. 

———-


“आपल्याबरोबर क्वीझसाठी मुलींच्या शाळेची टीम आली होती ना, त्यांचाही निळा चौकडीचा युनिफॉर्म होता.” गणेश म्हणाला. 

“कोण रे?” सिद्धांतने विचारले. 

“त्यांची टीम पुढे फायनलला गेली. त्यातल्या एका मुलीबरोबर आपली बरीच चर्चा झाली होती बघ. अल गोरचं inconvenient truth आणि story of stuff फिल्मबद्दल तिने सांगितलं आपल्याला.”

 

“हो हो, आत्ता आठवलं. तिने आपल्याला सांगितलं की story of stuff ची मराठीतसुद्धा फिल्म आहे.” सिद्धांत म्हणाला. 

 

“बरोब्बर, तीच!!” 

“काय बरं नाव होतं तिचं?”

————-

“आपला पुण्यातला कुंभारवाडा आहे ना तिथे एक वेस होती, कुंभारवेस. एकेकाळी तिथे पुणं संपत होतं. एरंडवणे, भांबुर्डा, पाषाण ही स्वतंत्र गावं होती. त्या गावांना सामावून घेत शहर वाढलं. ह्या एवढ्या मोठ्या शहराला पाणी द्यायचं म्हणून मग धरणं आली. नदीतलं शुद्ध पाणी त्यात अडलं. वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माल्याचे वाढलेलं प्रमाण आणि नदीची ही अवस्था, ह्यामुळे निर्माल्य नदी पचवू शकत नाही.” नदी फेरीला आलेल्या गँग आणि इतर लोकांना गाईड सांगत होत्या. 

“ह्या नदीत एके काळी पोहायचो आम्ही. पावसाळ्यात नदीला पूर आला की लकडी पुलावरून नदीत उडी मारायची आणि ओंकारेश्वरापाशी बाहेर यायचं असले उद्योग चालायचे.” नदी फेरीला आलेले एक आजोबा म्हणाले. 

“हो ना. आज नदी फेरीला येताना पाण्याची बाटली घेऊन या असं तुम्ही सांगितलं. वाईट वाटलं. एकेकाळी हे असं ओंजळीने पाणी प्यायलोय ह्या नदीचं.” त्यांच्याबरोबरच्या आजी हाताची ओंजळ दाखवत म्हणाल्या. 

“नदी एवढी स्वच्छ होती?” अरमान म्हणाला. 

“तुम्हा मुलांनी कायम ही अशीच नदी बघितली आहे. तुमची चूक नाही बरं का. ही चूक आमच्या पिढीची आहे.” एक काका म्हणाले.  

————

“तो बघ खेकडा.” 

“ए, जपून. नांगी बघ त्याची.” 

“केवढा मोठा आहे.”

“चिखलात लपून गेला आहे. हलला नसता तर कळलंच नसतं तो आहे ते” 

“बसमध्ये भेटलेले काका म्हणाले की ह्या खेकड्याला मुठ्या म्हणतात. ह्याच भागात दिसतो. नदीला त्याच्यामुळेच मुठा असं नाव पडलं.” 

“मला वाटलं त्या मुठा गावातल्या मुठेश्वरामुळे.” 

गँग आज मुठा नदीकाठी आंदगावला आली होती. पुण्यापासून साधारण 30 कि. मी वर. मुठा नदी वेगरे ह्या गावी उगम पावते. लवासाला जाताना टेमघर धरणाजवळ डावीकडे लवासाकडे रस्ता जातो तर उजवीकडचा कच्चा रस्ता वेगरे गावाकडे जातो. टेमघर धरणापासून साधारण चार कि. मी वर वेगरे आहे.

वेगरे, लवार्डे, आंदगाव, मुठे असे करत नदी पुढे पुणे शहरात येते. 

आंदगावला एक निसर्ग शिबिर सुरू होते. त्यातला दादा अरमानच्या बाबांच्या मित्राचा मुलगा. ‘पूर्वी नदी कशी होती ह्याची झलक बघायची असेल तर उद्या सकाळी सगळे इकडे या. उद्या शिबिरातल्या मुलांना घेऊन आम्ही नदीवर जाणार आहोत.’ दादाने गँगला आमंत्रण दिले. PMPMLची बस इथे येते हेही त्याने सांगितले. 

“मी कारने मुलांना सकाळी तिथे सोडते.” चारूची आई म्हणाली. 

“मी दुपारी आणायला जाईन.” अरमानचे बाबा म्हणाले. 

“तू आम्हाला सोडणार आणि मग 30 कि. मी. एकटीच परत येणार. मग काका आम्हाला घ्यायला 30 कि. मी अंतर येणार. म्हणजे साठ कि. मी. चा प्रवास उगीच होणार.” चारूने हिशोब केला. 

“त्याला इलाज नाही. तुम्हाला तिथे अर्धा दिवस तरी लागेल. एवढा वेळ थांबता येणार नाही आम्हाला. एक जण सोडायला आणि एक जण आणायला असंच करावं लागेल.” अरमानचे बाबा म्हणाले. 

“एक प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न करताना दुसरं प्रदूषण निर्माण करायचं ह्याला काय अर्थ आहे. दादा म्हणाला ना बस आहे तिथपर्यंत. त्यानेच जातो.” सिद्धांत म्हणाला. 

“एवढ्या लांब बसने कसं पाठवणार?” मीनलची आई म्हणाली. 

आई-वडिलांची जोरदार चर्चा झाली. गँग अगदी ठाम होती. शेवटी सिद्धांतच्या दादाने स्वानंदने उपाय सुचवला. “मी गँगबरोबर जातो. मागच्या आठवड्यातच कॉलेजची परीक्षा झाली आहे. मी फ्री आहे.” तो म्हणाला. मग गँगला परवानगी मिळाली. 

“नक्की कुठली बस जाते? पूर्वी एका फोन नंबरवर बसची माहिती मिळायची. कसा शोधायचा तो नंबर?” सिद्धांतच्या घरी परत चर्चा सुरू झाली. 

“बाबा, नो प्रॉब्लेम.” असे म्हणत स्वानंदने गूगलमॅपवर बघितले. आंदगांव, मुळशी असा पत्ता दिला आणि त्यांच्या सोसायटीचा पत्ता दिला.

“गूगलमॅपमध्ये बसची माहिती असते?” आईने आश्चर्याने विचारले. 

“आपण डायरेक्शन बघतो त्यात आपण दिलेल्या पत्त्यापासून जेथे जायचे आहे तिथपर्यंत चालत, दुचाकी आणि चारचाकीने किती वेळ लागेल, रस्ता कुठला घ्यायचा आणि कसे जायचे ही माहिती असते. त्यातच आणखी चौथा पर्याय असतो तो सार्वजनिक वाहतूकीचा. बसचं चित्र असतं. त्यावर बस, रेल्वे आणि आता मेट्रोचीही माहिती मिळते.”

“हे आम्हाला माहितच नव्हतं.” 

“मागच्या महिन्यात स्पर्धेसाठी आमच्या कॉलेजची टीम घेऊन निगडी प्राधिकरणातल्या एका कॉलेजमध्ये गेलो होतो. त्यावेळी आम्ही हे वापरलं.” स्वानंदने सांगितले. “PMPMLचं स्वतःचं अॅपही आहे. गूगलमॅपशी त्यांचा माहिती करार असल्याने तिथेही माहिती येते.”

 

“अगं बाई, नवीनच आहे हे.” फोनमध्ये डोकावत आजी म्हणाली,”तिकीटांसाठी सुट्टे पैसे ठेवा हा बरोबर. नाहीतर पंचाईत होईल.” तिने सुचवले. 

“अगं, आजी, आता कंडक्टर पैसे ऑनलाईन घेऊ शकतात. सुट्टे पैसे नसले तरी टेंशन नाही.” स्वानंद म्हणाला. 

 

“हे आम्हालाही नवीन आहे. अर्थात किती वर्षे झाली बसने प्रवासही केला नाही म्हणा.” बाबा म्हणाला. 

रात्री ग्रुपवर सगळा प्लॅन आला, कुठली बस, कुठला स्टॉप आणि वेळ ही सगळी माहिती. सोसायटीच्या गेटपाशी सकाळी ठीक पावणे सात वाजता भेटायचे ठरवून गँग दुसऱ्या दिवशीचा विचार करत झोपी गेली. 

———–

“कुठे निघाले?” बसमध्ये शेजारी बसलेल्या काकांनी शंतनुला विचारले. 

“आंदगाव.” 

“अरे वा. आमच्या गावाजवळ. तिथे काय काम काढलं?” शंतनुची टोपी, जर्कींन, शूज ह्या जाम्यानिम्याकडे कुतुहलाने बघत त्यांनी विचारले. 

“नदी बघायला चाललोय.” सिद्धांतने त्यांना सांगितले. 

“नदी बघायला?” काकांचा चेहऱ्यावरचे कुतूहल आणखी वाढले. 

“तुम्ही बघितली आहे नदी?” शंतनुने विचारले. 

“बघितली म्हणजे लहानपणापासूनच बघतोय की. नदीकाठीच गाव आहे ना आमचं. तेच पाणी प्यायला आणि शेतीला.” काका म्हणाले आणि मग त्यांनी नदीबद्दल बरंच काही सांगितलं. 

“काका, शहरात नदीत लोकांनी निर्माल्य टाकू नये म्हणून आम्ही प्रयत्न करत आहोत. शहरात नदीची अवस्था खूप वाईट आहे.” चारू म्हणाली. 

“ते मात्र खरं आहे. माझी मुलगी पुण्यात असते. तिच्याकडे आलो होतो काल. आता घरी चाललोय. रात्री जेवल्यावर शतपावली करत पुलावर गेलो तर उभं राहवत नव्हतं तिथे. नदीचा घाण वास येत होता आणि वर पुलावर हा एवढा कचरा लोकांनी प्लॅस्टिकच्या पिशव्यांत भरून आणून ठेवलेला.” काका म्हणाले.  

“हायड्रोजन सल्फाईड!!” शंतनु डायरी वाचून म्हणाला. 

“काय?” काकांनी विचारले. 

“तो वास येतो ना तो हायड्रोजन सल्फाईडचा असतो.” शंतनुने सांगितले. 

“एवढी हुशार मुलं तुम्ही. नदी स्वच्छ करायचा उपाय शोधा की काहीतरी.” काका शंतनुकडे कौतुकाने बघत म्हणाले. 

“त्याच प्रयत्नात आहोत.” चारू म्हणाली. 

“त्यासाठीच आत्ता आंदगांवला निघालो आहोत.” मीनल म्हणाली. 

“शुभेच्छा. नक्की उपाय शोधाल तुम्ही.” मुठा गाव आले तसे उतरता उतरता हसून काका म्हणाले. 

“आंदगाव किती लांब आहे काका?” सिद्धांतने कंडक्टरना विचारले.

 

“दहा मिनिटांत आलंच आता.” त्यांनी सांगितले. 

स्टॉपवर आंदगावची पाटी होती.  शिवाय कंडक्टरकाकांनी ‘आंदगाव’ म्हणून पुकारा केला. 

स्वानंद आणि गँग स्टॉपवर उतरले. रस्ता ओलांडला की समोरच आंदगावची शाळा होती. निसर्ग शिबिर त्या शाळेतच भरले होते. 

अक्षयदादाला स्वानंदने मेसेज केला होता. गँगला बघताच तो पुढे आला. “काही प्रॉब्लेम नाही आला ना प्रवासात?”

“अजिबातच नाही. बस वेळेवर आली. गर्दी होती. सुरुवातीला थोडा  वेळ उभं राहायला लागलं पण चांदणी चौकाजवळ मग बसायला जागा मिळाली.” स्वानंदने सांगितले. 

“मुठा गावात राहणारे एक काकाही भेटले.” शंतनु म्हणाला. 

“अरे वा! बसचा तो फायदा असतो. नवीन लोक भेटतात. काहीतरी वेगळी माहिती कळते.” 

“हो, आम्हालाही कळलं ना  मुठ्याबद्दल.” शंतनु म्हणाला. 

अक्षय दादाने प्रश्नार्थक नजरेने बघितले. मुठ्या काय आहे हे शंतनु सांगणार तेवढ्यात अक्षय दादाला कोणीतरी बोलावले. “चला, ऊन व्हायच्या आत निघायचे आहे. तुम्ही फ्रेश व्हा. लगेच निघू.” म्हणून तो तयारीला गेला. 

गँग काय फ्रेशच होती. सकाळची वेळ होती. शिवाय बसमध्ये एक छोटी डुलकी झाली होती. 

शिबिरातली मुले रांग करून उभी राहिली. गँगही रांगेत सामील झाली. रस्ता ओलांडून पुढे शेतांतून जायचे होते. शेतातल्या पिकाचे नुकसान न करता कडेने एका मागून एक चालायचे वगैरे सूचना अक्षयदादाने दिल्या.

 

वाटेत एक शंकराचे दगडी मंदिर दिसले. मंदिर सुंदर होते पण थोडे दुर्लक्षित असावे. भिंतीतून उगवलेली पिंपळाची रोपे चांगलीच मोठी झाली होती. भिंतीच्या दगडांची शिस्त त्यांच्या मुळांनी पार बिघडवून टाकली होती. 

“स्मृतिशिळा!!” शेतातून जाताना बांधाच्या कडेला बोट दाखवत मीनल म्हणाली.

 

“खरंच की!” भोवतालची झुडपं बाजूला करत अरमान म्हणाला. 

एव्हाना सगळी मुले त्यांच्याभोवती जमा झाली. शेतात एक दगड होता आणि त्याच्यावर काही आकृती कोरलेल्या दिसत होत्या. 

“ह्याला स्मृतिशिळा म्हणतात, म्हणजे स्मारक म्हणता येईल. शेतात ह्या उभारायचे. घराण्याचा मूळ पुरुष वगैरे ह्यांची प्रतिमा त्यावर असते.” चारुने माहिती दिली.

 

“तुम्हाला कशी ही सगळी माहिती?” अक्षय दादाने आश्चर्याने विचारले. 

“प्रणव दादा म्हणजे प्रणव पाटील आहे. तो स्मृतिशिळा आणि वीरगळांचा अभ्यास करतो. महाराष्ट्र आणि कर्नाटकात फिरून त्याने ह्या वारशाचा अभ्यास आणि नोंद केली आहे.” सिद्धांत म्हणाला.

 

“आमच्या सोसायटीजवळून एक ओढा वाहतो. त्याच्या काठावरच्या स्मृतिशिळेचा अभ्यास करायला तो आला होता.” 

“त्यामुळे आम्हाला कळलं की आत्ता आमची सोसायटी आहे तिथे पूर्वी शेती होत असणार.” 

“हो ना. आमची सोसायटी व्हायच्या आधी अशीच शेतं असणार त्या भागात.” आजूबाजूच्या शेतांकडे बघत स्वानंद म्हणाला.  

 

गप्पा मारत सगळे नदीपर्यंत पोहोचले. 

“नदी किती स्वच्छ आहे बघ ना. अगदी तळ दिसतो आहे.” मीनल म्हणाली. 

“अशा ठिकाणी निर्माल्य नदीला अर्पण केले तर नदी सहज ते पचवू शकेल. वाहती नदी आहे, तिच्यात शुद्ध पाणी आहे.” 

“तो बघा!!” अक्षयदादा म्हणाला. अक्षयदादाच्या हाताच्या दिशेने त्यांनी बघितले तर एक काळा आणि पांढऱ्या रंगाचा पक्षी होता. हवेत पंख हलवत एका जागी थांबला होता. मग अचानक त्याने पाण्यात सूर मारला. बाहेर आला तर त्याच्या चोचीत मासा होता.

 

“कुठला पक्षी आहे?”

“त्याचं नाव कवड्या किंवा पाईड किंग फिशर!!” 

 

“किंगफिशर मला माहिती आहे. व्हाईट थ्रोटेड किंगफिशर आणि कॉमन किंगफिशर. 

 

“बरोब्बर. हा त्याच फॅमिलीतला.” 

 

“ते दोन्ही मी खूप वेळा बघितले आहेत. कवड्या पहिल्यांदाच बघितला.” 

 

“ते दोन्ही किंगफिशर किडेही खातात. कवड्या मासे खातो. त्यामुळे कवड्या दिसायला नदीत मासे पाहिजेत.” 

 

“पुण्यात नदीची अवस्था बघता त्यात मासे जगणं अवघडच. आणि चुकून एखादा मासा असलाच तरी तो कवड्याला दिसला पाहिजे ना. पुण्यात नदीचं पाणी किती गढूळ असतं.” 

 

“हा पक्षी नदीच्या स्थितीचा निदर्शक म्हणजे इंडिकेटर आहे. हा नदीवर दिसतो म्हणजे नदीत मासे आहेत आणि ते दिसण्याइतकं नदीचं पाणी स्वच्छ आहे असा अर्थ आहे. तो हवेत जे करत होता त्याला हॉवरींग म्हणतात. हा असे हॉवरींग करतो आणि मासा दिसला की सूर मारून तो पकडतो.” अक्षयदादाने सांगितले.  

 

“अच्छा. म्हणजे जिथे हा पक्षी दिसतो तेथे नदी चांगली आहे असं समजायचं.”

 

“बरोब्बर. त्यामुळेच आता शहरात हा पक्षी नदीवर दिसत नाही. पाषाण तलावावर साधारण दहा वर्षांपर्यंत दिसत होता. आता तेथूनही गायब झाला आहे.” दादा म्हणाला, “पक्षी एका ठिकाणहून दुसरीकडे जाऊ शकतात. त्यामुळे एखाद्या ठिकाणची परिस्थिती प्रतिकूल झाली की ते पक्षी ती जागा सोडून जातात. ज्या पक्ष्यांना ती बदललेली परिस्थिती अनुकूल आहे ते पक्षी त्यांची जागा घेतात. नदीवर कुठले पक्षी दिसतात ह्यावरून नदीची स्थिती कशी आहे हे ह्याचा अंदाज आपल्याला येऊ शकतो.”

 

“आपल्या शहरात नदीवर कुठले पक्षी दिसतात?”

 

“कावळे!” 

 

“घारी!!”

 

“पाण्यात तो पक्षी दिसतो ना? भुऱ्या रंगाचा, उडताना पांढरे पंख दिसतात.”

 

“त्याचे नाव वंचक म्हणजे इंडियन पॉन्ड हेरॉन. तो पाणपक्षी आहे.”

 

“नदीतून कचऱ्याचे किंवा जलपर्णीचे ढीग वहात असतात ना, त्यावर बसून हा चाललेला असतो.” 

 

“लिफ्ट मिळते त्याला.”

 

सगळे हसले. 

 

“हे सर्व पक्षी हे स्कॅव्हेंजर प्रकारचे म्हणजे कचरा खाऊन जगणारे आहेत. मासे पकडणारे तसेच सूर मारणारे पक्षी आता आपल्या नदीवर शहरात दिसत नाहीत. असाच आणखी एक पक्षी म्हणजे नदी सूरय. त्याच्या नावावरून कल्पना आली असेल की तो सूर मारणारा पक्षी आहे.”

 

“आणि नदीवरचा पक्षी आहे. म्हणजे नदी त्याचा अधिवास आहे.” शंतनु म्हणाला. 

 

“अरे, वा हा शब्द तुला माहित आहे.” 

 

“हो, आम्हाला धड्यात आहे.”

 

“नदीसूरय आता पावसाळ्यात जेव्हा धरणातून पाणी सोडतात ना तेव्हा कधी कधी दिसतो. पूर्वी हे पक्षी शेकड्याने होते नदीवर. ते गायब झाले.”

 

“एकूणच नदीत डुबकी मारणारी बदकं म्हणजे डायव्हिंग डकस् आता नदीवर दिसत नाहीत. दिसतात ती डॅबलिंग डकस् म्हणजे नदीच्या पृष्ठभागावरचे किडे वगैरे खाणारी.”

 

“शहरात शिरण्यापूर्वी नदी सुंदर आहे. आपण तिला खराब करून पुढच्या गावांत पाठवतो.” गटातली एक मुलगी म्हणाली. 

 

“आपण नदीत निर्माल्य टाकलं नाही तर नदी एकदम स्वच्छ राहिल का?” शंतनुने विचारले. 

 

“केवळ निर्माल्यामुळे नदी प्रदूषित नाही. नदीची ही अवस्था आहे ते नदीचं शुद्ध पाणी आपण धरणात अडवलं आहे म्हणून. पावसाळ्याचे चार महिने सोडले तर नदीत शुद्ध पाणी असं नसतंच. शुध्द पाणी नाही म्हणजे विरघळलेला ऑक्सिजनही त्यात नाही. शिवाय महानगर पालिकेने सांडपाण्यावर संपूर्ण प्रक्रिया करून मगच ते नदीत सोडणं अपेक्षित आहे तसं होत नाही. त्यामुळे नदीत सांडपाणी भरपूर आहे ते नदीला मारक आहे. त्यामुळे विरघळलेला ऑक्सिजन कमी होतो, नदीचं पाणी गढूळ दिसतं. घाण वास येतो.”

 

“जैविक घटकांचं विघटन करण्यासाठी आवश्यक ऑक्सिजन नदीत नाही म्हणून निर्माल्य आता नदीत टाकायचे नाही.” अक्षयदादा म्हणाला. 

 

“नदीची परिस्थिती सुधारायची असेल तर काय केले पाहिजे?” 

 

“सुरुवात ‘आपण काय करू शकतो’ ह्यापासून झाली पाहिजे. करण्यासारख्या गोष्टी खूप आहेत. काही सोप्या आहेत तर काही अवघड आहेत. अवघड म्हणजे अशक्य नाही. पण आपण आज ठरवले आणि उद्या तसं झालं इतक्या सोप्या नाहीत. जसं मैला पाणी प्रक्रिया. त्यासाठी मोठी यंत्रणा उभारावी लागते. सरकारच्या ते हातात आहे आणि त्यांनी प्राधान्य देऊन ते केलंच पाहिजे. मग आपल्या हातात काय आहे जे आपण लगेच अमलात आणू शकतो, जसे निर्माल्य!!” 

 

“निर्माल्य प्लॅस्टिकच्या पिशवीत घालून टाकायचे नाही”

 

“मूळात निर्माल्य नदीत टाकायचं नाही. ते परत मातीला मिळेल असं केलं पाहिजे.”

 

“बरोबर!! निर्माल्य हे मातीत गेलं पाहिजे.”

 

“आमच्या शाळेत असा प्रकल्प केला आहे. आम्ही निर्माल्याचे खत करतो आणि ते खत बागेसाठी वापरतो.” शिबिराच्या ग्रुपमधली शिल्पा म्हणाली.  

 

“अरे वा. फारच छान कल्पना आहे.”

 

“तुझ्या शाळेचा युनिफोर्म निळा आणि चौकडीचा आहे का?” शंतनुने विचारले. 

 

“हो!” शिल्पा म्हणाली. 

 

“आम्ही तुलाच शोधत होतो.”  ‘टॉक्क!!’ आवाज करत शंतनु म्हणाला. 

 

———

 

गँग ट्रीहाऊसमध्ये, शिल्पा तिच्या घरी आणि गणेश-गँग त्यांच्या गावी अशी त्यांची आजची ऑनलाईन मिटिंग सुरू होती.

 

“निर्माल्य खत प्रकल्पाची मूळ कल्पना आमची नाही,” शिल्पा म्हणाली, “दुसऱ्या एका शाळेत हा प्रकल्प बरीच वर्षे सुरू आहे. त्यांनी गच्चीवर बाग केली आहे जिथे ते भाजीपाला पिकवतात. निर्माल्य आणि वाळलेली पानं वापरतात. वाळलेली पानं ते आजूबाजूच्या लोकांकडून घेतात. त्यामुळे ती पानंही जाळली न जाता परत मातीत जातात.” 

 

“भारी कल्पना आहे.”

 

“आणखी एक शाळा आहे जिथे गणेश उत्सव  ते दसरा ह्या काळात निर्माल्य गोळा करतात आणि त्याचं खत करतात. घरातलं तसंच जवळच्या गणपती मंडळांतलं निर्माल्य विद्यार्थिनी गोळा करतात. त्याचं खत करून विकतात.” 

 

“ही कल्पनाही छान आहे.” 

 

“त्या प्रकल्पाचं सगळं व्यवस्थापन विद्यार्थिनींकडे आहे.” 

 

“तुला हे सगळं कसं कळलं?”

 

“आमच्या शाळेत प्रकल्प करायचं ठरवल्यावर आमच्या मुख्याध्यापिकांबरोबर आमची विद्यार्थिनींची टीम ह्या प्रकल्पांना भेट देऊन आलो. प्रकल्प का आणि कसा सुरू केला, तिथे काय करतात, त्यांना काय अडचणी आल्या हे सगळं समजावून घेतलं.”

 

“भारी आहात तुम्ही.”

 

“आमच्या मुख्याध्यापिका खूप उत्साही आहेत. आमच्या शाळेत परसबाग केली आहे. भरपूर भाजीपाला आहे. बागेत आंबे हळद छान आली होती. ती काढली तेव्हा त्याचं लोणचं करून आम्हाला सगळ्यांना मधल्या जेवायच्या सुट्टीत त्यांनी दिलं होतं.” शिल्पाने सांगितले. 

 

“मस्त!!” 

 

“आमच्या शाळेत मोठी झाडं नाहीत. बागेसाठी सुरुवातीला शाळेने माती विकत आणली. पण मॅडमनं ठरवलं शाळेत खत करायचं. ह्यापुढे माती विकत आणायची नाही. पण झाडं नसल्याने वाळलेली पानं नाहीत. मग निर्माल्यापासून खत करण्याची कल्पना पुढे आली.”

 

“फारच छान आहे.” 

 

“निर्माल्यापासून खत प्रकल्प चालतो कसा? निर्माल्य कसं गोळा करता?” चारूने विचारले. 

 

“शाळेत येताना आम्ही घरातून निर्माल्य आणतो. आपण दप्तर, डबा घेऊन शाळेत येतो ना तसं आम्ही निर्माल्याची पिशवीही बरोबर आणतो.” 

 

“लोकांना पटली ही कल्पना?” गणेशने विचारले.  

 

“शाळा सुरू व्हायच्या वेळी जूनमध्ये जी पालक सभा असते त्यात मुख्याध्यापिकांनी ही कल्पना पालकांसमोर मांडली.”

 

“पालकांचं काय म्हणणं होतं?” 

 

“सगळ्यांना कल्पना खूप आवडली. शाळेत कॉम्पोस्टिंगसाठी पिंजरा आधीच तयार करून ठेवला होता. त्या दिवशी पालकांच्याच हस्ते प्रकल्पाचं उद्घाटन केलं.” 

 

“तुम्ही घरून निर्माल्य आणल्यावर मग पुढे काय होतं?” 

 

“शाळेच्या फाटकाजवळच आतल्या बाजूला आमचा खत प्रकल्प आहे. फाटकाशी वॉचमन काका असतात. त्यांच्याकडे आम्ही निर्माल्य देतो. ते कॉम्पोस्टच्या पिंजऱ्यात टाकतात.” 

 

“निर्माल्यात इतर काही म्हणजे प्लॅस्टिक वगैरे असेल तर?”

 

“निर्माल्यात बाकी काही येणार नाही ह्याची आम्ही काळजी घेतो. पण चुकून असं काही आलंच तर काका बाजूला काढतात.”

 

“आई सांगत होती काही वर्षांपूर्वी महानगरपालिकेने निर्माल्य कलश ठेवले होते. कलशाच्या आकाराचा मोठा कंटेनर होता. नदीवरच्या पुलांवर ते ठेवले होते. नदीत निर्माल्य टाकायला लोक तिथे येतातच, त्यांना सोयीचं म्हणून.” मीनल म्हणाली. 

 

“चांगली कल्पना आहे की. निर्माल्य म्हणजे देवाला वाहिलेली फुलं, फळं, पानं, धान्य असतं म्हणजे जैविक. पण ओल्या कचऱ्यात ते टाकायला लोकांना नको वाटतं.” कविता म्हणाली.  

 

“हो, म्हणून ही कलशाची कल्पना की ज्यात फक्त निर्माल्य असेल. कल्पना छानच होती. पण लोकांनी त्यात वाट्टेल तो कचरा टाकायला सुरुवात केली.” मीनल म्हणाली. 

 

“हो, आम्ही त्याबद्दल शाळेत बोललो होतो. डायपरपासून काहीही त्यात मिळायला लागलं. लोक सरळ सरळ कचराकुंडी म्हणून तो कलश वापरायला लागले त्यामुळे मग तो प्रकल्प बंद पडला.” शिल्पा म्हणाली, “शाळेत लक्ष ठेवायला काका आहेत म्हणून शिस्त पाळणं शक्य आहे. शिवाय शाळेचा प्रकल्प आपला प्रकल्प वाटतो ना. त्यामुळे जास्ती काळजी घेतली जाते.” 

 

“नुसत्या निर्माल्यापासून खत होतं?” 

 

“हो. स्वयंपाकघरातल्या कचऱ्याचं करतो तसंच. पद्धत तीच असते. त्यात काही फरक नाही. श्रावण महिन्यात निर्माल्याचं प्रमाण खूप असतं किंवा पावसाळ्यात ओलेपणा खूप येतो. अशा वेळी तो ओलेपणा शोषून घ्यायला लोक भुस्सा विकत आणून घालतात. आम्ही युक्ती केली. आम्ही वाळलेली पानं घालतो. आमच्या शाळेच्या मुख्य शाखेचा परिसर मोठा आहे. खूप जुनी झाडं आहेत. त्यांच्याकडे वाळलेल्या पानांचा खत प्रकल्प काही वर्षांपासून छान सुरू आहे. मग आमच्या इथून शिक्षक मिटिंगसाठी मुख्य शाखेत येत-जात असतातच, ते एखादा दोन पोती वाळलेली पानं तिकडून घेऊन येतात. खत प्रकल्प सुरू करताना जे कल्चर म्हणजे विरजण लागतं तेही तिथूनच आणलं आम्ही.” 

 

“काही दिवसांपूर्वी बाबांचे मित्र आले होते. त्यांच्याकडून आम्हाला तुमच्या शाळेचा उपक्रम समजला. एकजण निर्माल्य ओढ्यात टाकणार होते. तुमच्या शाळेतल्या एका मुलीने त्यांच्याकडून खत प्रकल्पासाठी निर्माल्य मागून घेतले.” मीनल म्हणाली. 

 

“हो, आमच्या मुख्याध्यपिकांनी हा प्रकल्प शाळेपुरताच न ठेवता गावातल्या लोकांसाठी खुला केला. त्यांना आवाहन केलं की निर्माल्य आमच्या प्रकल्पासाठी द्या.”

 

“हे छान आहे.”

 

“इतर लोकांपर्यंत माहिती कशी पोहोचली?”

 

“शाळेत सगळ्यांसाठी खत प्रकल्पाची खुली भेट ठेवली. आजूबाजूचे लोक येऊन बघून गेले आम्ही निर्माल्याचे नेमके काय करतो. प्रकल्प बघितल्यापासून आता नियमित आम्हाला आणून देतात. आम्ही आमच्या शेजारच्या लोकांना सांगितलं. जे प्रकल्पाला भेट देऊन गेले त्यांनी त्यांच्या शेजारी सांगितलं. शिवाय मुख्याध्यपिकांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला कोणी निर्माल्या टाकताना दिसलं तर त्यांना सांगा आपल्या खत प्रकल्पाला द्यायला.”

 

“तरीच ती मुलगी काकांच्या हातातली निर्माल्याची पिशवी बघून आली होती.”

 

“पालक प्रकल्पावर खूप खुश आहेत. त्यांना घरी बागेसाठी खत हवं असेल तर जरूर घेऊन जा असंही  मॅडमनं सांगितलं आहे. ही कल्पनासुद्धा लोकांना आवडली. लोकांच्या खूप भावना असतात. आत्ता आमच्या लक्षात आलं. तयार खत नेताना सुद्धा ते निर्माल्याचं आहे म्हणून नमस्कार करतात.”

 

“लोकांना शिस्त नाही हेही खरं आहे ना पण.” 

 

“ते आहेच.”

 

“विचार करत नाहीत हाही आणखी प्रॉब्लेम आहे.”

 

“पूर्वी नदीला अर्पण करायचे म्हणून तसंच करत राहतात.”

 

“निर्माल्य पायदळी तुडवलं जाऊ नये अशी इच्छा असते.” शिल्पा म्हणाली. 

 

“तुला बरीच माहिती आहे.” 

 

“माझ्या घरून खूप विरोध झाला. म्हणजे आई-बाबा तयार होते निर्माल्य खत प्रकल्पाला द्यायला पण आजीचा ठाम विरोध. माझं आणि आजीचं भांडण झालं त्यावरून.”

 

“मग?” 

 

“आई-बाबांनी आजीला समजावलं पण ती ऐकत नव्हती.”

 

“मग?”

 

“एकदा आमच्याकडे पूजा होती. पौरोहित्य करायला एक ताई आल्या होत्या. त्यांनी पुजेतले विधी, मंत्र ह्यांचा अर्थ सांगितला. खूप छान वाटलं. नाहीतर आपण नुसतेच म्हणतो का हे कळत नाही आपल्याला.”

 

“खरं आहे.” 

 

“पूजेनंतर मी त्यांच्याशी बोलले. मला एकूण त्यांची विचार करण्याची पद्धत खूप आवडली. प्रथांकडे डोळसपणे बघून त्यांचा अर्थ समजून घेतात त्या. आजीही त्यांच्यावर खूप खुश होती.” 

 

“हू.”

 

“निर्माल्याच्या आमच्या भांडणाबद्दल मी त्यांना सांगितलं आणि त्यांचं मत विचारलं.”  

 

“मग?” 

 

“त्यांना खत प्रकल्पाची कल्पना खूप आवडली. त्यांनी आजीला सांगितलं हा चांगला उपक्रम आहे आणि सध्याच्या परिस्थितीत खूप गरजेचा आहे.” 

 

“आजीने ऐकलं?”

 

“लगेच नाही. पण ती चर्चा करायला तयार झाली. नाहीतर इतके दिवस आम्ही नुसतेच भांडत होतो.” 

 

‘खी-खी’ हसण्याचा आवाज आला म्हणून सगळ्यांनी बघितले तर शंतनु अरमानचा हातातल्या स्केचबूकमध्ये बघून हसत होता.

 

“काय रे शंतनु?” चारुने विचारले.

 

“अरमानचं चित्र बघून मला हसू आलं.”

 

“शिल्पा आणि तिची आजी ह्यांचं भांडण कसं सुरू असेल ह्याची मी कल्पना केली.” अरमान चित्र दाखवत म्हणाला. 

 

“मी आणि आजी काय निंजा आहोत का?” शिल्पा कमरेवर हात ठेवत म्हणाली.

 

अरमानने चित्र मस्त काढले होते बाकी. दोन निंजा तलवार घेऊन एकमेकांशी युद्ध करत आहेत असे चित्र होते, शेजारी निर्माल्याचा कलश ठेवला होता.

 

सगळेजण  खो-खो हसायला लागले. ट्री-हाऊसमध्ये गँग, झूमवर एका बाजूला शिल्पा आणि दुसरीकडे गणेश आणि गँग. 

 

“त्या ताईंना भेटता येईल का?” हसण्याचा ओघ ओसरल्यावर चारुने विचारले. 

 

“हो नक्की. मी त्यांचा नंबर घेतला आहे. आपल्या परंपरा, इतिहास ह्यांचा त्यांचा खूप सखोल अभ्यास आहे. शिवाय त्यांचा दृष्टिकोन  खूप आवडला मला. परंपरांचा विचार त्या त्यावेळच्या परिस्थितीबरोबर करतात. त्यावेळी त्या परिस्थितीत परंपरा का आणि कशा निर्माण झाल्या आणि आता बदलेल्या परिस्थितीत त्यांचा अर्थ काय आहे, त्या पाळाव्या का किंवा आहेत तशा पाळाव्यात का? असा वेगळा विचार आहे त्यांचा.”

 

“हो, मलाही त्यांना भेटायला आवडेल.” तिकडून संगीता म्हणाली. 

 

“मी त्यांची वेळ घेते. मग तुम्हालाही कॉलवर घेतो.” चारू म्हणाली. 

 

—–

“फुलं आपल्याला मातीतून मिळतात मग ती परत मातीतच गेली पाहिजेत ना. नदीला अर्पण करण्याची पद्धत आलीच कशी?” चारूने विचारले.

 

“हो, मलाही नेहमी हा प्रश्न होता. आपल्याकडे कायम निसर्गाचा विचार केलेला दिसतो. बऱ्यापैकी चक्राकार व्यवस्था आपल्याकडे कायम होती. मग निर्माल्य नदीत टाकावं अशी पद्धत आलीच कशी?” झूमवरून संगीताने विचारले. 

 

“छान प्रश्न आहेत. माती म्हणजे सृजनाचं प्रतीक आहे. माती म्हणजे नवीन निर्माण करणारी असं आपल्याकडे कायमच मानलं आहे. तसंच सगळं स्वच्छ करणारं म्हणजे पाणी. त्यामुळे सगळं पोटात घेणारी कोण तर नदी. आपल्याकडे ‘झालं गेलं गंगेला मिळालं.’ असं म्हणायची पद्धत आहे ना ती त्यामुळेच.” आर्या ताई म्हणाली. 

 

“ह्या प्रथा निर्माण झाल्या तो काळ आपण बघितला तर तेव्हा लोकसंख्या अगदीच कमी होती. आपली वस्ती झाली ती नदीच्या भोवती. त्यामुळे नदी ही जीवनाचा भाग होती. नद्या वाहत्या होत्या. त्यांच्यात शुद्ध पाणी होतं. नदीत लोक आंघोळ करायचे, कपडे धुवायचे तरी पुढच्या गावी जाईपर्यंत नदीचं पाणी शुद्ध झालेलं असायचं. नदयांमध्ये स्वतःला शुद्ध करायची ही क्षमता असतेच. नदीला अर्पण केलेले निर्माल्यही अगदी सहज कुजून जात होतं.”

 

“तेव्हा धरणं नव्हती त्यामुळे नदीत भरपूर पाणी होतं ना?” अरमान म्हणाला. 

 

“आपण पुण्याचा विचार केला तर मुठा नदीवरचं पहिलं धरण म्हणजे खडकवासला १८८० साली झाले. नंतर मुठा नदीच्या दोन नद्या, अंबी आणि मोशी. त्यांच्यावर अनुक्रमे पानशेत आणि वरसगाव ही धरणं  झाली. नंतर टेमघर धरण मुठेवर बांधलं. ह्या चार धरणांमध्ये आपण ह्या तीन नद्यांचे पाणी अडवले आहे. त्यामुळे पुणे शहरात मुठा नदीत पावसाळ्याचे चार महिने सोडले तर शुद्ध पाणी असं नसतंच. 

 

तुम्ही नदीपात्रात उभे राहिलात ना तर मूळ नदी किती मोठी होती ह्याचा अंदाज येतो. कुठलाही पूल घ्या, पूल जिथे सुरू होतो आणि जिथे संपतो तेवढं एकेकाळी नदीचं पात्र होतं आणि आता बघा ते केवढसं झालं आहे.”

 

“शहर वाढलं तशी नदी लहान होत गेली.”

 

“हो ना. लोकसंख्या कितीतरी पटीने वाढली. निर्माल्य जरी जैविक असलं तरी ती पचवू शकत नाही. आपण खत करतो तेव्हा बघतो ना कुजण्याची क्रिया व्हायला ऑक्सिजनची आवश्यकता असते. ऑक्सिजन मिळाला नाही तर जैविक गोष्टी कुजत नाहीत तर सडतात. 

 

“मागे आमच्या कोंपोस्टमध्ये गडबड झाली होती. जो काही घाण वास येत होता.” अरमान म्हणाला. 

 

“असाच सडका वास आपण नदीवरच्या पुलावरून जाताना किंवा नदीजवळून जाताना येतो तो त्यामुळेच. नदीत ऑक्सिजन नसल्याने त्यातले जैविक घटक सडतात. कुजले तर कार्बन डायऑक्साइड बाहेर पडतो, सडले तर मिथेन आणि हायड्रोजन सल्फाईड नावाचे वायू बाहेर पडतात. मिथेनला वास नसतो पण हायड्रोजन सल्फाईडला अत्यंत सडका वास येतो.”

 

“पण ताई, म्हणजे पुण्यात नदीत जो सडका वास येतो तो त्यातल्या जैविक घटकांचे ऑक्सिजन शिवाय विघटन होते म्हणून. म्हणजे एवढे निर्माल्य नदीत आहे?”

 

“नाही, जैविक घटक म्हणजे केवळ निर्माल्य आपल्या नदीत नाही. आपल्याकडे प्रक्रिया न करता सांडपाणी नदीत सोडले जाते तेही जैविक घटक नदीत मोठ्या प्रमाणात आहेत.” 

 

“ते टाकणं बंद केलं तर नदीची स्थिती सुधारेल ना?”

 

“नक्कीच. प्रक्रिया न केलेले पाणी नदीत येत आहे ही खूप मोठी समस्या आहे. पण मुद्दा असा आहे की निर्माल्य  नदीत न टाकणं आपल्या हातात आहे. ते लगेच अमलात येण्यासारखे आहे.”

 

“शिवाय लोक नुसतं निर्माल्य टाकत नाहीत ते पिशवीत घालून टाकतात. बहुतेक वेळा ती प्लॅस्टिकची पिशवी असते.” 

 

“तो तर वेडेपणाच आहे.” ताई म्हणाली, “लोकांनी हे करू नये म्हणून काही वर्षांपूर्वी महानगर पालिकेने सगळ्या पूलांवर जाळ्या लावल्या. पण लोक त्यावरून पिशव्या नदीत फेकू लागले. म्हणून मग त्यांनी ती सहा फुटाची जाळी बारा फुट केली. पण हार मानतात ते पुणेकर कसले. त्यांनी ते आवाहन म्हणूनच स्वीकारलं.” 

 

“हो ना, मायकेल जॉर्डनला लाजवेल असे थ्रो करत असतात लोक.” सिद्धांत म्हणाला. 

 

“लोकांना हा मुद्दा पटवून द्यायचा असेल तर काय करायचं?” चारूने विचारलं. 

 

“शिल्पाची शाळा आणि इतर शाळांमध्ये जे खत प्रकल्प सुरू आहेत त्याबद्दल माहिती द्यायची.” 


“एक कॉलेज आहे. दर नवरात्रीत चतुशृंगी देवीच्या मंदिराशी येणाऱ्या लोकांकडून निर्माल्य घेतात. गेल्या वर्षी त्या नऊ दिवसांत सुमारे १२०० किलो निर्माल्य गोळा झालं. देवस्थानाने खतासाठी खड्डे केले आहेत. त्यात खत करतात.”    

 

“१२०० किलो निर्माल्य नदीत न जाता परत मातीत गेलं.” मीनल म्हणाली. 

 

“ते हा उपक्रम दरवर्षी करतात. नदी संवर्धनासाठी काम करणारी एक संस्था आहे त्यांनी मुळा नदीकाठच्या औंधच्या विठ्ठल मंदिरात कायमस्वरूपी खत प्रकल्प सुरू केला आहे. मंदिराजवळ मोठा पिंजरा आहे ज्यात तेथे येणारे भाविक निर्माल्य जमा करतात आणि त्याचं खत केलं जातं.” ताई म्हणाली, “गणेश उत्सवातही अनेक संस्था नदीकाठावर थांबून लोकांकडून निर्माल्य गोळा करतात आणि ते नदीत जाण्यापासून थांबवतात .”

 

“पण लोकसंख्येच्या मानाने हे प्रकल्प कमी आहेत. नदीत जाणारं निर्माल्य कसं थांबणार?” शैलेश म्हणाला. 

 

“उत्तर माझ्यासमोर आहे.” ताई म्हणाली. 

 

“कुठे कुठे?” शंतनु इकडे तिकडे बघू लागला. 

 

“तुम्ही मुलंच तर उत्तर आहात ह्या समस्येवर.” ताई म्हणाली.

 

“अगं पण आम्ही दहा मुलं काय करणार?” 

 

“तुम्ही सगळेजण शाळेत जाता. आपल्या शहरात एकूण १२०० शाळा आहेत. शिल्पाच्या शाळेने जे केलं ते प्रत्येक शाळेत घडवून आणलं तर?” 

 

“१२०० शाळा म्हणजे दोन ते तीन लाख तरी मुलं असतील ना?” चारू म्हणाली. 

 

“बघा, तुमची गँग एका क्षणात किती वाढली.” ताई म्हणाली. 

 

“आपल्याकडे टीम आहे आणि शिल्पाच्या शाळेने केलेल्या प्रकल्पाच्या स्वरूपात सोल्यूशनही आहे.” सिद्धांत म्हणाला. 

 

“लोकांच्या शंकांना उत्तर द्यायला आपल्याकडे ताईसुद्धा आहे.” शिल्पा म्हणाली. 

 

“मग वाट कसली बघताय, चला, लागू कामाला.” ताई हसून म्हणाली.   

 

————–

ह्या गोष्टीतली पात्रे जरी काल्पनिक असली तरी ताई आणि गोष्टीत उल्लेख झालेले प्रकल्प अगदी खरे आहेत. आपल्या शहरात सुरू आहेत. 

गोष्टीतली ताई म्हणजे डॉ. आर्या जोशी. ज्ञानप्रबोधिनीच्या संत्रिकातर्फे पौरोहित्य करतात. लोकांना आपल्या प्रथांकडे शास्त्रीय दृष्टीने, आत्ताच्या काळानुसार बघायला शिकवतात. 

गोष्टीतला वीरगळ आणि स्मृतिशिळांचा अभ्यास करणारा दादा म्हणजे प्रणव पाटील. 

गोष्टीतले निर्माल्य खत प्रकल्प –

१. अहिल्यादेवी शाळा – निर्माल्य व वाळलेली पाने वापरून गच्चीवर बाग Ahilyadevi School Project

२. हुजूरपागा इंग्लिश मीडियम स्कूल, मांगडेवाडी, कात्रज, मुख्याध्यापिका किर्ती पंडित – शिल्पाची शाळा – निर्माल्य खत प्रकल्प 

३. रेणुका स्वरूप  – गणपती ते नवरात्री निर्माल्य संकलन व खत प्रकल्प 

४. मॉडर्न कॉलेज – गणेशखिंड – चतुशृंगी मंदिर नवरात्री निर्माल्य संकलन व खत प्रकल्प 

५. वनाज परिवार विद्या मंदिर – वाळलेली पाने व निर्माल्य खत प्रकल्प, फुलपाखरू उद्यान 

६. हुजूरपागा सौ. शोभताई रसिकलाल धारिवाल इंग्लिश मीडियम स्कूल, लक्ष्मी रोड- वाळलेली पाने, निर्माल्य खत प्रकल्प – गच्चीवरची बाग    

७. विठ्ठल मंदिर, औंध, मुळा नदीकाठ – जीवितनदी लिव्हिंग रिव्हर फौंडेशन – निर्माल्य खत प्रकल्प

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *